मुंबई (विशेष प्रतिनिधी ) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात तपकिरी पाठीची आभोळी (Brown-backed Needletail) या पक्ष्याचे दुर्मीळ दर्शन झाले आहे. पक्षीनिरीक्षकांना गुरुवार दि. १० जुलै रोजी या पक्ष्याचे दर्शन झाले (Brown-backed Needletail). पाकोळी कुळातील हा पक्षी प्रामुख्याने दक्षिण भारत आणि श्रीलंकेत आढळतो. (Brown-backed Needletail)
तपकिरी पाठीची आभोळी हा दक्षिण आणि आग्नेय आशियात सापडणारा पाकोळी कुळातील सर्वात मोठा पक्षी आहे. हा पक्षी दक्षिण गोव्यापासून खाली दक्षिण भारतात, श्रीलंका, अंदमान द्वीपसमूह आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये सापडतो. मात्र, आता सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यात या पक्ष्याचे दुर्मीळ दर्शन झाले आहे. सिंधुदुर्गातील पक्षीनिरीक्षक मकरंद नाईक आणि डाॅ. श्रीकृष्ण मगदूम हे १० जुलै रोजी दोडामार्गातील मांगेली गावात पक्षीनिरीक्षणासाठी गेले होते. त्याठिकाणी त्यांना हा पक्षी हवेत उडताना दिसला त्यांनी लागलीच या पक्ष्याचे छायाचित्र टिपले. यापूर्वी चंदगडमधून या पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र, दक्षिण महाराष्ट्रात या पक्ष्याच्या फार तुरळकच नोंदी आढळून आल्या असून त्याची छायाचित्रित नोंद नव्हती.
पाकोळी कुळातील तपकिरी पाठीच्या आभोळीचा आकार २१ ते २६.५ सेंमीपर्यंत असू शकतो. त्याचे पंख रुंद, बाहेर पडलेले आणि शरीर मोठे असते. शेपटीच्या काटेरी टोकांवरून त्याला त्याचे इंग्रजीमधील निडलटेल हे नाव मिळाले आहे. हे काटेरी टोक पाकोळीच्या इतर वेगवान प्रजातींप्रमाणे नसतात. हे पक्षी त्यांच्या आयुष्यातील बहुतांश काळ हवेत उडण्यात घालवतात, त्याचठिकणी उडत असलेल्या कीटकांवर अन्नग्रहण करतात. त्यांचे पाय लहान असतात ज्यामुळे ते प्रामुख्याने उभ्या पृष्ठभागावर चिकटून राहतात. बहुतेकदा हे पक्षी २० ते ३० किंवा त्यापेक्षा कमीच्या संख्येत थव्याने उडताना आढळतात.