मुंबई (विशेष प्रतिनिधी) - चंद्रपूर शहरातील जगन्नाथ बाबा मठाजवळ गुरुवारी दि. ३ जुलै रोजी रात्री खवले मांजर आढळले (pangolin rescue). जगन्नाथ बाबा मठाजवळच्या घरातील अंगणामधून या खवले मांजराचा बचाव करण्यात आला. (pangolin rescue)
जगन्नाथ बाबा मठाजवळ राहणाऱ्या वासुदेव शास्त्रकार यांना त्यांच्या घराच्या अंगणात गुरुवारी रात्री खवले मांजर आढळून आले. यावेळी जोराचा पाऊस असल्याने खवेल मांजराने झाडाच्या कुंडीचा आसरा घेतला आणि त्यामागे जाऊन लपला. शास्त्रकार यांनी प्रसंगावधान राखून न घाबरता त्या खवले मांजराला टोपलीखाली झाकून ठेवले. त्यानंतर हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी चे सदस्य अमित देशमुख यांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे, सहकारी किरण बावस्कर, जितू नोमुलवार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी खवले मांजराला ताब्यात घेतले. वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर यांना घटनेची माहिती दिली आणि वनविभागाचे वनरक्षक सुद्धा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या प्राण्याची पाहणी करून त्याला ट्रान्सीट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलवले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून निर्सगमुक्त करण्यात आले. शास्त्रकार यांच्या घराच्या मागे झुडुपी स्वरुपाचे जंगल असल्याने याठिकाणाहून हे खवले मांजर आल्याची शक्यता आहे.