स्टार कलाकार (भाग १)

    26-Jul-2025
Total Views |

पाण्यात पडले की पोहता येतेच मात्र, उत्तम मार्गदर्शन लाभल्यास मोठी प्रगती करता येते. सगळ्याच क्षेत्राचे तसेच आहे. बालरंगभूमीवरही बालनाट्यातून पुढे आलेले कलाकार आज संहिता लेखन ते चित्रपट, मालिका यांमध्ये काम करत आहेत. अशा काही कलाकारांच्या आयुष्यातील यशाचा घेतलेला आढावा...


चमचमत्या तार्यांच्या मांदियाळीत माझ्या विद्यार्थी बालकलाकारांना बघायला, मला का नाही आवडणार? मला अभिमान वाटतो त्यांचा आणि तितकीच काळजीसुद्धा वाटते. अभिमान याकरिता, कारण व्यावसायिक गणितं फार वेगळी असतात, त्याकरता वेगळ्या प्रकारची तयारी लागते. मानसिक उलथापालथ होण्याचीही शयता असते. कामाचे तास वाढतात, शारीरिक कसरत होऊ शकते. शाळेचा अभ्यास करायचा असतोच, शिवाय प्रौढांच्या दुनियेत राहून त्यांना त्यांचे बालपणही जपता आले पाहिजे, याची जबाबदारी अर्थातच आईवडील, तिथे काम करणारे कलाकार, निर्मिती संस्था यांच्यावर असते. त्यामुळे सहाजिकच एक प्रकारचे दडपणही असते. याव्यतिरिक्त मुलांची विशेष काळजीही घेतली जाते. ते थकणार नाहीत असे वेळापत्रक त्यांच्यासाठी आखले जाते. त्यांच्या आरामाचीही वेगळी सोय केलेली असते. काहीही झाले तरी, व्यावसायिकतेचे काही कठोर मापदंड असतातच. शूटसाठी उभे राहावेच लागते, नियम पाळावे लागतातच. तारेवरची कसरत करता करता मुले हुशार होतात, शिकतात. अनुभवांची नवी शिदोरी तयार करतात. हे सगळे ते करतात याचे मुख्य कारण, त्यांना अभिनय आवडतो. त्यांना नाटक असो वा सिनेमा त्यात काम करायला आवडते. चमचमत्या दुनियेत राहून आल्यानंतर, सर्वसामान्य म्हणून जगणे त्यांना परत शिकावे लागते. कारण हा माणसाचा स्वभाव आहे. विशिष्ट वातावरणातून नेहमीच्या वातावरणात आला, तरीसुद्धा परत सवय बदलायला वेळ हा लागतोच.

माझे अनेक विद्यार्थी व्यावसायिक सिनेमा, माहितीपट, वेबसीरिज, टिव्ही मालिकांमधून कामं करतात. मला अनेक ठिकाणांहून फोनही येतात. मी मुलांना सूचवते पण, हे सगळे मी करते, ते मुलांना संधी मिळावी म्हणून. यातून मी कुठल्याही प्रकारचे मानधन आकारात नाही. मुलांनी पुढे जावे, शिकावे, त्यांचे नाव व्हावे, त्यांना पुढे जाऊन अभिनेता-अभिनेत्री व्हायचे असेल, तर कामाचे स्वरूप कळावे म्हणून. मात्र, माझे विद्यार्थी अमुक अमुक ठिकाणी काम करत आहेत, म्हणून मी कधीही जाहिरात केली नाही. त्यांना प्रसिद्धी मिळावी म्हणून वेगळा प्रयत्नही केला नाही. त्यांचे कौतुक अवश्य केले; पण ते खासगीत. मुलं परत नाटकाकडे वळतात, परत शिकायला येतात कारण, ते कलेपासून फार काळ लांब राहू शकत नाही. ते परत आले की, त्यांना माहीत असते आपल्याला वेगळी, खास अशी वागणूक रॅडीकडून मिळणार नाही. आपण परत नव्याने सगळे शिकणार आहोत. अचानक मिळालेली प्रसिद्धी, गरजेपेक्षा जास्त झालेले कौतुक आणि सततची शाबासकी घातकच. ती तुमची प्रगती कुंठित करू शकते. अतिआत्मविश्वासही धूळ चाटवू शकतो. त्यामुळे मी सतर्क होऊन, त्यांना समजून घेऊन, काळजीपूर्वक त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्यावर काम करायला घेते. एक प्रशिक्षक म्हणून माझे ते कर्तव्यच आहे. हे सर्व कशासाठी तर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, उत्तमातून उत्तम अभिनेता-अभिनेत्री, तंत्रज्ञ कला क्षेत्राला लाभण्यासाठीच. याहीपलीकडे जाऊन उदात्त, उत्तम माणूस म्हणून ते आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे, याकडे माझा कल असतो. क्षणार्धात मिळालेली प्रसिद्धी अवकाळी पडणार्या पावसाप्रमाणे असते. मुलांचे बीज व्यक्तिमत्त्व म्हणून खुलायचे असेल, तर रोज त्याला खतपाणी घालणे आवश्यकच! फक्त रासायनिक कीटकनाशकांच्या फवार्याने कसे चालणार. म्हणूनच बालनाट्य आवश्यक. आजच्या आणि पुढच्या आठवड्याच्या लेखात, माझे असे तीन विद्यार्थी मी निवडले आहेत ज्यांनी प्रायोगिक रंगभूमीवर आणि व्यावसायिक चित्रनगरीत काम केले आहे. ते मोकळेपणाने माझ्याशी बोलले. त्यांची मते महत्त्वाची आहेतच; पण त्यापलीकडे जाऊन ज्या मुलांना आणि त्यांच्या आईवडिलांना आपल्या मुलांनी अभिनेता व्हावे असे वाटते, त्यांच्याकरिता हा लेख अधिक महत्त्वाचा ठरेल.

रुही जावीर वयवर्षे सात, रुद्र कोळेकर वयवर्षे दहा, हर्षित देसाई वयवर्षे १२ हे सर्वच विद्यार्थी अतिशय मेहनती, गुणी, शिस्तप्रिय; ज्यांचा अभिनय क्षेत्रातील अनुभव तीन वर्षांहून अधिक आहे. त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती आधी देते. रुहीने ‘झी’चा प्रोमो, ‘झी’ची ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिका आणि दोन बालनाट्यांमधून काम केले आहे. रुद्रने एक वेबसीरिज आणि एक सिनेमा केला आहे. त्याचबरोबर चार बालनाट्यांमधूनही कामे केली आहेत. हर्षितने दोन सिनेमे, दोन जाहिराती त्यातील एकामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम आणि पाच बालनाट्यांमधूनही काम केले आहे.

माझ्या बालमित्रांनो! सुरुवात आपण एखाद्या विनोदी प्रसंगानी करूया. मला एखादा शूट करत असताना आणि नाटकाच्या दरम्यान झालेला प्रसंग सांगा ना.

रुही - एकदा ना माझ्या बहिणीची आणि माझी उशी घेऊन फाईट होते आहे, असे दाखवले आहे. आम्हा दोघींना तो सीन खूप आवडला, तो प्रोमोमध्ये पण दाखवतात बघ. आम्हाला इतकी मजा येत होती की, डायरेटर सरांनी कट म्हटल्यानंतरही आम्ही फाईट करतच होतो. सगळेच हसायला लागले. आम्ही प्रार्थना करत होतो की, हा शॉट सरांनी परत एकदा घ्यावा. मग परत आमची फाईट सुरू झाली. माझ्या आईला वाटले झाले, आता रुही त्या उशितला कापूस बाहेर काढून घेते का काय? ‘मुंगळे चार’ या नाटकात चार मुंगळे होते. त्यापैकी मी एक होते. मुंगळ्यांची आजी विचारते, ’बरं मला सांग शु कुठे केलीस?’ मग वाय होते, ’त्या तिकडे त्या झाडाच्या पलीकडे जाऊन केली. तूच सांगतेस ना, घरात नाही करायची.’ मला या वायाला खूप हसायला यायचं पण, मी हसू गिळून टाकायचे. कारण, खूप सिरीयसली उत्तर द्यायचं होतं. आम्हाला हसायला नाही आलं पाहिजे, प्रेक्षक हसले पाहिजेत.

रुद्र- तुला आठवतं कैवल्यनी ‘कटी पतंग’ या नाटकात एक वाय असे घेतले, जे नाटकाला थेट स्क्रिप्टमधल्या शेवटच्या पानावर नेऊन पोहोचवेल. आम्ही सगळे बाकीचे शॉक, हे काय झालं. त्याच्या चेहर्यावर आत्मविश्वास दिसत होता की, त्याने बरोबर घेतला आहे डायलॉग. एक मोठा पॉझ गेला. तेवढ्यात मी सगळ्यांकडे बघून घेतलं, मला लक्षात आलं याने उडी मारली आहे. प्रभवच्या चेहर्यावर संताप दिसत होता. असं वाटलं तो कैवल्यला तिथल्या तिथे तुडवेल कारण, त्याने दर वेळेस प्रभवच्या वायाच्या आधी गोंधळ घातला आहे. हर्षित आणि मी, दोघांनी मिळून सारवासारव केली. पण असं कसं शय आहे, (प्रभव) तू काहीतरी बोलत होतास ते सांग, मग नाटक परत जागेवर आलं. सीन संपला आणि आम्ही विंगेत इतकं हसलो आहे. तसंच मी जो सिनेमा केला ना आता, त्यात मी धावत धावत येतो आणि एका उंच ठिकाणी पोहोचतो आणि आई तिच्या हातातली ताटली घेऊन उठते. हा मोठा शॉट होता, ट्रॉली लावली होती, लॉन्ग शॉट होता. खूप तयारी लागते अशा शॉटला आणि वेळखाऊही असतो. मी आलो धावत. सगळं व्यवस्थित होतं; पण आमचे स्पॉट दादा चहा घेऊन धावत इकडून तिकडे गेले. त्यांना कळलं नाही शॉट सुरू आहे. मग एकदा माझ्या आईने ताटलीतलं पीठ माझ्या धोतरात सांडवलं आणि तिसर्या शॉटमध्ये मी धावता धावता पडलो. मी म्हटलं काय रे देवा, हे काय होतं आहे माझ्याबरोबर.

हर्षित- ‘पासवर्ड’ नाटकात माझा अल्टर इगो माझ्याशी बोलत असतो, असं दाखवलं आहे. त्यात वेदांत माझा इगो दाखवला आहे, जो माझ्याशी बोलत असतो. इतके पाठोपाठ डायलॉग होते की, एकदा तालमीत त्यांनी माझे आणि मी त्याचे डायलॉग घेत होतो. मग एक मिनिटाने लक्षात आले की, काहीतरी गडबड होते आहे. मग शोधून काढलं कोण आधी चुकलं. शूट करत असताना असं दाखवलं आहे की, मी छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र काढतो आहे. ट्रॉली माझ्यावरून माझ्या चेहर्यावर येते आणि मग मी सुंदर, गोड, समाधानी भाव चेहर्यावर आणतो. छान झाला शॉट. मग स्पॉट दादा माझ्याकरिता पाणी घेऊन आले. मी तिथेच बसून होतो. चित्राकडे बघितलं आणि हसायला लागले. मग सेट वरचे एक एक करून आले आणि मी काढलेल्या चित्राकडे बघून हसायला लागले कारण, अतिशय वाईट चित्र काढलं होतं. घोडा काढला होता; पण डोकं कोणतं आणि पाय कोणते तेसुद्धा कळत नव्हतं.

तुम्ही तिघंही मेहनती आहात, अभिनय छान करता आणि कॅमेराला हवा तसा फोटोजेनिक चेहरा आहे तुमचा. तुम्हाला वाटतं तुम्ही मोठे होऊन अभिनेता-अभिनेत्री व्हाल म्हणून?

रुही- मला वाटतं की सिनेमा करावा, आणखीन सिरीयल करावी; पण मग वाटतं काहीच करू नये. नुसतं घरी बसून आराम करावा.

रुद्र- हो मला मोठं होऊन मोठा अभिनेता व्हायचं आहे. ‘एनसीडी’, ‘एफटीआय’मध्ये जाऊन शिकायचही आहे. मी खूप ऑडिशन्स देतो. माझा युट्यूब चॅनेलही आहे आणि मला नाटक, सिनेमाचे लासही सतत लावायचे आहेत. जास्तीत जास्त काम करून पाहायचं आहे.

हर्षित- मी ऑडिशन्स दिल्या की सिलेट होतो, शॉर्टलिस्ट तर होतोच होतो. मला माहीत नाही आहे, मी मोठा झाल्यावर काय करेन; पण काहीतरी वेगळं आणि मोठं करायचं आहे, एवढं मात्र नक्की. कधी कधी पायलट व्हावं का? असंही वाटतं. पण, रॅडी मला हल्ली स्क्रिप्ट लिहायला खूप आवडतं. एक लिहायला घेतली आहे. माझ्या मुंबईच्या मित्रांबरोबर मी, ती येत्या दिवाळीत शूट करणार आहे.