बालदिन दि. 14 नोव्हेंबर रोजी भारतात साजरा होतो. पण, जिच्यासाठी 365 दिवस हे मुलांसाठीचेच असतात, तिच्याकरिता बालदिन दि. 14 नोव्हेंबरला साजरा करायचा असं सांगणं म्हणजे, दिवाळी वर्षातून एकदा येते, म्हणून साडी विकत घे असं सांगण्यासारखं ठरेल. जेव्हापासून बालनाट्य प्रशिक्षक म्हणून काम करते आहे, तेव्हापासून माझ्याकरिता प्रत्येक दिवस हा दिवाळीच आहे आणि बालदिन तर, मी आणि सगळे बालकलाकार मिळून रोजच साजरा करतो. त्याकरिता चाचा नेहरू यांच्या वाढदिवसाची का म्हणून वाट पाहायची? आजच्या मुलांना चाचा नेहरू फारसे माहीत नाहीत आणि चाचा नेहरू यांचं मुलांवर खूप प्रेम होतं असं सांगितलं, तर ते पटत नाही. ही ‘जेन अल्फा’ पिढी आहे. त्यांना चाचा नेहरूंचं खरंच प्रेम होतं का? याचेही पुरावे लागतात. लगेच कुठलीच गोष्ट पटतच नाही. आजकालची मुलं!
बालरंगभूमी ही समृद्ध, उपजाऊ, प्रगतिशील आणि आधुनिक राहिली आहे. गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ मी तिला विविधांगी, बहुरूपी पाहिलेलं आहे, अनुभवलेलंही आहे. प्रशिक्षक होण्याआधी त्या अगोदर मी, ज्येष्ठ नाटककार असलेले माझे वडील संजय पेंडसे यांच्याबरोबर बालनाट्यासाठी साहाय्य दिग्दर्शन करायचे. त्याही अगोदर मी एक बालकलाकार म्हणूनही अनेक वर्षे नाटकांमधून काम केलं आहे. माझ्या या अनुभवातून आजच्या लेखात मी बालरंगभूमीबद्दल कमी आणि आज-कालच्या बालकांबद्दल थोडं जास्त लिहिणार आहे. शेवटी बालरंगभूमी आहे तरी काय? बालकांशिवाय त्याचं काय अस्तित्व? ‘आज-कालची मुलं’ असं म्हणत, मी अनेक प्रौढांना दुषणं देताना पाहिलं आहे आणि कौतुकानं बोलतानाही पाहिलं आहे. नुकत्याच दूरदर्शन वाहिनीवरील कार्यक्रमात आलेल्या बालस्पर्धकाची बोलण्याची पद्धत, वागण्यात दिसलेली प्रौढांची नक्कल बघून सर्व प्रेक्षक थक्कच झाले. ‘किती आगाऊ होता तो मुलगा, आजकालची मुलं बिघडत चालली आहेत’ असे म्हणत, हताश होत तोंडावर हात ठेवून काही होणार नाही.
‘मुलं ही देवाघरची फुलं’ असं एका नाटकातलं वाक्य होतं, ते उगाच नव्हतं. मुलं खरंच फुलासारखी असतात, आजही आहेत. हे कालच्या मुलांना म्हणजेच आजच्या प्रौढांना न पटण्यासारखं असणार, पण असं वाटण्याचं कारणही आपणच आहोत हे लक्षात घेणं गरजेचं. मुलांचा हात धरून, आपणच त्यांना दिशा दाखवण्यात कमी पडतो. मग मुलं तरी काय करणार? हातात मोबाईल नावाचा उंदीर धरतात आणि तोच त्यांना सर्वत्र फिरवतो. गणपती बाप्पासमोर हात जोडण्याऐवजी, हातात नको त्या गोष्टी देऊन तेच तंत्रज्ञानाचं खेळणं होऊन बसतात. त्यामुळे मग थोरा मोठ्यांना त्यांच्या समोर हात जोडण्याशिवाय पर्याय राहात नाही.
पण, आजचा विषय बालकांचा आहे. ते नक्की असे आहेत, असा प्रश्न मी स्वतःलाच अधूनमधून विचारत असते. यासाठी मी नाटकात भाग घेणाऱ्या आणि न घेणाऱ्या सर्वच मुलांचं निरीक्षण करते, त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांच्याबरोबर वेळ घालवणं, खेळ खेळणं असं सगळं करते. हा माझ्या आयुष्याचा एक भागच झाला आहे.
अर्थातच, माझा अभ्यास अल्पशा अनुभवातून आहे, कारण विषय मोठा आहे. अभ्यास मात्र मी प्रामाणिकपणे केला आहे. माझ्याकडे येणारी मुलं ही गुणी आहेत, त्यांचे पालक सजग आहेत आणि त्यातील अनेकांना नाटकाचं महत्त्वही पटलेलं आहे. सध्या मी एक बालमहानाट्य बसवायला घेतलं असून, ते छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित आहे. त्यामुळे अर्थातच महाराजांवर, आपल्या इतिहासावर प्रेम करणारी मुलं आणि त्यांचे पालक माझ्या संपर्कात आहेतच. आजची मुलंही पूवसारखी नाहीत. अहो कशी असतील? आम्ही तरी कुठे आमच्या आईवडिलांच्या बालपणासारखे होतो? जग बदलतं, तशी परिस्थितीही. आजचं जग मात्र झपाट्याने बदलतंय आणि त्यामुळे आजच्या मुलांनी पकडलेल्या गतीबरोबर, आपल्याला समतोल साधता येत नाही आहे. आपल्याला अनेक गोष्टी कळण्याअगोदर त्यांना त्या कळलेल्या असतात. आजीबाईच्या पोटलीपेक्षा त्यांच्याकडे जास्त वस्तू असतात. वस्तुस्थिती बदलते आहे आणि ते ‘प्रोॲक्टिव्ह’ आगाऊ तयारीत राहणं पसंत करतात. त्यांना खोटं बोललेलं लगेच कळतं आणि प्रत्येक सूचनेला ‘का’ असा प्रतिप्रश्न असतोच, विथ नो फिल्टर्स! ही पुढची पिढी आहे. आजच्या मुलांमध्ये ऊर्जा खूप आहे, कारण चांगलंचुंगलं खायला मिळतं, फार काळजी घेतली जाते. त्यामुळे कामातून उत्तेजना मिळेल, असं काम पाहिजे. पाच मिनिटे कंटाळवाणी गेली की, एकाग्रता नाहीशी होते. खोट्या आणि तर्कशून्य, निराधार गोष्टी अजिबात चालत नाहीत. उदाहरणार्थ, तिथे जाऊ नको, तिथे वाघोबा राहतो. रात्री सुईत दोरा ओवू नको, जेवणाच्या ताटावर रेघोट्या ओढू नकोस, आईला त्रास होतो. असं सांगून पटत नाही आणि मला विचारालं, तर आवडतही नाही. आजची पिढी लाघवी आहे, त्यांना माणसं हवी आहेत. ती मेहनतीला तयार आहेत आणि साधेपणाकडे झुकणारी आहेत. त्यांना मातीशी खेळायला, डोंगरावर चढायला, स्वच्छंद वागायला आवडतं. ती हुशार आहेत, कारण ’का’चा प्रश्न करून खऱ्या उत्तराच्या शोधात आहेत. राहिला प्रश्न आजकालच्या मुलांना शिष्ठ, आगाऊ, आळशी आहेत, असं बहुतांश लोकांना वाटतं त्याचं काय?
खरं तर हे सगळे तुलनात्मक शब्द आहेत. ती शिष्ठ नाहीत, ती आपल्याच विचारात मग्न असतील. आगाऊ कारण त्यांना माणसांशी वागायचं बोलायचं कसं, याचं ज्ञान नाही. विभक्त आणि अल्पसंतुष्ट कुटुंबपद्धतीमुळे त्यांना वागायचं कसं, तेच कळत नाही. बऱ्याच वेळा ते ‘कन्फ्युझ्ड देसी’सारखे वागतात, त्यालाही कारणं आहेत. आळशी आपल्याला वाटतात. पण त्यांनाही ताण येतो, ते ही तणावा खाली आहेत. आईवडील दोघंही नोकरी-व्यवसायात व्यग्र. त्यांची शाळा, बसप्रवास, ट्युशन क्लास, एक्स्ट्रा क्लास यात अति गुंतलेली असल्याने त्यांचीही दमछाक होते. ही सगळी मुलं मला आमचे नाटक ‘राजे शिवबा’मधले, खरोखरचे मावळे वाटतात. जे बदलणाऱ्या समाजात, झपाट्याने कात टाकणाऱ्या जगाबरोबर धावू पाहतायत. जिद्दी, हट्टी, प्रेमळ, गोड, समंजस, ज्ञानी आणि स्वप्नाळू मुलं पाहून मला, मी त्यांच्यासाठी काय करू आणि काय नको असं होतं. बालनाट्य त्यांच्या करता ‘एस्केप रूट’ ठरतं, इथेच त्यांना विसावा मिळतो आणि इथेच त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकली जाते आणि त्यांना स्वतःची ओळखसुद्धा इथेच होते. बालपण कधीच सोपं नसतं. भय आणि असाहाय्य अन्सर्टन आपल्यालाही वाटलं आहे, तसेच त्यांनाही वाटतं. बालदिन परवा झाला, पण तो साजरा करा एखाद्या मुलाशी सहज गप्पा मारून, त्यांच्याशी खेळून, त्यांना तुमचा वेळ देऊन आणि जमल्यास, हे सगळं करत असताना त्यांच्याइतकंच लहान होऊन. मला आपलं भवितव्य या लहान मुलांमध्ये दिसतं, ते उज्ज्वल आहे. संपूर्ण विश्व त्यांच्या डोळ्यांत दिसतं. तुम्हाला काय दिसतंय?
- रानी राधिका देशपांडे
[email protected]