मुंबई (विशेष प्रतिनिधी) - रत्नागिरी वन विभागाने गुरुवार दि. ६ नोव्हेंबर रोजी रात्री समंगेश्वर तालुक्यातील राजवाडी येथून चार शिकाऱ्यांना अटक केली. गाडीवर बसून शिकारीसाठी निघालेल्या या शिकाऱ्यांकडे बंदुक आणि काडतुसे मिळाली. (ratnagiri forest department)
गुरुवारी रात्री वन विभागाचे कर्मचारी मौजे राजवाडी येथे गस्त करत होते. त्यावेळी साधारण ११.३० वाजता ब्राह्मणवाडी साईमंदिर समोर अणदेरी ते राजवाडी मार्गावर एक छोटा ट्रक दिसला. बोलॅरो ट्रकच्या टपावर बसून काही इसम जंगलाच्या दिशेने टाॅर्च मारत पुढे जात होते. त्यामुळे या वाहनाला थांबवून वनकर्मचाऱ्यांनी गाडीची झडती घेतली. त्यावेळी त्यांना गाडीत एकूण चार जण असल्याचे लक्षात आले. अधिक तपासणी केली असता गाडीत एक बोअर बंदुक, सहा जिवंत काडतुसे, दोन हॅंड टॉर्च इ. मुद्देमाल मिळून आला. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांनी गाडीसह मुद्देमाल जप्त करुन पुढील चौकशी कामी ताब्यात घेतले. सदर कार्यवाहीमध्ये ४ संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये विश्वनाथ शांताराम मालप (वय २९ वर्षे, रा. अणदेरी, ता. संगमेश्वर), गजानन मानसिंग इंदुलकर (वय ४३ वर्षे, रा. हेदली, ता संगमेश्वर), रुपेश धोंडु पोमेंडकर (वय ४१ वर्षे, रा. कारभाटले, ता. संगमेश्वर), राहुल रविंद्र गुरव (वय २८ वर्षे, रा. तिवरे घेरा प्रचितगड, ता. संगमेश्वर) या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.