मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मराठवाड्यातून रामवड, नागरी, सरडोळ, लघु अंजीर, पापट,संखिना या सहा वनस्पतींची पहिल्यांदाच नोंद करण्यात आली (marathwada). यामधील काही प्रजाती दुर्मीळ असून पर्जन्यमानातील प्रचंड घट आणि अधिवास नष्टतेमुळे त्या धोक्यात आल्या आहेत (marathwada). अशा परिस्थितीत मराठवाड्यासारख्या शुष्क प्रदेशातून या वनस्पतींची पहिल्यांदा नोंद झाल्याने इथल्या अधिवासाचे महत्व अधोरेखित झाले आहे. (marathwada)
महाराष्ट्रातील मराठवाडा भाग हा तसा शुष्क प्रदेशात गणला जाणारा प्रदेश आहे. परंतु येथील मोजकेच शिल्लक राहिलेल्या वनक्षेत्रात अत्यंत संपन्न जैवविविधता आढळून येते. येथून अनेक वृक्ष, झुडूप आणि वेलींची अद्याप नोंद झालेली नाही. अशा परिस्थितीत लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील वनस्पती अभ्यासक शिवशंकर चापुले आणि छ. संभाजीनगर येथील मिलिंद गिरधारी हे मराठवाड्यातील वनस्पती संपदा नोंदविण्याचे काम करत आहेत. त्यांनी अलीकडेच केलेल्या अभ्यासामधून मराठवाड्यासाठी नव्या असलेल्या सहा वनस्पतींची नोंद केली आहे. यात लातूर जिल्ह्यातून रामवड (Ficus mollis), नागरी (Ximenia americana) या दोन वनस्पती तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून लघु अंजीर (Ficus johannis afghanistanica), सरडोळ (Sterculia villosa), पापट (Pavetta indica) आणि रान काकडी वर्गातील अत्यंत दुर्मीळ अशी संखिनी (Blastania cerasiformis ) या चार वनस्पती नोंदवल्या आहेत.
मराठवाड्यात पहिल्यांदाच आढळलेल्या या वनस्पतींच्या नोंदी बायोइन्फोनेट या नियतकालिकामध्ये प्रकाशित झाल्या आहेत. पहिल्यांदाच शोध लागलेल्या या वनस्पतींमध्ये सरडोळ, नागरी आणि पापट या वनस्पती फारच दुर्मीळ असून पर्जन्यमानातील प्रचंड घट, अधिवास नष्ट होणे, अतिशोषण या कारणामुळे त्या धोक्यात आल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील जनसहयोग संस्थेचे प्रशांत गिरे यांनी वरील सर्व दुर्मीळ वनस्पतींचे अधिवास बाह्य संवर्धन कार्य हाती घेतलेले आहे. ही संस्था भविष्यात वनविभागाच्या सहकार्याने प्रत्यक्ष अधिवासातही संवर्धन कार्य हाती घेणार आहे. लातूर जिल्ह्यातील या वनस्पतींच्या संशोधन कार्यात उदगीर येथील निसर्गप्रेमी अदिती पाटील याचेही सहकार्य लाभले आहे.
मराठवाड्यातील जंगलाचा नव्याने सखोल अभ्यास जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असून या अभ्यासातून IUCN संस्थेने मूल्यांकन व नोंद न केलेल्या वनस्पतींची नोंद घेऊन कोणत्या वनस्पती दुर्मीळ आहेत, हे लक्षात येणार आहे व अशा दुर्मीळ संकटग्रस्त वनस्पतींचे संवर्धन करता येणार आहे - मिलिंद गिरधारी, वनस्पती अभ्यासक व संवर्धक