धाराशिवच्या वाघाचा परतीचा प्रवास सुरू ? 'या' जिल्ह्यात आढळला वाघाचा वावर

    03-Jul-2025   
Total Views |
dharashiv tiger


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
यवतमाळमधून येऊन धाराशिवमध्ये ठिय्या मांडून बसलेला नर वाघ परतीच्या प्रवासाला निघाल्याची शक्यता आहे (dharashiv tiger). कारण, आता हा वाघ लातूर जिल्ह्यात आढळून आला आहे (dharashiv tiger). यापूर्वी बार्शी, येडशी ते तुळजापुरच्या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या या वाघाचा वावर १०० किलोमीटर लांब असणाऱ्या लातूरमधील एका गावात आढळून आला आहे (dharashiv tiger). त्यामुळे हा वाघ पुन्हा यवतमाळमध्ये परतीच्या प्रवासाला निघाला आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे (dharashiv tiger).
 
 
डिसेंबर, २०२४ मध्ये धाराशिव जिल्ह्यात नर वाघाचा निदर्शनास आला होता. वन विभाग त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. या वाघाचे छायाचित्र येडशी वनपरिक्षेत्रात टिपले गेले. त्यानंतर ते डब्लूआयआयला तपासण्यासाठी पाठविण्यात आले होते. हे छायाचित्र टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात २०२२ साली जन्मलेला नर वाघाचे असल्याचे समोर आले होते. अभयारण्यातील T22 असा सांकेतिक क्रमांक असलेल्या वाघिणीच्या पोटी २०२२ साली या वाघाचा जन्म झाला होता. दोन वर्षांनंतर या वाघाने आईपासून विलग होत, आपल्या नव्या हद्दीसाठी यवतमाळ ते धाराशिव असा साधारण ५०० किलोमीटरचा प्रवास केला. डिसेंबर ते जूनपर्यंत हा वाघ बार्शी, येडशी ते तुळजापूर या पट्यामध्ये अधिवास करुन होता. वन विभागाने या वाघाला पकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याची मोहीम देखील आखली. मात्र, वन विभागाच्या पिंजऱ्यात तो येऊ शकला नाही.
 
 
अशा परिस्थितीत आता या वाघाने परतीचा प्रवास सुरू केल्याची शक्यता आहे. कारण येडशीपासून १०० किलोमीटर लांब असणाऱ्या लातूर जिल्ह्यातील औसा गावात या वाघाचा वावर आढळून आला आहे. २७ जून रोजी या वाघाची पदचिन्ह औसा गावात आढळून आली आहेत. वन विभाग या वाघाच्या वावरावर लक्ष ठेवून असून २७ जूननंतर गेल्या आठवड्याभरात या वाघाचा ठावठिकाणा मिळालेला नाही. त्यामुळे या वाघाने परतीचा प्रवास सुरू केल्याची शक्यता उपस्थित केली जात आहे.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.