ममदापूरमध्ये धोकाग्रस्त भारतीय लांडग्यांची भरभराट; वीण यशस्वी, संख्येतही वाढ

    05-Nov-2025
Total Views |
mamadapur conservation reserve
                                                                                                                                           छायाचित्र - ऋत्विक पराशर
 


मुंबई (अक्षय मांडवकर) -
'इंटरनॅशनल युनियन फॉर काॅन्झर्वेशन आॅफ नेचर'ने (आययूसीएन) नुकतेच 'व्हल्नरेबल' म्हणजेच 'असुरक्षित' म्हणून घोषित केलेल्या भारतीय लांडग्याला नाशिकच्या ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्रात सुरक्षित अधिवास मिळाला आहे (mamadapur conservation reserve). यामुळे त्यांच्या संख्येत वाढ झाली असून गेल्या दोन वर्षांपासून यशस्वी विणीच्या नोंदी देखील वनकर्मचाऱ्यांनी टिपल्या आहेत (mamadapur conservation reserve). संवर्धन राखीव क्षेत्रात धोकाग्रस्त असलेल्या भारतीय लांडग्याच्या संख्येत झालेली वाढ ही इथल्या सुरक्षित अधिवासाचे द्योतक आहे. (mamadapur conservation reserve)
 
नाशिक जिल्ह्यातील येवला आणि नांदगाव या दोन तालुकाच्या वेशीवर पसरलेल्या उघड्या माळरानाला २०१४ साली ममदापूर संवर्धन राखीव वनक्षेत्राचा दर्जा देण्यात आला. यासाठी ५४ चौरस किलोमीटरचा परिसर राखीव करण्यात आला. या प्रदेशातील काळवीटांची संख्या लक्षात घेऊन हा प्रदेश संवर्धित करण्यात आला होता. सद्यपरिस्थितीत या संवर्धन राखीव क्षेत्रात साधारणपणे ५ हजार ८०० काळविटांचा वावर आहे. संवर्धन राखीवच्या केंद्रस्थानी काळवीट असला तरी, याठिकाणी गवताळ अधिवासातील अनेक प्रकारचे सस्तन प्राणी आढळतात. यामधीलच एक महत्वाचा प्राणी म्हणजे लांडगा. आता येथील काळविटांबरोबरच लांडग्यांच्याही संख्येत वाढ झाल्याचे निरीक्षण वनकर्मचाऱ्यांनी टिपले आहे. शिवाय सुरक्षित अधिवासामुळे याठिकाणी लांडग्यांची यशस्वी वीण होत असल्याचे निरीक्षणही त्यांनी केले आहे.
 
ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्रात मुबलक प्रमाणात असणारी काळविटांची संख्या लांडग्यांच्या वाढीमागे एक कारण असू शकते. शिवाय सुरक्षित अधिवासामुळे आजूबाजूच्या प्रदेशामधील लांडग्यांनी याठिकाणी स्थलांतरही केल्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे देखील संख्येत वाढ झालेली असू शकते. मात्र, संवर्धन राखीव क्षेत्राच्या सीमावर्ती भागातील भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर हा घातक ठरणारा आहे. त्यामुळे त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज देखील आहे.
 
चार ते पाच वर्षांपूर्वी ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्रात लांडग्यांची संख्या ही सहा ते सात होती. जी आता १८ पर्यंत झाल्याची शक्यता आहे. रविवारीच लांडग्यांचा एक छोटा कळप संवर्धन राखीव क्षेत्रात फिरताना आम्हाला आढळून आला. शिवाय गेल्यावर्षी याठिकाणी लांडग्याच्या चार पिल्लांचा जन्म झाला होता, तर यंदा सहा पिल्लांचा जन्म झाला आहे. - गोपाळ हरगावकर, वनरक्षक, ममदापूर संवर्धन राखीव