ब्रिटिश साम्राज्यनिर्मितीचा इतिहास

    12-Nov-2025
Total Views |

वैचारिक निर्वसाहतीकरणाचा संकल्प घेण्यापूव त्याची उभारणी ज्या राजकीय वसाहतींच्या साम्राज्यातून झाली आहे, त्याचे केवळ वस्तुनिष्ठ यथार्थ आकलन न करता, दोन्ही बाजूंच्या वैचारिक भूमिका लक्षात घेत, सांस्कृतिक आकलनही तितकेच आवश्यक आहे.

निर्वसाहतीकरणाचा वैचारिक लढा समजून घ्यायचा असेल, तर त्याआधी त्याच्या राजकीय लढ्याचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. आपण ज्याला आज ‌‘युरोपीय वैचारिक प्रभाव‌’ म्हणतो आणि त्या एकांगी विचारापासून मुक्ती मिळवून आपल्या सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात एक नवे वैचारिक विश्व उभे करण्याची कल्पना करतो, तो युरोपीय वैचारिक व सांस्कृतिक प्रभाव कोणत्या एका साम्राज्यवाद अथवा वसाहतवाद अशा आधी ठरवून केलेल्या धोरणानुसार निर्माण झालेला नाही. अमेरिकन भूभागावर पोहोचण्यासाठीच्या जलमार्गांवर युरोपीय प्रभुत्व स्थापित झाल्यानंतर घडत गेलेल्या ऐतिहासिक घटनांची कार्यकारणसाखळी याला कारणीभूत आहे. या घटनाचक्राला अर्थात पुनरुज्जीवन आणि प्रबोधन कालखंडातील युरोपमधील वैचारिक घुसळणीचीही पार्श्वभूमी आहे. वसाहतीकरणाच्या आणि जगाच्या युरोपीकरणाच्या या वैचारिक प्रकल्पाचे वाहकशरीर असलेल्या भूराजकीय आणि आर्थिक वसाहतवादाची प्राथमिक ओळख करून घेणे, यासाठी आवश्यक आहे. परंतु, ब्रिटिश साम्राज्याचा इत्थंभूत इतिहास जाणून घेणे हा इथे उद्देश नसून, वैचारिक निर्वसाहतीकरणाच्या संदर्भात त्याची संगती कशी पाहावी लागते, ते आपण प्रामुख्याने पाहू.

ब्रिटिश इतिहासातील साम्राज्यनिर्मितीसाठी सर्वाधिक महत्त्वाची ठरलेली घटना म्हणजे, औद्योगिक क्रांती. साधारण अठराव्या शतकाच्या मध्यात इंग्लंडमध्ये उत्पादनाच्या यांत्रिकीकरणासंबंधी अनेक महत्त्वाची संशोधने केली गेली. या संशोधनांमध्ये वस्त्रोद्योग, पोलादनिर्मिती आणि दळणवळण हे प्रमुख उद्योग होते. औद्योगिक क्रांतीमुळे जागतिक बाजारपेठेत उत्पादनाच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल झाले आणि जगाच्या अर्थकारणाची आणि त्यातील वित्तप्रवाहाच्या ओघाची दिशा बदलण्यास सुरुवात झाली. परंतु, औद्योगिक क्रांती हा केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि शास्त्रीय कारणमीमांसा पद्धतीची वाढती स्वीकारार्हता, यामुळे घडून आलेला बदल नव्हता. त्यामागे अनेक भूराजकीय आणि आर्थिक कारणेसुद्धा आहेत, ज्याचे वस्तुनिष्ठ विवेचन होतेच असे नाही.

ब्रिटिश साम्राज्याच्या इतिहासाची सुरुवात अमेरिकेतील वसाहतींपासून करावी लागेल. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील 13 वसाहती, वेस्ट इंडीज परिसरातील बेटे आणि अन्य भूभाग ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यापासून अमेरिका खंड हा इंग्लंडचा कच्च्या मालाचा पुरवठादार राहिलेला होता. अचानक प्राप्त झालेली विस्तीर्ण जमीन आणि आफ्रिकन गुलामांच्या रूपात उपलब्ध असलेले शेतमजूर यांच्या जोरावर अमेरिकन भूमीतून कपाशीचा आणि लाकडाचा मोठा पुरवठा इंग्लंडला होत असे. या कच्च्या मालाचा पुरवठा इंग्लंडच्या कापड उद्योगास चालना देण्यात एक महत्त्वाचा घटक निश्चित होता. लाकडाचा उपयोग नौकाबांधणीत मोठा होता. या सर्व व्यापारास सुरक्षितता लाभावी, म्हणून या काळात इंग्लंडने त्यांचे आरमार वाढवण्यास सुरुवात केली. ‌‘ईस्ट इंडिया कंपनी‌’ची स्थापना या काळात झाली होती. पण, तिची व्याप्ती सुरत आणि अन्य काही बंदरे एवढीच होती. सतरावे शतक ते अठराव्या शतकाचा मध्य या काळात ब्रिटिश राष्ट्र हे एक दर्यावद आणि व्यापारी वृत्तीचे छोटे राज्य होते, ज्यांची स्पर्धा अन्य युरोपीय राष्ट्रांशी होती.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात घडलेल्या महत्त्वाच्या घटना म्हणजे, प्लासीची लढाई, औद्योगिक क्रांती आणि अमेरिकेचे स्वातंत्र्य. जगाच्या तीन भागात घडलेल्या या घटना ब्रिटिश साम्राज्यनिर्मितीच्या संदर्भात एकत्र पाहाव्या लागतात. किंबहुना, ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीस या दोन्ही घटनांचा प्रत्यक्ष हातभार आहे. आपण आजच्या जगात पाहतो की, एखादे तंत्रज्ञानात्मक संशोधन जर व्यावहारिक यशासाठी वापरायचे असेल, तर संशोधनापासून उत्पादननिर्मिती या मार्गाने वाटचाल करावी लागते. या मार्गक्रमणेसाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते. औद्योगिक क्रांतीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या संशोधनांना व्यावहारिक उत्पादननिर्मितीपर्यंत घेऊन जाण्यास आवश्यक भांडवल अमेरिकन स्वातंत्र्यापूव तिथून मिळणाऱ्या आणि प्लासीच्या लढाईनंतर बंगाल प्रांतातून मिळणाऱ्या कररुपी उत्पन्नातून मिळत होते. कारखान्यांतून तयार झालेल्या उत्पादनांचे नवीन ग्राहकही भारतीय भूभागातून मिळू लागले होते. अशा प्रकारे औद्योगिक क्रांती काळाच्या उंबरठ्यावर उभ्या राहिलेल्या एका व्यवस्थेचा स्वाभाविक स्वीकार होता.

परंतु, मोठ्या प्रमाणात भांडवलाचा पुरवठा इतक्यावर औद्योगिक क्रांतीची कारणमीमांसा संपत नाही. त्याला अजून एका घटकाची जोड आहे ती म्हणजे, इंग्लंड अथवा युरोपची आणि अन्य जगाची बाजारनियंत्रण पद्धत. अठराव्या शतकापूवचा जागतिक व्यापार हा राजकीय प्रभावापासून बराचसा अलिप्त आणि मुख्यतः मौल्यवान पदार्थांच्यापुरता मर्यादित होता. औद्योगिक क्रांतीमुळे निर्माण झालेले इंग्लंडमधील अतिरिक्त उत्पादन विकण्यासाठी इंग्लंडने काही नवीन व्यापारी तत्त्वे अंगीकारली. व्यापाराच्या अधिकाराचे करार आणि सोयीनुसार मुक्त व्यापाराचे आणि एकाधिकारशाहीचे परवाने, हा त्यातील मुख्य भाग होता. प्रशासनिक अधिकाऱ्यांच्याऐवजी कंपनी कर्मचाऱ्यांकडून करआकारणीसारखी मुलखी कामे करून घेतल्याने भारतातील वसाहतींवर कंपनीचे थेट राज्य असल्याचीही परिस्थिती काही काळ निर्माण झाली. या सर्वांचा एक परिणाम असा झाला की, जगात अन्यत्र कुठेही तंत्रज्ञानात्मक संशोधन घडण्यास आवश्यक भांडवलाचे पाठबळ उरले नाही. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीला त्यांच्या नौ-सामरिक शक्तीची जोड मिळाल्याने याच प्रकारची क्रांती अन्यत्र घडू नये, अशी तजवीज केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. या व्यवस्थेला अजून जोड मिळाली ती युरोपसारखी पेटंट पद्धत जगात अन्यत्र कुठे नसल्याची. त्यामुळे कितीही स्थानिक पातळीवरील संशोधने जगात अन्यत्र झालीही असतील तरी त्यांचे रूपांतर मोठ्या प्रमाणात यांत्रिक उत्पादन करण्यात झाले नाही. कारण, उत्पादनामागचे दृष्टिकोनच तसे नव्हते.

19व्या शतकाचा पूर्वार्ध हा ब्रिटिश साम्राज्याच्या खऱ्या अर्थाने पायाभरणीचा काळ म्हणता येईल. याच काळात भारतात कंपनीची सत्ता संपूर्ण भारतभर पसरून स्थिरपद झाली आणि आफ्रिकेत किनाऱ्यांवर उभारलेल्या वसाहती सोडून अंतर्भागात मोहिमा राबविल्या गेल्या. आफ्रिकेत सापडलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा या काळातील साम्राज्यविस्तारात मोठा वाटा आहे. गुलामांचा व्यापार या काळापर्यंत बराचसा बंद झालेला होता. परंतु, आफ्रिकेच्या अंतर्भागात खनिजे, वनसंपत्ती, हस्तिदंतासारख्या मौल्यवान वस्तू युरोपियनांना कवडीमोल दरात उपलब्ध झाल्या. संपत्तीच्या वृद्धीचे औद्योगिक उत्पादनाचे तंत्र त्यांना अवगत झाले होते. कच्च्या मालाचा नवीन स्वस्त पुरवठा, भारतासारख्या देशातून मिळालेले नवीन स्वस्त मनुष्यबळ यांच्या जोरावर युरोपच्या आर्थिक प्रगतीचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामरिक आणि राजकीय प्रभुत्वाचा गाडा चालतच राहिला. याच काळात प्रथम ब्रिटनमध्ये वसाहतींवर राज्य करण्यासाठी आवश्यक धोरणांचा विचार सुरु झाला आणि त्याच्या केंद्रस्थानी भारत होता.

परंतु, ब्रिटन अथवा युरोप एका विशिष्ट मानसिकतेतून घडत असले, तरी संपूर्ण जगाची वैचारिक दिशा अजून बदललेली नव्हती. या बदलाला कारणीभूत ठरली ब्रिटिश शिक्षणपद्धती. 1857चा उठाव हा भारतीय राज्यकर्त्यांनी केलेला ब्रिटनविरुद्धचा शेवटचा उठाव होता. त्यानंतर भारतीय समाजमनावरील राजघराण्यांचा प्रभाव कमी होत गेला. हा उठाव यशस्वी ठरला असता, तर जागतिक इतिहास कशाप्रकारे बदलला असता, याचे विवेचन करण्यात अर्थ नाही. परंतु, युरोपचे वैचारिक श्रेष्ठत्व मान्य करण्याची परंपरा या उठावानंतरच्या बदललेल्या सामाजिक घडणीत दिसून येते. या उठावानंतरचा दुसरा स्वातंत्र्याचा प्रयत्न म्हणजे, 1885 सालची काँग्रेसची स्थापना. हा ब्रिटिश पद्धतीने ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न होता. याच काळात भारताच्या पूर्वेस अरब प्रदेश आणि इजिप्तवर ब्रिटनचे प्रभुत्व प्रस्थापित झाले होते. इजिप्तवरील प्रभुत्व हे सुएझ कालव्यावर ताबा राखण्यासाठी होते. आफ्रिकन अंतर्भागातही सर्व युरोपियन राष्ट्रांनी वसाहती स्थापन केल्यानंतर त्यांच्यात युद्धे नकोत, म्हणून आफ्रिकेच्या विभाजनाची बर्लिन परिषद 1884 साली झाली.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस सुरु केलेला हा साम्राज्यनिर्मितीचा उद्योग एका परीने शंभर वर्षांत पूर्णत्वास गेला, असे म्हणता येईल. याच काळात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या प्रदेशांमध्ये तडीपार आणि निर्वासित गुन्हेगारांच्या वसाहतींमधून सुरु झालेला प्रवास मोठ्या प्रमाणात स्थानिक प्रभुत्व मिळवण्यापर्यंत पोहोचला. जगभरात पसरलेल्या ब्रिटिश साम्राज्याच्या ज्या कथा आपण ऐकतो, त्यांचा सुवर्णकाळ एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध म्हणता येईल. परंतु, या सुवर्णकाळात पोहोचण्यापूव सव्वाशे वर्षे अमेरिका स्वतंत्र झालेली होती आणि या काळापर्यंत एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून नावारूपास येत होती. भारतात आणि इतरत्र मर्यादित स्वातंत्र्याचे प्रयत्न सुरु झालेच होते. त्यामुळे श्रेष्ठ अशा ब्रिटिश साम्राज्याचा सुवर्णकाळ क्षणभंगुरच होता आणि खऱ्या अर्थाने ते जागतिक कधीच नव्हते, असे जागतिक परिप्रेक्ष्यात म्हणावे लागते.

साम्राज्यनिर्मितीच्या घटनासाखळीकडे तटस्थपणे पाहिल्यास असे दिसते की, ब्रिटिश अथवा युरोपीय समाजाच्या कोणत्याही अंगभूत गुणांचा वाटा या सर्व इतिहासक्रमात नव्हता. औद्योगिक क्रांतीच्या कालखंडात असलेली ब्रिटिश प्रयोगशील वृत्ती साधारण त्याच काळात युरोपात अन्यत्रही होती आणि धर्मपालांनी ब्रिटिश संदर्भांतूनच दाखवल्यानुसार भारतातही होती. विज्ञान-तंत्रज्ञानाविषयीचा विशिष्ट दृष्टिकोन, भांडवलाची उपलब्धता आणि नौ-सामरिक बळाच्या आधारावर स्थापन केलेली व्यापारी एकाधिकारशाही यांच्या जोरावर औद्योगिक क्रांतीची सुरुवात ब्रिटनमध्ये झाली. त्यानंतर तत्सम तंत्रज्ञानात्मक प्रगती कुठेही घडणार नाही, याची काळजी वित्तपुरवठ्याचे प्रवाह आणि बाजारपेठेचा अदृश्य हात यांनी घेतली. ब्रिटनचे जागतिक वर्चस्व हा अठराव्या शतकाच्या मध्यात जागतिक भविष्यासाठी एक कमी महत्त्वाचा पर्याय होता. तो पर्याय प्रत्यक्षात उतरला म्हणून ब्रिटिश अथवा युरोपीय समाजाकडे काही गुणश्रेष्ठत्व होते, असे समजणे मोठी चूक ठरेल. ब्रिटिश समाजाची उद्यमशीलता नाकारणे, हा अशा मांडणीचा उद्देश असू नये, ब्रिटिशांनी घेतलेल्या परिश्रमाचे महत्त्व या घटनाक्रमामागे आहेच. परंतु, त्याचबरोबर त्या काळातील अन्य समाजांची संकल्पनात्मक भूमिका आणि ब्रिटिशांबरोबर व्यापार करतानाची त्यांची स्वीकाराची आणि खुल्या व्यापारी व्यवहारांची तत्त्वे यांचाही या घटनाक्रमास हातभार लागला आहे. वैचारिक निर्वसाहतीकरणाचा संकल्प घेण्यापूव त्याची उभारणी ज्या राजकीय वसाहतींच्या साम्राज्यातून झाली आहे, त्याचे केवळ वस्तुनिष्ठ यथार्थ आकलन न करता, दोन्ही बाजूंच्या वैचारिक भूमिका लक्षात घेत, सांस्कृतिक आकलन आवश्यक आहे. त्यापैकी युरोपीय वैचारिक भूमिकेतून आकलन अनेकदा झालेले आहे. भारतीय अथवा अन्य वसाहतींच्या दृष्टिकोनातून साम्राज्यनिर्मितीच्या इतिहासाचे आकलन या घटनाक्रमाचे सर्वांगीण मूल्यमापन करण्यास आवश्यक आहे.

- डॉ. हर्षल भडकमकर
(लेखकाने मुंबईतील ‌‘टीआयएफआर‌’ येथून खगोलशास्त्रात ‌‘पीएच.डी.‌’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून ‌‘प्रज्ञा प्रवाह‌’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)
9769923973