मुंबई (विशेष प्रतिनिधी) - चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव अभयारण्यालगत रविवार दि. २७ जुलै रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू झाला (leopard roadkill). कोठारी- अक्सापुर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली (leopard roadkill). या महामार्गावरील वन्यजीवांच्या हालचालींसाठी आवश्यक असलेल्या उपशमन योजना अजूनही प्रलंबित असल्याने अनेक वन्यजीवांना आपल्या जीवाला मुकावे लागत आहेत. (leopard roadkill)
अक्सापुर गावाजवळ भिवसेन नाल्याजवळ रविवारी मादी मादी बिबट्याचा मृतदेह आढळला. अज्ञात वाहनाने या बिबट्याला इतकी जोरदार धडक दिली होती की, मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप मडावी, वनरक्षक रुपाली आडे, हॅबिटॅट काॅन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे आमि सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.
कोठारी-अक्सापुर १६ किलोमीटरचा महामार्ग आहे. हा महामार्ग तेलंगणा राज्यातील कावल व्याघ्र प्रकल्प आणि महाराष्ट्रातील कन्हाळगाव अभयारण्य व ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांना जोडणाऱ्या वन्यजीव भ्रमणमार्गाला जोडतो. या महामार्गावर उपशमन योजना प्रलंबित असून अनेक वन्यजीवांचे अपघात होत आहेत. यापूर्वी एक बिबट, रानकुत्रा, उदमांजर, कोल्हा अशा अनेक वन्यप्राण्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. रोड इकॉलॉजिस्ट मिलिंद परिवकम आणि दिनेश खाटे यांनी या महामार्गावर कॅमेरा ट्रॅप करून वनविभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला उपशमन योजना सुचविले होते. सोबतच चंद्रपूर- मूल महामार्गावर देखील उपशमन योजनेसाठी विचार घेण्यात आला होता. परंतु दोन्ही महामार्गावर वन्यप्राण्यांचे अपघाताचे सत्र सुरूच असल्याचे निदर्शनास येत आहे.