मुंबईच्या किनारी समुद्र पक्ष्यांची वारी; दुर्मीळ समुद्री पक्ष्यांच्या दर्शनाला सुरुवात

    08-Jul-2025
Total Views |
rare pelagic seabird
छाया - मयुरेश परब


मुंबई (अक्षय मांडवकर) -
पावसाळी वातावरणामुळे खोल समुद्रातील दुर्मीळ समुद्री पक्ष्यांचे दर्शन मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर घडू लागले आहे (rare pelagic seabird). सध्या दक्षिण मुंबईच्या आकाशात मास्कड बूबी, लेसर फ्रिगेटबर्ड, विल्सनस् स्ट्रोम पेट्रेल नावाचे दुर्मीळ समुद्री पक्षी घिरट्या घालताना दिसत आहे (rare pelagic seabird). त्यामुळे या पक्ष्याला पाहून त्याचे छायाचित्र टिपण्यासाठी अनेक पक्षीनिरीक्षकांची पाऊले मुंबईच्या किनारी भागांकडे वळत आहेत. (rare pelagic seabird)
 
 
समुद्री पक्षी हे खोल समुद्रामध्ये अधिवास करण्यासाठी ओळखले जातात. ते सहसा मुख्य भूमीवर येत नाहीत. ते खोल समुद्रामध्ये अधिवास करतात. तिथल्या बेटांवरच या पक्ष्यांची वीणवसाहत असते. मात्र, पावसाळी हंगामात जोरदार वाऱ्यामुळे हे समुद्री पक्षी मुख्य भूमीवर फेकले जातात. यातील काही पक्षी जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेले पाहायला मिळतात, तर काही पक्षी हे आकाशात वाऱ्यावर घिरट्या घालताना नजरेस पडतात. यांमधीलच काही दुर्मीळ समुद्री पक्षी सध्या मुंबई महानगर परिसरात नजरेस पडत आहेत. खास करुन किनारी भागांमध्ये हे पक्षी प्रामुख्याने दिसून येत आहेत. मास्कड बूबी, फ्रिगेटबर्ड यांसारखे समुद्री पक्ष्यांच्या प्रजाती मुंबई महानगर प्रदेशात एकतर जखमी अवस्थेत किंवा आकाशात घिरट्या घालताना दिसत असल्याची माहिती पक्षीनिरीक्षक मयुरेश परब यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली.
 
 
दक्षिण मुंबईतील कुलाबा, गेट आॅफ इंडिया, ससून डाॅक, रेडिओ क्लब या भागांमध्ये प्रामुख्याने हे पक्षी दिसत आहेत. मयुरेश परब यांना ससून डाॅकवर मास्कड बूबी, अमोल लोपेज यांना अर्नाळाला फ्रिगेटबर्ड, हार्दिक दयाळ यांना अर्नाळ इथेच विल्सनस स्ट्रोम पेट्रेल आणि अक्षय शिंदे यांना रेडिओ कल्ब इथे काॅमन टर्न दिसला. त्यामुळे या पक्ष्याचे छायाचित्र टिपण्यासाठी पक्षीनिरीक्षक दक्षिण मुंबईत येत्या काही दिवसात गर्दी करणार आहेत. ससून बंदर परिसर बंद केला असल्याने त्याठिकाणी समुद्री पक्ष्यांचे निरीक्षण करणे शक्य होणार नसल्याचे दिसत आहे. लेसर फ्रिगेटबर्ड हा पक्षी ७५ सेमीचा म्हणजेच जवळपास २ फूट लांबीचा असला तरी, तो फ्रिगेटबर्ड प्रजातीमधील आकाराने सर्वात लहान पक्षी आहे. हिंद महासागर आणि पॅसिफिक महासागरात हा पक्षी आढळतो. मालदीव, ख्रिसमस बेटांवर या पक्ष्याच्या वीणवसाहती आढळतात. प्रजनन हंगामाच्या व्यतिरिक्त हा पक्षी सुमारे १० हजार किलोमीटरपर्यंत प्रवास करत असल्याच्या नोंदी आहेत.
 
 
जखमी समुद्री पक्ष्यांवर उपचार
कर्जत, उरण आणि गोराईत जखमी अवस्थेत सापडेल्या मास्कड बूबी पक्ष्यांवर आम्ही उपचार करत आहोत. यामधील एका पक्ष्याच्या मृत्यू झाला आहे. समुद्रीपक्षी जेव्हा अशक्त होतात, तेव्हाच ते जोरदार वाऱ्याच्या वेगाबरोबर जमिनीच्या दिशेने फेकले जातात. जमिनीवर धडकल्यानंतर त्यांच्यासाठी हा परिसर नवखा असल्याने ते तणावपूर्ण परिस्थितीत असतात. अशा परिस्थितीत त्यांनी हाताळल्यास आणि त्यांना योग्य उपचार न मिळाल्यास त्यांचा मृत्यू होतो.- पवन शर्मा, प्रमुख - राॅ संस्था