नागपूर ग्रामीणमध्ये काँग्रेसला धक्का; प्रसन्ना(राजाभाऊ) तिडके यांचा भाजपमध्ये प्रवेश
कॉँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
16-Nov-2025
Total Views |
नागपूर : ( Prasanna Rajabhau Tidke ) मौदा तालुक्यातील काँग्रेस नेते व प्रदेश सचिव प्रसन्ना (राजाभाऊ) तिडके यांच्यासह कॉँग्रेसच्या शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी रविवारी नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला. ग्रामीण काँग्रेससाठी हा धक्का मानला जातो.
यावेळी माजी आमदार टेकचंद सावरकरजी व भाजप तालुका मंडळ अध्यक्ष मुकेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे दिलीप सिरसाम, कल्पनाताई मानकर, माजी नगरसेविका नंदाताई इनवाते, सावित्रीताई काटकर, वर्षाताई लारोकर, नाना इंगळे, राजेंद्र जैस्वाल, पृथ्वीराज गुजर, नितेश सुपारे, धर्मराज निमजे, संजय तायवाडे, यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी चांगोजी तिजारे, मनीराम यादव, शरद भोयर, मंगेश ठोंबरे, नरेश मोटघरे, खुशाल तांबडे, रमेश कुंभलकर, भूषण सावरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास राहीलेला नाही. कॉँग्रेसचे नेते आज एकमेकांचे चेहरे पाहत नाही अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश करत आहे. ज्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना शुभेच्छा देत सर्वांनी राज्य व केंद्र सरकारच्या योजना घरोघरी पोहचवा असे आवाहन केले.