मुंबई (अक्षय मांडवकर) - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बहुप्रतिक्षित व्याघ्र स्थानांतरणाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे (sahyadri operation tara). याअंतर्गत बुधवार दि. १२ नोव्हेंबर रोजी ताडोबातील वाघिणीला घेऊन वन विभागाचा चमू 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'च्या दिशेने रवाना झाला आहे (sahyadri operation tara). गुरुवार दि. १३ नोव्हेंबर रोजी रात्री हा ताफा 'सह्याद्री व्याघ्र प्रक्लपा'त पोहोचेल. स्थानांतरणाच्या या प्रक्रियेला 'आॅपरेशन तारा' असे नाव देण्यात आले आहे. (sahyadri operation tara)
सह्याद्रीतील 'आॅपरेशन तारा'ला सुरुवात झाली आहे. ताडोबातील चंदा नावाच्या वाघिणीला घेऊन वन विभागाने 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'च्या दिशेने बुधवारी सायंकाळी प्रस्थान केले. वाघिणीला घेऊन निघालेला ताफा हा गुरुवार दि. १३ नोव्हेंबर रोजी रात्री 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'त पोहोचेल. ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पामधून 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'त आठ वाघांच्या स्थानांतरणासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. याच्या पहिल्या टप्प्यात ताडोबातील एका वाघिणीच्या स्थानांतरणाच्या प्रक्रिया सुरुवात झाली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने या प्रक्रियेला नाव दिलंय 'आॅपेरशन तारा'. याअंतर्गत ताडोबाच्या बफर क्षेत्रातील 'चंदा' नावाच्या वाघिणीला बुधवार दि. १२ नोव्हेंबर रोजी पकडण्यात आले. त्यानंतर तिच्या गळ्यात 'रेडिओ काॅलर' बसून सायंकाळी सह्याद्रीच्या दिशेने रस्ते मार्गाने धाडण्यात आले आहे.
ताडोबातून सह्याद्रीत येणाऱ्या 'चंदा' ही वाघीण ताडोबाच्या बफर क्षेत्रातील खडसंगी वनपरिक्षेत्रातील वाघिण आहे. ती 'जर्नी' नावाची वाघीण आणि ताडोबातील प्रसिद्ध वाघ 'छोटा मटका' याची मुलगी आहे. म्हणजेच ती आता गोरेवाड्यातील रेस्क्यू सेंटरमध्ये असणाऱ्या 'छोट्या मटक्या'ची मुलगी आहे. तिची आई 'जर्नी' ही 'वाघडोह' या तोडाबातील सगळ्यात मोठ्या वाघाची मुलगी आहे. म्हणजे 'वाघडोह' हा चंदाचा आजोबा आहे. ही वाघिणी तीन वर्षांची आहे. सह्याद्रीत आल्यावर तिचा सांकेतिक क्रमांक असेल 'STR 04'. 'एसटीआर' म्हणजे सह्याद्री टायगर रिझव्ह आणि '०४' म्हणजे तिचा क्रमांक. सध्या सह्याद्रीत तीन नर वाघ असल्याने या वाघिणीला '०४' असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला आहे. सह्याद्रीत आल्यावर तिला पुढचे काही दिवस विलग्नवासाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर तिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक अधिवासात सोडून तिच्यावर लावलेल्या 'रेडिओ काॅलर'च्या मदतीने हालचालींवर लक्ष ठेवण्यात येईल, अशी माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.