‌‘बाबरी‌’च्या बदल्यासाठी ‌‘पांढरपेशांचा दहशतवाद‌’

    16-Nov-2025
Total Views |

‌‘१०/११‌’चा दिल्ली आत्मघातकी हल्ला हा सर्वच बाबतीत भयंकर ठरला. हे दहशतवादाचे नवे मॉड्यूल असून ‌‘पांढरपेशांचा दहशतवाद‌’ असे त्याचे स्वरूप. हा एक कट नसून, मोठ्या व्यापक कटाचा एक भाग असल्याचे म्हटले जाते. ‌‘बाबरी‌’चा बदला घेण्यासाठी दिल्लीत दि. ६ डिसेंबरला सहा ठिकाणी असे आत्मघातकी हल्ले घडवण्याचा मोठा कट शिजला होता. आठजणांच्या दोन-दोनच्या जोडीने चार शहरांमध्ये (यात दिल्ली, अयोध्या यांचा समावेश) आत्मघातकी हल्ला करायचे ठरवले होते, असे अनेक धागेदोरे तपास यंत्रणेच्या हाती लागले आहेत. म्हणूनच ‌‘फरिदाबाद मॉड्यूल‌’ हा समस्त भारतीयांसाठी एक धक्का आहे. सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे मोठा घातपात उघडकीस आला आहे, यात शंका नाही. पहलगामच्या जखमा अजून ताज्या असताना, हा दिल्लीचा धक्का सोसावा लागत आहे. आपल्याच कोशात आत्ममग्न असणाऱ्या हिंदूंसाठी हा धोक्याचा इशारा आहे. त्यानिमित्ताने या दहशतवादी हल्ल्यामागचे ‌‘फरिदाबाद मॉड्यूल‌’ आणि मुस्लीम समाजातील अतिरेकी धर्मांध मानसिकतेचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...

गेले महिनाभर देशातील वातावरण अक्षरश: ढवळून निघाले आहे. अनेक ठिकाणी दहशतवाद्यांची धरपकड, स्फोटके सापडणे, त्यातच दिल्लीला दि. १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू होणे आणि याचप्रमाणे आणखीन मोठा धक्का म्हणजे, हे सर्व घडवणाऱ्या उच्च शिक्षित इस्लामी डॉक्टरांचे ‌‘फरिदाबाद मॉड्यूल!‌’ त्यातही महिला डॉक्टरांचा सहभाग. हा सगळा एका व्यापक कटाचाच भाग. बाबरी ढाँचा पाडला म्हणून बदला घेण्यासाठी दि. ६ डिसेंबरला संपूर्ण देश पुन्हा हादरवणे आणि धार्मिक तेढ निर्माण करून निरपराध जनतेचा बळी घेणे, हेच या व्यापक कटामागचे खरे षड्यंत्र असल्याचे उघडकीस आले आहे.

एखाद्या काल्पनिक चित्रपटाची कथा वाटावी, तशा झपाट्याने घडामोडी वास्तवात घडलेल्या असून, पहलगामच्या हल्ल्याच्या मानसिक धक्क्यातून जनता अजूनही पूर्णपणे सावरलेली नसताना समोर आलेल्या या भयंकर घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. आठवड्याभरात दिल्ली आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याशी संबंधित ज्या बातम्या समोर येत आहेत, त्या सर्वसामान्य नागरिकांची झोप उडवणाऱ्या आहेत.

दिल्लीचा १०/११ला झालेला हल्ला संपूर्ण देशाला नखशिखांत हादरवणारा ठरला. यानिमित्ताने उच्चशिक्षित डॉक्टर मॉड्यूल आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याचे नियोजन करते, हे दाहक वास्तव जगासमोर आले. महिन्याभरातील बातम्यांची सुसंगती लावली, तर एखादे कोलाजचे विखुरलेले तुकडे असावेत, असे वाटते आणि ते आता सांधले जात आहेत, तसतसे एक एक भयंकर चित्र आकार घेत चालले आहे.

थोडक्यात घटनाक्रमावर दृष्टिक्षेप

दिल्ली आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा सुगावा लागला तो पोस्टर प्रकरणाने. दि. १९ ऑक्टोबरला श्रीनगरच्या नौगाम परिसरात ‌‘जैश-ए-मोहम्मद‌’चे पोस्टर आढळले. त्यात सुरक्षा यंत्रणांना धमकी देण्यात आली होती. यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोस्टर लावणारे आरिफ निसार दार ऊर्फ साहिल, यासिर-उल-अशरफ आणि मकसूद अहमद दार ऊर्फ शाहीद हे तीन नौगामचे रहिवासी असल्याची ओळख पटली. त्यांच्याकडून माहिती मिळून जम्मू-काश्मीर पोलिसांनी शोपियान येथील मौलवी इरफान अहमद, जीएमसी श्रीनगरमधील पॅरामेडिकल स्टाफ सदस्य आणि नौगाम मशिदीचे इमाम यांना ताब्यात घेतले. ते पोस्टर लावण्यात डॉ. मुजम्मिल अहमद या मूळच्या पुलवामाच्या डॉक्टरलासुद्धा पकडण्यात आले. फरिदाबाद येथे अल-फलाह हॉस्पिटलच्या इमर्जन्सी विभागात कामाला होता.

दि. ५ नोव्हेंबरला मौलवी इरफानची सखोल चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, डॉ. आदिल राथेरला उत्तर प्रदेशातील सहारनपूरला अटक करण्यात आली. देशभरातील विविध शहरांमध्ये बॉम्बस्फोटांच्या नियोजनाची, स्फोटकांच्या साठवणुकीची ठिकाणे आणि त्यांचे इतर सहकारी डॉ. मुजम्मिल आणि डॉ. शाहीन सईद यांची माहिती उघड केली, तर शोपियान येथील मौलवी इरफान अहमद यांच्या फोनची तपासणी करताना एक टेलिग्राम चॅनेल समोर आले.

दि. ८ नोव्हेंबर : डॉ. आदिलच्या चौकशीच्या आधारे, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी फरिदाबाद पोलिसांच्या मदतीने हरियाणातील अल-फलाह विद्यापीठातून डॉ. मुजम्मिलला अटक केली. तो पुलवामाचा रहिवासी आणि फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून काम करणारा होता. त्याचा ‌‘जैश-ए-मोहम्मद‌’शी संबंध होता. दरम्यान, जीएमसी अनंतनाग येथील डॉ. आदिलच्या जुन्या लॉकरमधून ‌‘एके-४७’ रायफल जप्त करण्यात आली.

दि. ९ नोव्हेंबर : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा पोलिसांनी फरिदाबादमधील धौजा गावात डॉ. मुजम्मिलच्या भाड्याच्या खोलीतून स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त केला. तेथून २ हजार, ९०० किलो आयईडी साहित्य जप्त करण्यात आले, तर पुढील चौकशीत मॉड्यूलचा प्रमुख डॉ. उमर याचे नाव उघड झाले. दरम्यान, उत्तर प्रदेश एसटीएफने मुजम्मिलची मैत्रीण आणि ‌‘जैश-ए-मोहम्मद‌’च्या महिला शाखेची प्रमुख डॉ. शाहीन सईद हिला लखनौ येथून अटक केली. तिच्या कारमधूनसुद्धा ‌‘एके-४७’ जप्त करण्यात आली, तर डॉ. मुजम्मिलने त्याच्या कारमध्ये लपवलेली बंदूक फरिदाबादमधील कचराकुंडीत फेकली होती, जी नंतर जप्त करण्यात आली. डॉक्टर शाहीन ही ‌‘जमात-ऊल-मुमिनात‌’ या पाकव्याप्त काश्मीरच्या भारतातील आघाडीची प्रमुख होती.

दि. १० नोव्हेंबर : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात एका ‌‘आय-२०’ कारचा स्फोट झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की, या टोळीचा प्रमुख डॉ. उमर स्फोट झालेली कार चालवत होता. त्यानंतर ही कार लाल किल्ल्याजवळील सुनहेरी मशिदीच्या पार्किंगमध्ये सुमारे तीन तास उभी राहिली आणि संध्याकाळी ६.२२ वाजता निघाली. यानंतर ६.५२ वाजेच्या आसपास कारचा स्फोट झाला. काही तपासाधिकाऱ्यांच्या दृष्टिकोनातून या कारमध्ये जी स्फोटके होती, ती पूर्णपणे तयार नव्हती. मात्र, नियोजनाआधीच स्फोट झाला.

दि. ११ नोव्हेंबर : लाल किल्ला स्फोटानंतर पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. पोलिसांनी पुलवामामध्ये अनेकजणांना ताब्यात घेण्यात आले. गंदरबलचा जमीर अहमद अहंगर ऊर्फ मुतलाशा आणि मेवातचा मौलवी हाफिज मोहम्मद इश्तियाक यांचा समावेश आहे.

यापुढेसुद्धा तपास चालू असून, दिल्लीमध्ये दि. ६ डिसेंबरला सहा वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट शिजलेला होता; त्यासाठी ३२ गाद्यांचा वापर केला जाणार होता. हे निष्पन्न होते आहे.

पांढरपेशे दहशतवादी मॉड्यूल

दिल्लीच्या हल्ल्यातील दहशतवादी उच्चशिक्षित डॉक्टर सहभागी असल्याने हा हल्ला अनेकार्थांनी भयंकर आहे. डॉक्टर हे दहशतवादीसुद्धा असू शकतात, हेच मुळी धक्कादायक आहे. आपल्या मजहबच्या रक्षणासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी कट्टर मूलतत्त्ववादी लोकांची असते, हे त्यातून सिद्ध होते. आपले ध्येय ‌‘येन केन प्रकारेण‌’ साध्य करण्यासाठी आपल्या पवित्र व्यवसायाचे, नैतिकतेचे कोणतेही भान त्यांना उरत नाही. आपला डॉक्टरी पेशा त्यांनी आपले ‌‘कव्हर‌’ म्हणून वापरला आहे. सामान्य जनतेला कुणावर विश्वास ठेवावा, असा प्रश्न पडलेला आहे! जगभरात असे उच्चशिक्षित दहशतवादी आढळून येतात. अमेरिकेच्या ‌‘वर्ल्ड ट्रेड सेंटर‌’वर १९९३ मध्ये ट्रकमध्ये स्फोटके भरून जो हल्ला केला गेला होता, त्यात रामजी युसुफ याने त्याचे नियोजन केले होते. तो इंग्लंडमध्ये शिकलेला इलेक्ट्रिकल इंजिनिअर होता; तर अमेरिकेवरील ९/११चा हल्ला चढवणारे एअरोस्पेस इंजिनिअरिंग झालेले होते. त्यांनी परदेशात त्यांचे शिक्षण घेतलेले होते. ‌‘आयआयटी मुंबई‌’मध्ये केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या अहमद मुर्तझाने मोठा सुरा घेऊन गोरखनाथ मंदिरावर हल्ला चढवला होता. अशी उच्चशिक्षित दहशतवाद्यांची अनेक उदाहरणे देता येतील.

म्हणजेच उच्चशिक्षण आणि नैतिकता यांचा संबंध नाही, असे यानिमित्ताने पुनश्च अधोरेखित झाले आहे. उच्चशिक्षणाने व्यक्तीच्या बौद्धिक कक्षा रुंदावतात आणि स्वभान जागृत होते. पण, धर्माप्रतिची कट्टरता त्यांच्या मनात इतकी खोलवर रुजलेली असते की, या दहशतवाद्यांनी त्या औपचारिक शिक्षणाचा गैरवापर करून आपले स्फोटक ध्येय साध्य केले जाते.

आत्मघातकी दहशतवाद्यांची मानसिकता

आत्मघातकी दहशतवादी हा कधी एका दिवसात तयार होत नाही; त्यासाठी काही काळ आधी तो कट्टर मूलतत्त्ववादी विचारांनी प्रभावित झालेला असतो. त्यासाठी मानसिक तयारी केली जाते. आपल्याला आपला मजहब वाचवण्यासाठी स्वतःचे बलिदान द्यावे लागले तरी चालेल, या निर्णयापर्यंत व्यक्ती टप्प्याटप्प्याने येते. आपला मृत्यू आपल्या ध्येयातील फक्त एक टप्पा आहे, हे त्याने स्वीकारलेले असते. स्वतःच्या श्रद्धा, प्रेरणा आणि व्यक्तिमत्त्व याचबरोबर सामाजिक, धामिक, आर्थिक परिस्थिती यांचा थेट प्रभावसुद्धा यावर पडतो. ती व्यक्ती स्वकोशात जाते आणि विद्ध्वंसक विचारांनी झपाटून जात आत्मघात करते. दिल्लीच्या घटनेत नेमके कितीजण आत्मघात करणार होते, त्याचा अजून तपास सुरू आहे. पण, त्यांची तयारी गेल्या दोन वर्षांपासून चालू होती.

शैक्षणिक मॉड्यूलची सुरुवात?

उच्चशिक्षण व्यक्तीला व्यापक संधी तर देतेच, पण तिच्या वैचारिक कक्षा रुंदावते, हा समज साफ खोटा ठरवणारा हा हल्ला आहे. शिक्षणच काय, पण जीवसुद्धा तथाकथित धर्मरक्षणासाठी वापरणारे हे दहशतवादी मॉड्यूल आहे. आता अल-फलाह वैद्यकीय महाविद्यालय चौकशीच्या कक्षेत आहे. अल-फलाह विद्यापीठ ‌‘अल-फलाह चॅरिटेबल ट्रस्ट‌’चा हा एक उपक्रम आहे. ‌‘अल-फलाह स्कूल ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी‌’, ‌‘ब्राऊन हिल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी‌’ आणि ‌‘अल-फलाह स्कूल ऑफ एज्युकेशन ॲण्ड ट्रेनिंग‌’ याला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने मान्यता दिलेली नाही. अल-फलाह विद्यापीठाच्या खोलीतून सांकेतिक भाषेत लिहिलेली डायरी मिळाली असून, ती दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंधित आहे. विद्यापीठाच्या वेबसाईटवर खोटे दावे असल्याचे दिसून आले आहे. या संस्थेतील कितीजण या कटात सहभागी होते किंवा कितीजणांची मूकसंमती होती, याचा तपास सुरू आहे. इतक्या मोठ्या दहशतवादी कारवाया शैक्षणिक आवारात कशा चालू राहू शकतात, हा खरा प्रश्न आहे.

कट्टरतेचा प्रवास - मध्य-पूर्वेकडून दक्षिण आशियाकडे

‌‘अल कायदा‌’, ‌‘इसिस‌’ भारताबाहेरील संघटना कधी इथे फोफावल्या त्याचा विचार केला पाहिजे. मध्य-पूर्वेत असणाऱ्या आणि ‌‘इस्लामिक स्टेट‌’ तयार करू इच्छिणाऱ्या कट्टर इस्लामिक दहशतवादी संघटना हळूहळू थेट दक्षिण आशियात घुसल्या आहेत. भारतात ‌‘पीएफआय‌’सारख्या संघटनेलासुद्धा परदेशातून आर्थिक मदत मिळत होती. नुकतेच दि. ९ ऑक्टोबरला पुण्यात दहशतवादविरोधी पथकाने १९ ठिकाणी छापेमारी केली होती आणि ‌‘इस्लामिक स्टेट‌’च्या काही ‌‘स्लीपर सेल‌’ना पकडले होते. मोहम्मद अदनान खानला दि. १६ ऑक्टोबर (म्हणजेच अबू मुहरिब) दिल्ली आणि अदनान खानला दि. १८ ऑक्टोबर (म्हणजेच अबू मोहम्मद) यांना भोपाळहून अटक केली गेली. ‌‘इस्लामिक स्टेट‌’च्या ऑनलाईन मॉड्यूलशी ते जोडलेले होते. त्यांना सीरियातून सूचना मिळत होत्या. दिवाळीच्या दरम्यान घातपाताचा त्यांचा डाव पोलिसांनी आधीच उधळून लावला होता. दि. २७ ऑक्टोबरला पुण्यातून झुबेर हंगरगेकर याला पुण्यातून अटक केली गेली. ‌‘अल कायद्या‌’शी संबंध आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर असणाऱ्या दहशतवाद्याशी संबंध असल्याच्या कारणावरून त्याला अटक केली गेली.

दिल्ली प्रकरणातील डॉ. उमर ऊन नबी आणि डॉ. मुजम्मिल यांनी २०२२मध्ये तुर्कीयेला भेट दिली होती. ती कोणत्याही वैद्यकीय बैठकीसाठी नाही, तर ‌‘जैश-ए-मोहम्मद‌’च्या म्होरक्यांना भेटायला गेले होते. २०२१मध्ये त्यांनी नेपाळ, युनायटेड अरब अमिराती आणि सौदी अरेबियालासुद्धा भेट दिली होती. ते दोघे पुलवामाचे रहिवासी होते आणि फरिदाबादला वैद्यकीय महाविद्यालयात एकत्र काम करीत होते. दोघांनी लाल किल्ल्याजवळ (जिथे आता स्फोट झाला त्याजवळ) आणि चाँदनी चौक या ठिकाणी जानेवारीत ‌‘रेकी‌’ केली असल्याचे त्यांच्या मोबाईलच्या तपासणीतून निष्पन्न झाले आहे. या दोघांना आणि डॉ. आदिल अहमद राथेर आणि डॉ. शाहीन शाहीद यांना दोन ऑनलाईन अकाऊंटवरून सूचना मिळत होत्या. डॉ. उकाशा आणि डॉ. हाशीम ही त्या अकाऊंटची नावे आहेत. हे सर्व टेलिग्राम, सिग्नल असे अनेक ॲप्स वापरत होते. या सगळ्यांनी महाविद्यालय आणि प्रयोगशाळेचा यथेच्छ वापर केला होता. डॉ. उमर याने २६लाख रोख देऊन एनपीके खते विकत घेतली होती. (याद्वारे स्फोटके तयार करता येऊ शकतात.) हा पैसा कुठून आला, भारतात अनेक इस्लामी दहशतवादी संघटनांचे जाळे पसरले असून त्यांना कोण आणि कसा पाठिंबा देत आहे, असे अनेक प्रश्न आहेत. पण, सगळ्यात गंभीर प्रश्न आहे की, हे सगळे वास्तव अनुभवणारा, याच्या झळा सोसणारा हिंदू समाज, कधी आपल्या कोशातून बाहेर येणार आणि एकमुखाने इस्लामिक दहशतवादाच्या विरोधात उभा राहणार?

- रुपाली कुलकर्णी-भुसारी
(लेखिका ‌‘एकता‌’ मासिकाच्या संपादिका आहेत.)
9922427596