दिल्ली बॉम्बस्फोटामागील जिहादी षड्यंत्राचे धागेदोरे समोर आल्यानंतर, अपेक्षेप्रमाणे काँग्रेससह काही विरोधकांनी दहशतवाद्यांच्या, त्यांच्या धर्माच्या समर्थनार्थ मोर्चेबांधणी केली, तर एरवी पुरोगामित्वाचा, मानवाधिकारांचा टेंभा मिरवणार्या विचारवंतांच्या गोटात अजूनही सामसूमच! दहशतवाद्यांचे समर्थन आणि या प्रकरणातील काहींची सामसूम हे दोन्हीही विरोधकांचा बुरखा फाडणारेच!
इंग्रजीतील ‘६’ हा आकडा विशेष आहे. कारण, तो उलटा लिहिल्यास ‘९’ बनतो. म्हणजेच या आकड्याकडे दोन विरुद्ध दिशांनी पाहिल्यास त्याचे मूल्य बदलते. दिल्लीतील बॉम्बस्फोटावर विरोधी पक्षांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियादेखील अशाच ‘६’ आकड्याकडे उलट्या दिशेने पाहणार्या आहेत. दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटांतील आरोपी हे पेशाने डॉटर, म्हणजेच उच्च विद्याविभूषित आहेत, ही गोष्ट जाहीर झाल्यावर सामान्य लोकांमध्ये त्याबद्दल विस्मयाची प्रतिक्रिया उमटली होती. इतके सुशिक्षित आणि आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या या लोकांनी दहशतवादाचा मार्ग स्वीकारावा, यावर बहुसंख्य लोकांना जितके आश्चर्य वाटत होते, तितकीच चीडही आली होती. डॉटरी पेशा हा लोकांचा जीव वाचविण्याचा पेशा असताना हे डॉटर हजारो निरपराधांचे बळी घेण्याचे कट रचीत होते, याबद्दल सामान्य लोकांमध्ये प्रक्षोभ उसळला. तो स्वाभाविकही होता. पण, विरोधकांची प्रतिक्रिया ही राजकीय लाभ उठविण्याच्या हेतूने केलेली होती. तेही अर्थात अपेक्षितच म्हणावे लागेल.
सुशिक्षित आणि उच्च विद्याविभूषित मुस्लिमांना दहशतवादी का व्हावेसे वाटते, असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी उपस्थित केला. तो अगदी रास्तच! त्याचे साधे उत्तर हे आहे की, त्यांना काही धर्मगुरूंनी धर्मांधतेचे विष पाजले होते. त्यामुळे त्यांची मानसिकता ही कट्टरतेकडे वळली होती. खरे तर चिदंबरम यांच्या प्रश्नाचा बोलण्याचा रोख वेगळा असायला हवा होता. ‘भारतात राहून ज्यांनी इतके उच्चशिक्षण घेतले आणि तेही डॉटरकीसारख्या सात्त्विक पेशाचे, त्यांना या ज्ञानाचा विनियोग सामान्यांच्या उपयोगासाठी का करावासा वाटला नाही,’ असा प्रश्न त्यांनी विचारायला हवा होता. कारण, या आरोपी डॉटरांवर कोणताही अन्याय झाला नव्हता. सरकारी पैशावर डॉटर झाल्यावरही ते आपल्याच देशबांधवांचे मुडदे पाडण्याचे कट रचत होते.
लक्षावधी हिंदू प्रेक्षकांनी दिलेल्या पसंतीच्या पावतीमुळे गडगंज संपत्ती आणि लोकप्रियता कमावलेल्या काही मुस्लीम अभिनेत्यांना भारतात अचानक असुरक्षित वाटू लागते. त्याचे कारण त्यांना एकाएकी आपल्या धर्माची आठवण येते. इतकी भीती वाटूनही ते परदेशात स्थलांतरित का होत नाहीत, याचे कोडे त्यांच्या चाहत्यांनाही पडते. पण, ज्या हिंदू प्रेक्षकांनी त्यांचा धर्म न पाहता त्यांच्यावर आपल्या प्रेमाची बरसात केली, त्यांना श्रीमंत बनविले, त्यांच्याबद्दल या मुस्लीम अभिनेत्यांना कसलीच आपुलकी नाही, हे या अभिनेत्यांनी, विचारवंतांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिलेली नाही, यावरून दिसून येते. ते त्यांच्या दांभिक आणि भेकड मनोवृत्तीचे सूचक आहे. त्याचप्रमाणे या उच्चशिक्षित मुस्लीम डॉटरांनाही अचानक आपल्या धर्माची सेवा कराविशी वाटू लागली होती. त्यांच्या धर्मात धर्माची सेवा करण्याची पद्धता जरा वेगळी आहे आणि तीच ते अनुसरत होते, अन्यथा ज्या सरकारी आणि करदात्यांच्या पैशाच्या मदतीने त्यांनी ही डॉटरची पदवी घेतली, त्याबद्दल त्यांच्या मनात भारतीय लोकांबद्दल सहानुभूतीची भावना असायला हवी होती.
या दहशतवाद्यांचा संबंध काश्मीरमधील दहशतवादी संघटनांशी होता. मुळात या व्यापक कटाची उकलही श्रीनगरमध्ये चिकटविण्यात आलेल्या ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेच्या पोस्टरच्या चौकशीतून झाली होती. त्यामुळे काश्मिरी नेत्यांच्या प्रतिक्रियाही अपेक्षेप्रमाणे असून, त्या मूळ समस्येला बगल देणार्याच आहेत. ‘पीडीपी’च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी पोलीस अधिकारी या आरोपींच्या कुटुंबीयांची का चौकशी करीत आहेत, त्यांना ते का आरोपी ठरवीत आहेत, असे म्हटले आहे. जे मूळ आरोपी आहेत, त्यांच्या कृत्याबद्दल त्यांनी एकही शब्द उच्चारलेला नाही. कोणत्याही गुन्ह्याची चौकशी करताना त्यातील आरोपीच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जातेच. ती अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. पण, येथे आरोपींचे काही नातेवाईकही दहशतवादाशी संबंधित होते, ही गोष्ट उघड झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी होणे अटळच होते. त्यात त्यांना आरोपी ठरविण्याचा प्रश्न कोठे येतो? पण, या मेहबूबाबाईंचे या दहशतवाद्यांबद्दल काय मत आहे, ते अजून गुलदस्त्यातच आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही तोंडात मिठाची गुळणी धरली आहे.
काँग्रेस काय किंवा अन्य विरोधी पक्ष काय, यांच्याकडून सामान्य माणसाच्या गरजेच्या मुद्द्यांवर आवाज उठविला जाईल, ही अपेक्षा आता जनतेनेच सोडून दिली आहे. उलट त्यांना सामान्य जनतेचे जीवन अधिक खडतर करणार्या प्रवृत्ती आणि संघटनांची बाजू घेताना पाहून त्यांच्याबद्दल सामान्यांचा भ्रमनिरास होत आहे. स्फोटाच्या दुसर्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या दौर्यावर गेल्याबद्दल टीका करणार्या काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी हे आज कोठे आहेत? त्यांनी या स्फोटातील जखमींची विचारपूस केली काय? त्यांच्या पक्षातील का तरी बड्या नेत्याने या जखमींची विचारपूस केली काय? त्याचे उत्तर नाही असे आहे. हिंदूंना हिंसक म्हणणारे राहुल गांधी आता मुस्लिमांना हिंसक म्हणतील काय?
ज्याप्रमाणे मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी हल्ला झाला असतानाही राहुल गांधी पार्टी करण्यात मश्गुल झाले होते, त्याप्रमाणे मोदी भूतानला मौजमजा करण्यासाठी गेले नव्हते. त्या देशाशी असलेले राजनैतिक आणि सामरिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी ते गेले होते. तेथून परतल्यावर त्यांनी थेट रुग्णालयात जाऊन या स्फोटातील जखमींची विचारपूस करून त्यांना धीर दिला. स्फोटाच्या रात्रीच गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली होती. अमित शाह यांनीही यातील जखमींची भेट घेतली होती. पण, युवराज राहुल गांधी कोठे आहेत, त्याचे उत्तर काँग्रेसजनांकडेही नसेल.
आम आदमी पक्षाने या स्फोटानंतर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा राजीनामा मागितला होता. या पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात गेल्यावरही आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नव्हता. न्यायालयाने त्यांच्याकडील मुख्यमंत्रिपदाचे सर्व अधिकार काढून घेऊन त्यांची बेअब्रू केली होती, तरीही ते खुर्चीला लोंबकळत राहिले होते. अशा या पक्षाला कोणाचाच राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. दुसरे असे की, एरवी ‘गंगाजमुनी तहजीब’ वगैरे भंपक ज्ञान देणारे कथित मुस्लीम ‘विचारजंत’ अजूनही गप्प का आहेत? कसल्याही बिनमहत्त्वाच्या मुद्द्यावर सतत प्रतिक्रिया देणारे मुस्लीम पुरोगामी नेते आणि कथित बुद्धिजीवि हेही का गप्प आहेत?