नवी मुंबईतील टी.एस.चाणक्य पाणथळीवर पाणमांजरांचा वावर

    07-Nov-2025
Total Views |
tschanakya wetland


मुंबई (अक्षय मांडवकर) -
नवी मुंबईतील टी.एस.चाणक्य पाणथळीवर पाणमांजरांचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे (tschanakya wetland). रविवार दि. २ नोव्हेंबर रोजी याठिकाणी पक्षीनिरीक्षणासाठी गेलेल्या पाणमांजरांच्या वावराचे पुरावे मिळाले (tschanakya wetland). मुंबईच्या किनारी प्रदेशात पाणमांजरे ही दुर्मीळ असून यापूर्वी नवी मुंबईतील खाडीत पाणमांजरांचे दर्शन झाले आहे. (tschanakya wetland)
 
 
महाराष्ट्रात पाणमांजरांच्या स्मूथ कोटेड, स्माॅल क्लाॅड आणि युरेशियन पाणमांजर या तीन प्रजातींचा समावेश होतो. यामधील स्मूथ कोटेड ही प्रजात प्रामुख्याने किनारी प्रदेशांमध्ये आढळते. या प्रजातीचा वावर आता नवी मुंबईतील टी.एस.चाणक्य पाणथळीवर असल्याचे समोर आले आहे. रविवारी पक्षीनिरीक्षक इशान प्रभूदेसाई आणि रोहन राणे हे याठिकाणी पक्षीनिरीक्षणासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना तिथल्या एका पायवाटेवरील चिखलात कोण्या प्राण्याचे ठसे उमटलेले दिसले. तपासणीअंती हे ठसे पाणमांजराचे असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे या पाणथळीवर पाणमांजर वावरत आहेत. स्मूथ कोटेड पाणमांजर हा वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत प्रथम श्रेणीत संरक्षित आहे. म्हणजेच त्याला वाघाच्या दर्जाचे संरक्षण मिळाले आहे. अशा परिस्थितीत अशा महत्त्वाच्या प्राण्याच्या वावरामुळे नव्या मुंबईतील पाणथळ जागांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
 
 
नवी मुंबईतून या पूर्वी तळोजा खाडीत पाणमांजरांचे छायाचित्र टिपण्यात आले होते. त्यामुळे त्याचठिकाणाहून ही पाणमांजरे टी.एस. चाणक्य पाणथळीवर आल्याची शक्यता आहे. स्मूथ कोटेड ऑटरला स्थानिक किंवा मराठीत पाणमांजर किंवा हुद, हुदा, हुदळे या नावाने ओळखले जाते. ही प्रजाती धोकाग्रस्त श्रेणीमध्ये समाविष्ट आहे. मात्र, अलीकडे कुठेच सापडत नसल्याचे चित्र आहे. ही प्रजाती अंगावर असलेल्या करड्या रंगाचे मऊशार केसांचा कोट आणि जबड्याचा खालील भाग पासून ते गळया पर्यंतचा पांढरा रंग यामुळे ती सहज ओळखता येते. नाकावरचा इंग्रजी व्ही प्रमाणे रंगाच्या खुनेमुळे सुद्धा ही प्रजाती ओळखणे सहज सोपे असते.