मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील मुर्डीच्या किनाऱ्यावरुन रविवार दि. २९ जून रोजी दुर्मीळ मास्कड बूबी या समुद्री पक्ष्याचा बचाव करण्यात आला (masked booby bird). दापोली वनविभाग आणि वाईल्ड अॅनिमल रेस्युअर या संस्थेने या पक्ष्याचा बचाव करुन त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले. (masked booby bird)
रविवारी दुपारी मुर्डी येथील शेतकरी वैभव झगडे यांना त्यांच्या शेतामध्ये एक मोठा, बदकासारखा अज्ञात पक्षी थकलेला आणि अडचणीत आढळून आला. त्यांनी तत्काळ दापोली वनविभागाला याची माहिती दिली. सदर माहिती मिळताच वनविभाग आणि वाईल्ड अॅनिमल रेस्युअर या संस्थेचे जवळच असलेले प्रशिक्षित वन्यजीव रक्षक मनित बाईत आणि प्रतीक बाईत हे दोघेही काही वेळात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पक्ष्याची शारीरिक अवस्था तपासली असता तो फारच थकलेला, पंख ओले आणि हालचाली अत्यंत मर्यादित अशा अवस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे, हा पक्षी सर्वसामान्य पक्ष्यांपेक्षा वेगळ्या रचनेचा असून दापोली मध्ये नियमित आढळणाऱ्या पक्षांपेक्षा वेगळा होता. त्यामुळे या पक्ष्याला काळजीपूर्वक रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्राथमिक तपासणी करुन पक्ष्याला विश्रांती देण्यात आली. संपूर्ण प्रक्रियेमध्ये वाईल्ड अॅनिमल रेस्क्यूअर संस्थेचे मनित आणि प्रतीक यांनी अत्यंत दक्षता व तांत्रिक कौशल्याने काम केले. यानंतर संध्याकाळी सुमारे ४ वाजता, वाईल्ड अॅनिमल रेस्क्यूअर व दापोली वन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून या दुर्मीळ पक्ष्याला आंजर्ले येथील समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षितरीत्या सोडण्यात आले.