
‘ऑपरेशन सिंदूर’ या आठ तासांच्या अचूक, संयमित आणि धडकी भरवणार्या कारवाईने भारताने आपल्या लष्करी धोरणातील नव्या पर्वाची सुरुवात केली. पाकला चोख प्रत्युत्तर देताना भारताने कारवाईचा नवा मार्ग निवडला. या कारवाईमुळे फक्त सीमारेषेवरच नव्हे, तर लष्कराच्या संकल्पनेत, युद्धतंत्रात आणि सज्जतेच्या संरचनेत आमूलाग्र बदल घडत आहेत. ‘शांतता हवी, पण सज्जतेसह’ हे धोरण पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात जे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले, ते पारंपरिक कारवाईसारखे नव्हते, तर आधुनिक युद्धतंत्राच्या नव्या युगात भारताने प्रवेश केल्याचा प्रत्यक्ष पुरावा होता. या मोहिमेचे विशेषत्व म्हणजे तिची गुप्तता, वेग आणि अचूकता. भारतीय सेनेने हे प्रत्युत्तर इतके मोजके आणि निर्णायक वेळेत दिले की, पाकिस्तानच्या सैनिकी मनोबलावरच याचा परिणाम झाला. पाकला आठ तासांत गुडघे टेकण्यास भारताने भाग पाडले. पाकला चीनने शस्त्रास्त्रे पुरवली होती मात्र, भारतीय शस्त्रास्त्रांसमोर ती सुद्धा निष्प्रभ ठरली. म्हणूनच, चीन आणि पाकिस्तानकडून वाढणारा संयुक्त लष्करी धोका, भारताच्या सुरक्षेसाठी एक दीर्घकालीन आव्हान ठरतो. ‘ऑपरेशन सिंदूर’ने या धोयाची तीव्रता केवळ अधोरेखितच केली नाही, तर भारतीय लष्कराच्या धोरणांमध्ये एक निर्णायक बदलही घडवून आणला. आता भारत आक्रमण सहन करणारा देश राहिला नसून, योग्य क्षणी अचूक प्रत्युत्तर देणारा आणि भविष्यकालीन युद्धांसाठी सज्ज असणारा देश झाला असल्याचे ठळकपणे समोर आले. कारगिल विजय दिनानिमित्त जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भारताच्या याच नव्या युद्धतंत्राची घोषणा केली आणि भारताच्या संरक्षणव्यवस्थेच्या एकूण वाटचालीस एक स्पष्ट दिशा दिली.
लष्कराच्या नव्या रचनेनुसार, यापुढे काही सिंगल आर्म ब्रिगेडचे रूपांतर ‘रुद्र’ सर्वशस्त्र ब्रिगेडमध्ये केले जाणार आहे. या ब्रिगेडमध्ये पायदळ, तोफखाना, रणगाडे, विशेषदल आणि ड्रोन यांचे एकत्रीकरण असेल. हे एकत्रीकरण युद्धातील सिनर्जीचा उत्कृष्ट नमुना ठरेल. आजवर हे सर्व घटक सराव किंवा युद्धकाळातच एकत्र काम करत असत. मात्र, ‘रुद्र’ ब्रिगेडमुळे हे लढाऊ घटक कायमस्वरूपी एका युनिटमध्ये कार्यरत राहतील. यामुळे लष्कराची गतिशीलता, निर्णयक्षमता आणि हल्ल्याची तीव्रता यात प्रचंड वाढ होईल. ‘रुद्र’ हे नावही खूप समर्पक असेच. संहारासाठी सज्ज असलेला, पण नियंत्रणाखाली असलेला शक्तिशाली घटक. या ब्रिगेड्समुळे भारताला सीमांवर अचानक उद्भवलेल्या चकमकींमध्ये, ठोस पावले उचलणे शय होईल. सध्या दोन ‘रुद्र’ ब्रिगेड्स कार्यान्वित असून, भविष्यात ही संख्या वाढवली जाणार आहे. ‘रुद्र’ ब्रिगेडप्रमाणेच एक नवे नाव सैन्य रचनेत उदयास येत आहे, ते म्हणजे ‘भैरव’ लाईट कमांडो बटालियन. याचे वैशिष्ट्य म्हणजे, ही युनिट्स अत्यंत चपळ, कमी वेळात सज्ज होत, शत्रू हद्दीत खोलवर घुसून कारवाई करण्यास सक्षम असतील. टप्प्याटप्प्याने अशा ४०-५० ‘भैरव’ बटालियन तयार करण्यात येणार आहेत. सीमांवर घडणार्या अतिसंवेदनशील घडामोडींवर तत्काळ प्रतिक्रिया देणे, शत्रूला आश्चर्यचकित करणे आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कार्यक्षमता दाखवणे, ही ‘भैरव’ बटालियनची ओळख असेल.
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानने तुर्कीए बनावटीचे ड्रोन आणि चिनी क्षेपणास्त्रे वापरली होती. त्यांना अचूकपणे रोखण्यात भारताच्या ‘हवाई संरक्षण प्रणाली’ने महत्त्वाची भूमिका बजावली. आता ही क्षमता अधिक सुसज्ज करण्यासाठी केंद्र सरकारने आणि लष्कराने मिळून नवीन उपाययोजना केल्या आहेत. ८ हजार, १६० कोटी रुपये खर्चून, चीन सीमेवर ‘आकाश प्राईम’ क्षेपणास्त्र प्रणालीची दोन रेजिमेंट तैनात केली जाणार आहे. त्याशिवाय ३६ हजार कोटींचा प्रकल्प हाती घेतला असून, त्याअंतर्गत ‘क्विक रिअॅशन सरफेस टू एअर मिसाईल’ प्रणालीच्या तीन रेजिमेंट्सही लष्करात सामील होणार आहेत. या प्रणालीची मारक क्षमता ३० किमी आहे. या दोन्ही प्रगत क्षेपणास्त्र यंंत्रणा लष्कराच्या तातडीच्या प्रत्युत्तर क्षमतेला बल देणार आहेत. युद्धसज्जता ही केवळ रणगाड्यांची मिरवणूक नसून, समन्वयित आणि संलग्न तंत्रज्ञानाच्या आधारे कार्यक्षमतेने युद्ध जिंकणे, हाच यशाचा मार्ग आहे. त्यातूनच ‘रुद्र’ आणि ‘भैरव’ ब्रिगेड्सचा जन्म झाला, असे म्हणता येते. ‘रुद्र’ ब्रिगेड्स म्हणजे स्थायिक सर्वशस्त्र टास्क फोर्स; जिथे पायदळ, तोफखाना, रणगाडे, ड्रोन आणि विशेष कमांडो हे सगळे एकाच कमांड अंतर्गत असतील. याचा अर्थ, युद्धाच्या प्रतीक्षेपेक्षा कारवाईला तत्काळ प्रारंभ. ‘ऑपरेशन सिंदूर’ने हे स्पष्ट केले की, युद्ध आता एका सीमारेषेपुरते मर्यादित राहिलेले नाही. ड्रोनमधून कळसूत्री युद्ध होते आहे, सायबर हल्ल्यांमधून हेतूतः गोंधळ माजवला जातोय, मिसाईल संरक्षण यंत्रणांमुळे आकाशही सुरक्षित राहिलेले नाही. त्यामुळेच, सैन्याच्या आधुनिकीकरणामध्ये ड्रोन आणि लढाऊ विमानांचा समावेश वाढविण्यात आला आहे.
आता भारत केवळ शस्त्रास्त्रे खरेदी करणारा देश राहिलेला नाही, तर त्यांचे उत्पादन, संशोधन आणि निर्यात करणारा ‘आत्मनिर्भर भारत’ झाला आहे. भारतातच बनलेली ‘स्विच’, ‘नाग’, ‘लक्ष्य’ अशा ड्रोन प्रणाली आणि स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान ‘तेजस’ हे याचे उत्तम उदाहरण. ड्रोन तंत्रज्ञान हे केवळ गुप्तचर आणि टार्गेट मॉनिटरिंगपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर आता त्याचा वापर थेट आघाडीवर निर्णायक आघात करण्यासाठी होत आहे. भविष्यातील युद्धे ही मानवी संख्येवर नव्हे, तर तंत्रज्ञान, वेग आणि अचूकतेवर अवलंबून असणार आहेत. भारतीय लष्कर हेच लक्षात घेऊन नेमकेपणाने सज्ज होत आहे. यापूर्वी भारताची ओळख ही ‘संयम दाखवणारा’ देश म्हणून होती मात्र, हा नवा भारत संयमितपणे शत्रूचे कंबरडे मोडू शकतो, हे ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून संपूर्ण जगाला दिसले. शत्रूच्या माकडचेष्टांना शाब्दिक नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून थेट उत्तर दिले गेले. आज ‘रुद्र’ आणि ‘भैरव’च्या घोषात भारत सीमेवर सज्ज असून, संयम हेच भारताचे बलस्थान आहे आणि हाच संयम संपुष्टात आला तर काय होते, हे पाकला भारताने आठ तासांत दाखवून दिले. ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे भारताची नव्या युद्धतंत्रातली रंगीत तालीम होती. हा नवा भारत आहे आणि तो कोणत्याही आव्हानासाठी तयार आहे, हेच भारताने नेमकेपणाने सांगितले आहे.