बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये तृणभक्षी प्राण्यांसाठी विशेष प्रकल्प; गवताचे पुनरुज्जीवन

    14-Jul-2025
Total Views | 20
grassland development program
छाया - अजिंक्य सावंत



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
'विवेक पार्क फाऊंडेशन'ने (वीपीएफ) बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सहयोगाने राबविलेल्या गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पाचे रविवार दि १३ जुलै रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले (grassland development program). यावेळी एसएफसी इन्व्हार्यमेंटल टेक्नाॅलाॅजिजचे सह-संस्थापक व संचालक संदीप परब हे देखील उपस्थित असेल (grassland development program). या प्रकल्पाचे कौतुक करत असतानाच वन आणि वन्यजीवांविषयी शिकण्याची संधी मिळाल्यास जरुर शिकावे,असा सल्ला शेलार यांनी दिला. (grassland development program)
 
 
 
विवेक पार्क फाऊंडेशनच्या वाईल्डलाईफ रिसर्च डिव्हिजनच्या माध्यमातून बोरिवली राष्ट्रीय उद्यानात गवताळ भूमी परिसंस्थेच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन रविवारी शेलार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी एसएफसीचे संदीप परब यांच्यासमेवत राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक आणि वनसंरक्षक अनिता पाटील, विवेक पार्क फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक विक्रम शंकरनारायणन आणि संस्थापक संचालक किरण शेलार, गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पाचे प्रोजेक्ट इन-चार्ज रोविन तोडणकर उपस्थित होते. यावेळी अनिता पाटील यांनी शेलार यांचे स्वागत केले. तर किरण शेलार यांनी हा प्रकल्प राबविण्यामागची भूमिका स्पष्ट केली. रोविन तोडणकर यांनी या प्रकल्पातील शास्त्रीय बाबींचा उलगडा शेलार यांच्यासमोर केला.
 
 
 
राष्ट्रीय उद्यानात गवताळ अधिवास निर्माण करण्याचा हा पहिलाच प्रकल्प आहे. याअंतर्गत राष्ट्रीय उद्यानातील गाभा क्षेत्रातील दोन हेक्टर परिसरावर देशी गवत प्रजातींची लागवड करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या जागेला कुंपन घालून त्यामध्ये लागवड केली जाणार आहे. वर्षभर या लागवडीची देखरेख करुन गवताला वाढण्याचा पुरेसा वेळ देऊन त्यानंतर कुंपन काढण्यात येईल. तृणभक्षी प्राण्यांच्या दृष्टीने कुरण विकासाचा हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वर्षभर गवताला वाढण्याचा वेळ दिल्याने गवताच्या मुळांची आणि ठोंबांची वाढ जमिनीअंतर्गत चांगली होईल. त्यामुळे तृणभक्षी प्राण्यांनी जर गवत खाल्ले, तरी पावसाळ्यात ठोंबांमधून पुन्हा फुटवे फुटून त्यामधून गवाताची वाढ होत राहील. महत्त्वाचे म्हणजे वीज वाहक तारांच्या खाली ही लागवड करण्यात आली. कारण वीज वाहक तारांच्या खाली कोणत्याही प्रकारे वृक्ष लागवड केली जात नाही. त्यामुळे त्याठिकाणी कुरण विकासाचा हा प्रकल्प राबविण्यात आला आहे.
 
 
 
हा प्रकल्प राबविल्याबद्दल मी विवेक पार्क फाऊंडेशन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाचे कौतुक करतो. वीज वाहक तारांच्या खाली असलेल्या मोकळ्या जागेचा केवळ सदउपयोग नाही, तर पर्यावरणीय सदउपयोग करण्याचा विचार या प्रकल्पाच्या माध्यमातून झाला आहे. याठिकाणी गवताच्या कोणत्या प्रजातींची लागवड करावी, याचा देखील अभ्यासपूर्ण विचार झाला आहे. त्यामुळे केवळ गवाताची लागवड नाही, तर पर्यावरणीय परिसंस्थेसाठी याचा काय फायदा आहे, याचा विचार याठिकाणी झाला आहे. एखादे झाडे किंवा प्राण्याकडून बरेच शिकण्यासारखे आहे. ते शिकणे म्हणजे आपले आयुष्य समृद्ध करणे. - आशिष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री
 
 
कुरण विकास प्रकल्प हा वन व्यवस्थापनातील एक प्राथमिक भाग आहे. अशा स्थितीत पालकमंत्री यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केल्यामुळे आम्हाला असे प्रकल्प राबविण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. तसेच मंत्रीमहोदयांच्या उपस्थितीमुळे गवताळ अधिवास व्यवस्थापनाचा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे, याची देखील लोकांना कल्पना येणार आहे. - अनिता पाटील, संचालक-वनसंरक्षक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
 
 
 
मलनिस्सारण क्षेत्रात काम करणारे आम्ही आता एक पर्यावरणीय जबाबदारी म्हणून अशा प्रकारच्या प्रकल्पांना पाठिंबा देण्याचा विचार केला आहे. विवेक पार्क फाऊंडेशनच्या माध्यमातून वेळास गावात राबविण्यात येणारा किनारी अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्प पाहिल्यानंतर मी खूप प्रभावित झालो. त्यामुळे गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पाची माहिती घेतल्यानंतर मी तातडीने त्यांना सहयोग देण्यासाठी तयार झालो. मी मुंबईत वाढल्यामुळे आणि राष्ट्रीय उद्यान हे मुंबईचे फुफ्फुस असल्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून येथील अन्नसाखळी अबाधित राहणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची पुनरावृत्ती इतर जंगलांमध्ये झाल्यास वन आणि वन्यजीवांसाठी फायदेशीर ठरणार आहे. - संदीप परब, सह-संस्थापक व संचालक, एसएफसी इन्व्हार्यमेंटल टेक्नाॅलाॅजिज
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121