मुंबई (विशेष प्रतिनिधी) - राज्यात जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत १२३ वन्यजीवांचा मृत्यू झाल्याची माहिती शुक्रवार दि. ४ जुलै रोजी वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दिली (wildlife death). यामध्ये २२ वाघ, ४० बिबट आणि ६१ इतर प्राण्यांचा समावेश आहे (wildlife death). तसेच याच चार महिन्यांच्या कालावधीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१ व्यक्तींचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले. (wildlife death)
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शुक्रवार आमदार धनंजय मुंडे, संतोष दानवे, मनोज जामसुतकर, सुधीर मुनगंटीवार, सुनिल प्रभू, मोहन मते, संजय मेश्राम यांनी वन्यजीवांच्या मृत्यूसंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत राज्यात मृत्युमुखी पडलेल्या वन्यजीवांची आकडेवारी सांगितली. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये राज्यात २२ वाघांचा मृत्यू झाला. यामधील १३ वाघ नैसर्गिक कारणामुळे, विजेच्या धक्क्यामुळे चार वाघ, रस्ता-रेल्वे वा विहिरीत पडून चार वाघ आणि अज्ञात कारणामुळे १ वाघ मृत्युमुखी पडल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच जानेवारी, २०२२ ते डिसेंबर, २०२४ या कालावधीत १०७ वाघांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी त्यांनी सदनासमोर ठेवली. जानेवारी ते एप्रिल, २०२५ या कालावधीत ४० बिबटे मरण पावले. यामधील नैसर्गिक कारणामुळे आठ, रस्ता-रेल्वे वा विहिरीत पडून २०, शिकारीमुळे तीन आणि अज्ञात कारणामुळे ९ बिबटे मृत्युमुखी पडले.
चार महिन्याच्या याच कालावधीत ६१ इतर प्राण्यांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. त्यामध्ये नैसर्गिक कारणामुळे २३, रस्ता-रेल्वे वा विहिरीत पडून २४, अज्ञात कारणामुळे ५ वन्यजीव मरण पावले. जानेवारी, २०२२ ते डिसेंबर, २०२४ या कालावधीत राज्यात एकूण ७०७ वन्यजीवांचा मृत्यू झाल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. राज्यात मानवनिर्मित कारणामुळे वन्यजीवांच्या मृत्यूमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. खास करुन रेल्वे आणि रस्ते अपघातामध्ये अनेक वन्यजीवांचा बळी जात आहे. यामधील कित्येक मृत्यू हे वन विभागाच्या अधिकृत पटलावर देखील येत नाही आहेत.