महाराष्ट्रातून प्रथमच आल्याच्या कुळातील 'या' वनस्पतीची नोंद; सिंधुदुर्गात अधिवास

    28-Jul-2025
Total Views |
Boesenbergia tiliifolia




मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सिंधुदुर्गातील तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रामधून 'बोसेनबर्गिया टिलीफोलिया' (Boesenbergia tiliifolia) या आल्याच्या कुळातील वनस्पतीची नोंद करण्यात आली आहे. या वनस्पतीची ही महाराष्ट्रातील पहिलीच नोंद ठरली आहे (Boesenbergia tiliifolia). भारतासाठी प्रदेशनिष्ठ असलेली ही प्रजात पश्चिम घाटातील कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ राज्यात आढळते (Boesenbergia tiliifolia).


'बोसेनबर्गिया टिलीफोलिया' या प्रजातीला मराठीमध्ये कचूर किंवा कपूरकचारी असे म्हणतात. इंग्रजीमध्ये या प्रजातीला निलगिरी फिंगररूट या सर्वसामान्य नावाने ओळखले जाते. तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रामधून शोधण्यात आलेल्या या प्रजातीचा उलगडा वैभववाडीच्या आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डाॅ. विजय पैठणे, छत्रपती संभाजी नगरच्या विवेकानंद कला - एस.डी वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डाॅ. अनिल भुक्तार आणि सिंधुदुर्गचे वनश्री फाऊंडेशनचे संजय सावंत यांनी केला आहे. या संबंधीच्या संशोधनाचे वृत्त रविवार दि. २७ जुलै रोजी ‘जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले.



वनश्री फाऊंडेशनचे संजय सांवत यांना सप्टेंबर, २०२४ रोजी तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रात ही प्रजात आढळली. त्यांनी लागलीच या प्रजातीची छायाचित्र टिपून ती डाॅ. पैठणे यांनी ओळख पटवण्यासाठी पाठवली. पैठणे यांनी तामिळनाडूच्या वनस्पतीशास्त्रज्ञांसोबत चर्चा केल्यानंतर या प्रजातीची ओळख 'बोसेनबर्गिया टिलीफोलिया', अशी पटवली. त्याच्यवेळी पैठणे यांच्या लक्षात आले की, पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडे आढळणाऱ्या या प्रजातीची नोंद यापूर्वी महाराष्ट्रामधून नाही. त्यामुळे पैठणे यांनी तिलारी संवर्धन राखीव क्षेत्राला भेट देऊन या वनस्पतीची सखोल पाहणी केली. त्यानंतर या वनस्पतीवर अभ्यास करुन संशोधन लेख प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. या वनस्पतीच्या स्थानिक उपलब्धतेबद्दल आणि संभाव्य औषधी उपयोगांबद्दल अधिक संशोधन करण्याची गरज आहे.

'बोसेनबर्गिया टिलीफोलिया' ही आल्याच्या कुळातील एक वनस्पती आहे. ही वनस्पती पावसाळी हंगामानंतर साधारण सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात फुलते. जमिनीतील रायझोमधून ही वनस्पती उगवते. डिसेंबरनंतर या प्रजातीची पाने सुकत असल्याने ती नाहीशी होते. त्यानंतर पुन्हा पावसाळ्यानंतर जमिनीखालील रायझोममधून उगवते. - डाॅ. विजय पैठणे, वनस्पती शास्त्रज्ञ



तिलारीच्या घनदाट जंगलातून झालेली या वनस्पतीची नोंद ही समृद्ध जैवविविधतेचे आणि तिच्या संरक्षणाच्या गरजेवर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. खाणउद्योग आणि मोनोकल्चर (एकाच प्रकारच्या पिकांची लागवड) यामुळे तिलारी खोऱ्यातील अधिवास संकटात सापडला आहे. त्यामुळे या प्रजातीच्या संवर्धनाची गरज आहे. - संजय सावंत, अध्यक्ष, वनश्री फाऊंडेशन