सेवानिवृत्तीनंतर आपले छंद जोपासताना समाजासाठी आणि आत्मिक समाधानासाठी कार्य करणारे अनेकजण भेटतात. त्यापैकीच एक असलेल्या विदर्भातील डॉ. रघुवीर देशपांडे यांची जीवनकहाणी...अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुयातील शाळेत शिक्षक म्हणून पवित्र विद्यादानाचे कार्य करुन ते सेवानिवृत्त झाले. पण, हा सेवानिवृत्तीचा काळ त्यांनी निव्वळ आणि निव्वळ आपल्या भारतीय परंपरांचे, ऐतिहासिक वारसा जतन आणि माजी सैनिकांप्रति असलेल्या निष्ठेपोटी तळमळीने कार्य करण्यात घालविला. अजूनही हे कार्य तितक्याच हिरीरीने, उत्साहाने करणारे डॉ. रघुवीर देशपांडे...
आपल्या समवयस्क ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणून समाजासाठी आणि राष्ट्रहितासाठी कार्यरत राहण्याचा रघुवीर देशपांडे यांचा प्रयास अतिशय स्तुत्य असाच. वेळेचा सदुपयोग करण्याचा आदर्शच त्यांनी घालून दिला आहे. नेहमी व्यस्त आणि आपल्या आवडत्या कामात व्यग्र राहण्याचे त्यांचे हे कौशल्य नक्कीच वाखाणण्याजोगे आहे.
पुण्यात गेल्या आठवड्यात राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाला जगातील एकमेव अपराजित योद्धा सरसेनापती श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली. त्यानंतर काही नतद्रष्टांनी तो विषय ‘बाजीराव-मस्तानी’ यांच्याशी जोडून त्याची थट्टा करण्याचा प्रयास केला. यामुळे कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या डॉ. रघुवीर देशपांडे यांनी खा. कुलकर्णी यांच्या मागणीचे समर्थन करताना लगेचच थेट पंतप्रधान, तसेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ई-मेल पाठवून श्रीमंत बाजीराव पेशवे यांची येत्या दि. १८ ऑगस्ट रोजी येणारी ३२५वी जयंती राष्ट्रीय पातळीवर साजरी करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, पुण्यात शुक्रवारी देशाचे गृहमंत्री अमित शाह हे एनडीए परिसरातील बाजीराव पेशवे यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करणार असल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.
"श्रीमंत बाजीराव पेशवे म्हणजे मस्तानीचे प्रेम प्रकरण हे ‘फिल्मी नॅरेटिव्ह’ आणि मानसिकता बदलावीच लागणार,” असे डॉ. देशपांडे ठामपणे सांगतात. डॉ. रघुवीर देशपांडे यांचा शिक्षकी पेशा असल्याने सभोवतालच्या परिस्थितीचा आणि वस्तुस्थितीचा अभ्यासही तितकाच दांडगा आहे. त्यांची निरीक्षण शक्ती आणि आपल्या भारतीय संस्कृतीबद्दलची जाणीवदेखील प्रगल्भ अशीच. त्यामुळे ते यासाठी सतत शासकीय आणि सामाजिक पातळीवर आपल्यापरीने पाठपुरावा करीत असतात आणि त्यांच्या कार्यालाही यश येत असते.
पातुर तालुयात डॉ. देशपांडे यांनी डोंगरी, मागास भागात परिवर्तनाचे सामाजिक, शैक्षणिक कार्य केले. या परिसरात असलेल्या त्रेतायुगातील दुर्लक्षित सितान्हाणीची माहितीही त्यांनी संकलित केली. रामायण काळातील काही गोष्टींचे अस्तित्व अजून टिकून असल्याने त्याचे जतन तर झालेच पाहिजे आणि ते नव्या पिढीलादेखील कळले पाहिजे, यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते. गुडघेदुखीचा त्रास सहन करीत ते या कार्यात उत्साहाने भाग घेत असतात. त्यांच्या या कार्याचे मूल्यमापन करून ‘गांधी पीस फाऊंडेशन’, नेपाळ यांनी दखल घेत ’कणचअछखढध एदउएङङएछउए अथअठऊ २४’ प्रदान केला आहे.
सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी डॉ. देशपांडे यांनी केलेले कार्य स्पृहणीय असेच. सैनिकांना सन्मान व गौरव मिळवून देणे, श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या अफाट कर्तृत्वाची विविध पातळीवर दखल घेणे, पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना सामाजिक परिवर्तनासाठी विचार पाठविणे, या डॉ. देशपांडे यांच्या कार्याची दखल अनेक संस्थांनी घेतली आहे.
अकोला जिल्ह्यातील शौर्यभूमी सिरसोलीचा विकास करण्यासाठीदेखील त्यांनी पुढाकार घेतला. यासाठी ते सदैव प्रयत्नशील आहेत. तेल्हारा तालुक्यातील सिरसोली येथील युद्धभूमीवर १८०३ साली वीरगती प्राप्त झालेल्या अज्ञात-अनाम सैनिकांचे अमर युद्धभूमी स्मारक निर्माण करण्यासाठी ते आग्रही आहेत. त्यांनी विकास समितीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सहा दुर्लक्षित युद्धभूमीला भेट दिली व पुष्पहार अर्पण केला. वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांचा सन्मान व गौरव करण्यासाठी सिरसोली युद्धभूमीवर प्रेरणादायी स्मारक झाले पाहिजे, अशी त्यांची आग्रही भूमिका. सैनिकांचे शौर्य व पराक्रम नवीन पिढीला माहीत होणे आवश्यक असे त्यांना वाटते. विशेष म्हणजे, त्यांनी अशाच प्रकारे याआधी केलेल्या एका पाठपुराव्याला यश आले. जठारपेठ अकोला परिसरात असलेल्या हॉटेल जसनागराच्या बाजूच्या अमर लेफ्टनंट विष्णू आठल्ये यांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार झाला आहे.
इंडियन आर्मी, जिल्हाधिकारी व जिल्हा सैनिक कार्यालयाचे अधिकारी यांनी विशेष लक्ष घालून हे नवीन स्मारक निर्माण केले आहे. यासाठी डॉ. रघुवीर देशपांडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अमर लेफ्टनंट विष्णू आठल्ये यांचे नवीन स्मारक हे प्रेरणा देणारे असल्यामुळे सर्व नागरिकांनी व सैनिक संघटनांनी या स्मारकाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन ते नव्या पिढीला नेहमी करीत असतात. त्यांच्या राष्ट्रीय कार्यात सहभागाची दखल घेत, सशस्त्र सेना झेंडा दिनानिमित्त अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अजित कुंभार, आयुक्त व पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे, विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याचा रखडलेला विकास साध्य करायचा असेल, तर हा जिल्हा रेल्वेने जोडला जाणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करताना त्यांनी मलकापूर ते मेहकर, साखरखेर्डा आणि लोणार मार्गे रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वेमंत्र्यांकडे समविचारी लोकांना एकत्र आणून प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
अतुल तांदळीकर
९४२३०७२२१०