मुंबई (विशेष प्रतिनिधी) - पुणे वन विभागाने शुक्रवार दि. ४ जुलै रोजी पुणे शहारातून तब्बल ५०० किलो मोरपंख जप्त केले (
peacock feathers). सोमवार पेठ भागामध्ये ही कारवाई करण्यात आली (
peacock feathers). या कारवाईच्या माध्यमातून उत्तर प्रदेशचे रहिवासी असणाऱ्या ११ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. (
peacock feathers)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध शहरात मोरपंखाची साठवणूक केली जात आहे. अशाच एका साठवणूकीची माहिती पुणे वन विभागाला मिळाली होती. सोमवार पेठ येथील नरपतगिरी चौक येथे ही साठवणूक आणि विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने वनकर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी छापा टाकला. त्याठिकाणी ११ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी मोराची पिसे विक्री करण्यासाठी आणल्याचे सांगितले. तसेच श्री. संत गाडगेबाबा धर्मशाळा येथील वसाहतीमध्ये इतर काही सहकारी मोराची पिसे विक्री करण्याकरिता साठवणूक करत असल्याचे सांगितले. त्याठिकाणी वनकर्मचारी पोहचल्यावर तिथे त्यांना ४०० ते ५०० किलो पिसांची साठवणूक केलेली दिसली. या प्रकरणातील सगळ्या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोर हा देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. त्याची पिसे काढणे, त्यांची साठवणूक करणे, त्याची खरेदी-विक्री करणे गैरकायदेशीर आहे. या पिसांची उपयोग अंधश्रद्धेपोटी व घराच्या सजावटीसाठी केला जातो. त्यामुळे नागरिकांनी मोरपिसांची खरेदी-विक्री टाळावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. ही कारवाई पुण्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे आणि उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत सहा. वनसंरक्षक मंगेश ताटे, वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश चव्हाण, मनोज बारबोले, सुरेश वरक यांनी केली.