
नाशिक या शहराचे महत्त्व सर्वार्थाने अनन्यसाधारण आहे. या शहराला प्रभू रामचंद्रांचा सहवास ते सावरकरांच्या क्रांतिविचारांचा वारसा लाभला आहे. त्याचबरोबर स्थापत्य क्षेत्रातही या शहरामध्ये असंख्य सुंदर आणि भव्य शिल्पे बघायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर. श्री गोंदेश्वर मंदिराचा घेतलेला आढावा...
सत्ययुगात ‘पद्मनगर’, त्रेतायुगात ‘त्रिकांतक’ आणि द्वापारयुगात ‘जनस्थान’ असा नामोल्लेख आलेले कुठले शहर आहे, हे माहीत आहे का आपल्याला?कलियुगात आपण या शहराला नाशिक म्हणून ओळखतो. गोदावरी काठी वसलेल्या या पवित्र भागाला, साक्षात प्रभू श्रीरामांचा पदस्पर्श झाला आहे. हा भाग आपल्या ताब्यात असावा, म्हणून अनेक राजसत्ता सतत प्रयत्नशील होत्या. नाशिक हे अनेक राजांच्या कालखंडातले महत्त्वाचे व्यापारी आणि राजनैतिक केंद्र होते. काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर या पवित्र ठिकाणांपासून ते स्वराज्यनिर्मितीच्या पराक्रमी कथा सांगणार्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपर्यंत सर्व काही इथे आहे. या नाशिकमधले महत्त्वाचे गाव म्हणजे सिन्नर. पुणे-मुंबईमधून साधारण तीन ते चार तासांत या ठिकाणी आपल्याला पोहोचता येते. नाशिक शहरापासून फक्त ३० किमी अंतरावर सिन्नर गाव आहे.
यादव (गवळी) प्रमुख राव शिंगुणी याने इथे गाव वसवले. याबद्दलची विस्तृत माहिती १०६९ सालातल्या ताम्रपटात आपल्याला वाचायला मिळते. याचाच मुलगा म्हणजे राव गोविंद. या राव गोविंदाने त्यावेळी दोन लाख रुपये खर्च करून, एका भव्य मंदिराची निर्मिती केली. शिवाला अर्पण केलेले हे अतिशय सुंदर मंदिर म्हणजे गोंदेश्वर! या लेखात आपण गोंदेश्वर मंदिराचे स्थापत्य, शिल्पवैभव यांचा आढावा घेणार आहोत. मंदिरामध्ये पोहोचण्यासाठी सिन्नरच्या मुख्य बसस्थानकापासून रिक्षा उपलब्ध असतात आणि अंतरही फारसे नाही. मंदिराजवळ गेल्यावर सर्वांत आधी आपल्याला एक मोठी तटबंदी दिसते. या तटबंदीत पूर्व आणि दक्षिण या दिशांना प्रवेशदारे आहेत पण, यातल्या फक्त दक्षिण दिशेच्या प्रवेशद्वारातूनच प्रवेश करता येतो. पूर्वेकडील द्वार जरी बंद असले, तरी त्याची रचना कोल्हापूर जवळील कोप्पेश्वर मंदिरातल्या स्वर्गमंडपाची आठवण करून देते. दक्षिणेकडून आपण मंदिराच्या प्राकारात (परिसरात) प्रवेश करतो आणि एक वेगळेच विश्व आपल्यासमोर उभे राहते.या मंदिराची रचना पंचायतन आहे.
पंचायतन म्हणजे काय?आपल्याकडे वेगवेगळे अनेक संप्रदाय, पंथ आहेत. प्रत्येकाची पूजापद्धती वेगळी, प्रत्यकाचे आराध्यदैवत वेगळे पण, व्यक्ताकडून अव्यक्ताकडे जातानाचे मार्ग जरी वेगळे असले, तरी जायचे आहे त्याच अनामिक शक्तीजवळ ही भावना सर्वांमध्ये रुजावी आणि सांप्रदायिक खटके कमी व्हावेत, यासाठी पाच प्रमुख संप्रदाय एकाच ठिकाणी पुजले गेले. यामध्ये मंदिर बांधणार्या व्यक्तीने मध्यभागी आपले आराध्यदैवत ठेऊन बाकी चारांना बाजूला स्थान देणे, ही पंचायतन पद्धतीची मूळ कल्पना आहे. हे पाच प्रमुख संप्रदाय म्हणजे शिवपूजक-शैव, विष्णूपूजक-वैष्णव, शक्ती उपासक-शाक्त, गणपती उपासक-गाणपत्य आणि सूर्यपूजक -सौर्य असे होत.
गोंदेश्वर मंदिरात शिव केंद्रस्थानी असून, बाकी देवतांना अर्पण केलेली छोटी मंदिरे आहेत. यालाच ‘पंचायतन मंदिर रचना’ असे म्हणतात. गोंदेश्वर मंदिर हे नागर शैलीतील असून, त्याची उपशैली भूमिज आहे. भूमिज म्हणजे साक्षात जमिनीतूनच उगवून वरपर्यंत जाणारी रचना असते. अशा शैलीतील सुरुवातीचे मंदिर हे अंबरनाथ, मुंबई इथे आहे.
उंच जगती किंवा पिठावर हे मंदिर बांधलेले आहे. खालून वर बघताना आपल्याला आधी अधिष्ठान (प्लिथं) दिसते. शिखर आणि अधिष्ठान यांच्यामध्ये असणारा बाह्य भिंतीचा जो भाग आहे, त्याला ‘मंडोवर’ असे म्हणतात. या मंदिराच्या मंडोवरावर फारशी शिल्पं नाहीत; पण आतल्या बाजूला अनेक सुंदर शिल्पं बघायला मिळतात. मंडोवरावर उभे भाग दिसतात, काही बाहेर आलेले आणि काही आत गेलेले. याने मंदिराला कोनाडे मिळतात, मधून पाणी जाण्यासाठी जागा मिळते, तर बाहेरील भागांवर शिल्पांची रचना करता येते. या उभ्या भागांना ‘रथ’ असे संबोधन आहे. मंदिराचे शिखर अतिशय सुंदर आहे. महाराष्ट्रात अशी खूप कमी मंदिरे आहेत, ज्यांची मूळ शिखरे आज उत्तम अवस्थेत आहेत. गोंदेश्वर हे त्यातलेच एक मंदिर. शिखरामध्ये खालून वर बघताना सात आडवे थर दिसतात, त्यांना ‘भूमी’ असे म्हणतात. इथे सात थर आहेत, म्हणजे हे मंदिर सप्तभूमी झाले.
मुख्य मंदिरात प्रवेश करायच्या आधी, पूर्वेकडे असलेला नंदीमंडप आपल्याला दिसतो. यावरदेखील वेगवेगळ्या अप्सरा आणि देवता यांची शिल्पं कोरलेली आहेत. मुख्य मंदिरात प्रवेश करण्यासाठी तिन्ही बाजूंनी प्रवेशद्वार आहेत. या प्रत्येक द्वाराच्या भोवती असणार्या द्वारशाखा आपले लक्ष वेधून घेतात. मंदिराचा मुख्य मंडप चांगल्या अवस्थेत असून, तिथे असलेले खांब हे उत्तम नक्षीकाम केलेले आहेत. इथेच छताच्या (वितानाच्या) खालच्या भागात, समुद्रमंथन कथा कोरलेली आहे. इथून अंतराळ ओलांडून आपण परमेश्वराच्या दर्शनासाठी गर्भगृहात प्रवेश करतो. मंडपात आपल्याला रामायण, महाभारत, पुराणे, सुरसुंदरी, अप्सरा इत्यादी विषयांशी निगडित अनेक वेगवेगळी शिल्पं दिसतात. यातल्या काहींचा परिचय आपण इथे करून घेऊया.
क्रोधाने थरथरणार्या शिवाच्या जटा एकमेकांवर आदळल्या आणि त्यातून सप्तमातृकांची निर्मिती झाली. सृष्टीची स्थिती सांभाळायचे काम या मातृका करतात. यातलीच एक म्हणजे ब्रह्मदेवाची शक्ती असलेली ब्रह्माणी. त्रिमुखी आणि जटामुकुट परिधान केलेली ब्रह्माणी, मंडोवरावर असणार्या एका देवकोष्ठात दिसते. ती चतुर्हस्त असून, पायाशी हंस वाहन कोरलेले दिसते. दुर्दैवाने देवीचे हात आणि पाय भग्न अवस्थेत आहेत.
शिव आणि रावण यांच्याशी निगडित असलेली ‘रावणानुग्रह’ कथादेखील येथे शिल्पबद्ध केलेली दिसते. गर्वाने अंधळा झालेला रावण कैलास पर्वत उचलताना दिसतो. त्याच्या अवतीभोवती नागदेखील कोरलेले आहेत. कैलास पर्वतावर सर्व चिंताक्रांत असून, शिव मात्र शांत आहेत. शिव आणि पार्वती यांच्या शेजारी गणपती कोरलेला असून, दुसर्या बाजूची आकृती खूप झिजल्यामुळे ओळखता येत नाही.
दुर्गा आणि महिषासुर यांचे युद्धदेखील इथे कोरलेले आहे. महिष रूपातला असुर खाली मुंडके तुटून पडलेला असून, देवी आता मनुष्य रूपातल्या असुराबरोबर युद्ध करत आहे, असे हे शिल्पं दिसते. यांच्याबरोबरच अनेक सुरसुंदरीदेखील इथे कोरलेल्या आहेत. पायात रुतलेला काटा काढणारी सुरसुंदरी मुख्य मंडपाच्या स्तंभावर कोरलेली आहे. त्या अनामिक शक्तीकडे प्रवास करताना असे अनेक काटे वाटेत येतात, पायात रुततात, बोचतात; पण त्याने आपला प्रवास थांबता काम नये, हेच तर या सुरसुंदरीला सूचवायचे नसेल ना?
अशी अनेक बोलकी शिल्पे या मंदिरात आपल्याला दिसतील. सिन्नर हा भाग खूप काही देणारा आहे. भारतीय नौदलातल्या अधिकार्याने खूप कष्टाने उभारलेले गारगोटी संग्रहालय इथूनच अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर असून, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मगाव भगूरही फक्त २० किमी अंतरावर आहे. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, नाशिक या शहरांमध्ये राहणार्या लोकांसाठी तर हा भाग, अगदी पटकन जाता येईल असा आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला जपणारे हे गोंदेश्वर नावाचे रत्न मागच्या अनेक शतकांपासून स्थापत्य अभ्यासक, इतिहासकार आणि भक्त यांना प्रेरणा देत आहे. हे मंदिर फक्त इथल्या स्थापत्य गुणवत्ता एवढ्यापुरते मर्यादित नक्कीच नाही, तर ते भारतीय सभ्यता किती निरंतर आहे, कलात्मक परंपरा टिकवणारी आहे आणि शतकानुशतके लोकांना जोडून ठेवणार्या पवित्र स्थळांची शक्ती दाखवणारे द्योतक आहे.
तुम्ही सर्वांनी इथे नक्की भेट द्या. ही जागा तुम्हाला एक अलौकिक अनुभव देऊन जाईल, याबद्दल मला शंका नाही. या लेखासाठी फोटो उपलब्ध करून दिल्याबद्दल तुषार कोडोलीकर आणि निलय कुलकर्णी यांचे मनापासून आभार