लाॅकडाऊनमध्ये मुंबईत जखमी वन्यजीवांच्या बचावासाठी प्राणिप्रेमींचा धावा; वाचवले हे प्राणी

    दिनांक  25-Mar-2020 19:40:18
|
wildlife_1  H x
 
 
 
 
 

दोन डझनपेक्षा अधिक वन्यजीवांचा बचाव

 
मुंबई (प्रतिनिधी) - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लाॅकडाऊन असताना संकटात सापडलेल्या मुक्या जीवांसाठी वन्यजीवप्रेमी धावून आले आहेत. दोन दिवसांमध्ये शहरातील वन्यजीव बचाव संस्थांनी दोन डजन पेक्षा अधिक जखमी प्राण्यांचे जीव वाचवले आहेत. राज्य सरकारने प्राण्यांसंदर्भातील सर्व सेवांचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये केला आहे.
 
 

wildlife_1  H x 
 
 
 
 
मुंबई लाॅकडाऊन करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शहरात संकटात सापडलेल्या वन्यजीवांचा धावा प्राणिप्रेमींना ऐकला आहे. मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांमध्ये वन्यजीव बचाव संस्थांनी शहरातील विविध भागांमधून जखमी प्राण्यांना ताब्यात घेतले आहे. या प्राण्यांची संख्या दोन डजनपेक्षा अधिक आहे. यामध्ये पोपट, घार, घुबड, बगळा हे पक्षी आणि मगर, वटवाघूळ या प्राण्यांचा समावेश आहे. दोन दिवसांमध्ये 'राॅ' या प्राणिप्रेमी संस्थेने शहरातून २५ पेक्षा अधिक जखमी प्राण्यांचा बचाव केला आहे. हे प्राणी भांडुप, मुलुंड, विक्रोळी, पवई, भायखळा आणि अंधेरी भागातून वाचविण्यात आल्याची माहिती ठाणे शहराचे मानद वन्यजीव रक्षक आणि 'राॅ'चे प्रमुख पवन शर्मा यांनी दिली. मुंबई लाॅकडाऊन असताना वन्यजीव बचावाचे कार्य अत्यावश्यक सेवांमध्ये येत असल्याने हे काम महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 
 

wildlife_1  H x 
 
 
 
'प्लॅंट अन्ड एनिमल वेल्फेअर सोसायटी -मुंबई' (पॉज-मुंबई) या संस्थेने मंगळवारी भांडुप वाॅटर काॅम्प्लेक्समध्ये अडकलेल्या सात फुटी मगरीची सुटका केली. मंगळवारी सकाळी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काॅम्प्लेक्समध्ये मगर अडकल्याची माहिती संस्थेला दिली. त्यानुसार संस्थेच्या प्राणिप्रेमींनी पाहणी केली असता वनदेवी मंदिराच्या जवळ पाइपलाइनच्या खाली सहा फुट खड्ड्यामध्ये एक मगर अडकलेली दिसली. त्यानंंतर स्वयंसेवकाच्या मदतीने या सात फुटाच्या मगरीची खड्यातून सुटका केल्याची माहिती मुंबई शहराचे मानद वन्यजीव रक्षक आणि 'पाॅज'चे प्रमुख सुनिश कुंजू यांनी दिली. वैद्यकीय तपासणीनंतर ७५ किलोच्या या मादी मगरीला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.