मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भारतात प्रथमच निळी हाडे आणि हिरवे रक्त असणारा बेडूक आढळून आला आहे (Patkai green tree frog). सरीसृप शास्त्रज्ञांनी अरुणाचल प्रदेशमधून या बेडकाची नोंद केली आहे. मूळ भारतीय असणाऱ्या पटकाई ग्रीन ट्री फ्राॅगमध्ये (Gracixalus patkaiensis) निळी हाडे आणि हिरव्या रक्ताची नोंद संशोधकांनी केली आहे (Patkai green tree frog). तसेच यापूर्वी तिबेटमधून नोंद असणाऱ्या मेडॉग बबल-नेस्ट फ्रॉग किंवा मेडॉग स्मॉल ट्रीफ्रॉग (Gracixalus medogensis) नावाने ओळखल्या जाणाऱ्या बेडकाच्या अधिवासाचा विस्तार अरुणचाल प्रदेशमध्ये झाल्याची नोंदही त्यांनी केली आहे. (Patkai green tree frog)
मेडॉग बबल-नेस्ट फ्रॉग हा दक्षिण तिबेटमधील मेडॉग काउंटी या प्रदेशातील प्रदेशनिष्ठ बेडूक होता. मात्र, त्याचे वितरण ईशान्य भारताच्या लगतच्या अरुणाचल प्रदेशात विस्तारण्याची शक्यता होती. त्यामुळे टेगे ताजो, राधाकृष्ण उपाध्याय के., ए.एन.दीक्षित अकलाब्य सरमाह, सोनाली गर्ग आणि एस.डी. बीजू यांनी अरुणाचल प्रदेशामध्ये या बेडकाचे शोधकार्य राबवले. त्यावेळी त्यांना येथील टेल व्हॅली वन्यजीव अभयारण्य आणि तिवारीगाव येथे हा बेडूक आढळून आला. आकरविज्ञान आणि अनुवांशिक तपासणीनंतर हा बेडूक मेडॉग बबल-नेस्ट फ्रॉग असण्यावर शिक्कामोर्तब झाले.
पटकाई ग्रीन ट्री फ्रॉग हा भारतीय मूळ असलेला अरुणाचल प्रदेशमधून शोधलेला एक लहान वृक्ष बेडूक आहे. बेडकांच्या ग्रॅसिक्सालस या कुळातील भारतात आढळणारी एकमेव प्रजात म्हणजे पटकाई ग्रीन ट्री फ्रॉग. भारतीय बेडकांमध्ये निळी हाडे किंवा हिरवे रक्त आढळत नाही. मात्र, संशोधकांना नामदाफा राष्ट्रीय उद्यानात पटकाई ग्रीन ट्री फ्रॉगमध्ये निळी हाडे आणि हिरवे रक्त आढळून आले. त्यामुळे अशा प्रकारची शरीरवैशिष्ट्य असणारी ही भारतातील पहिली बेडूक प्रजात ठरली आहे.