सध्या महाराष्ट्रात भाषावादावरुन वादंग उठलेला दिसतो. पण, या विषयाच्या अधिक खोलात गेल्यास लक्षात येते की, या वादाची मुळे ही वसाहतवादी मानसिकतेत आहेत. त्यानिमित्ताने वैचारिक वसाहतवादाची पायाभरणी करणार्या या भाषिक वसाहतवादाचे विविधांगी पैलू उलगडणारा हा लेख...जगातील विविध भाषांच्या सन्मानार्थ बनवले गेलेले एक चित्र नुकतेच पाहण्यात आले. त्यात विविध हातांमध्ये विविध भाषांत ‘नमस्ते’ अथवा तत्सम अभिवादनपर शब्द लिहिलेले फलक धरलेले आपल्याला दिसतात. यात ‘नमस्ते’चा फलक घेतलेला एक भारतीय हातपण आहे. यातील किती भाषा आपल्याला ओळखता येतात, असा विचार केल्यावर इंग्रजी तर सहज कळली; पण फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश असाव्यात असेही काही अंदाज बांधता आले. मग लिपीवरून काही फलक चिनी किंवा जपानी भाषेतील असावेत असेही वाटले. अधिक शोधावे म्हणून मग ‘चॅटजीपीटी’चा वापर करून त्यातील सर्व भाषा शोधल्या. त्या चित्रात एकूण २५ भाषा होत्या. त्यातील कोणत्या भाषा जगात कुठे बोलल्या जातात, असे विचारल्यावर मात्र काही वेगळेच चित्र समोर आले. यापैकी साधारण सात भाषा या आशिया खंडात बोलल्या जाणार्या होत्या; तर १३ भाषा या युरोपीय होत्या. अन्य भाषा या युरोपीय भाषांच्या अन्य खंडातील स्थानिक बोली होत्या. म्हणजे, ज्या युरोपात जगातील सहा टक्के लोक राहतात, त्या खंडाच्या ६६ टक्के भाषांचे प्रतिनिधित्व त्या चित्रात होते. आफ्रिका, अमेरिकेचे मूलनिवासी यांच्या एकाही भाषेचा समावेश त्यात नव्हता आणि हे चित्र जागतिक भाषावैविध्याच्या सन्मानार्थ बनवले गेले आहे. भाषिक वसाहतवाद वैचारिक वसाहतवादाची पायाभरणी कशी करतो आहे, त्याचे हे चित्र द्योतक आहे.
आज आपण जगात सर्वत्र व्यवहारासाठी इंग्रजी भाषेचा उपयोग करतो. भिन्नभाषक जागतिक मानवी समूहासाठी एक समान व्यवहाराची भाषा हवीच. परंतु, ही भाषा म्हणून इंग्रजीला आज मिळालेले स्थान कसे मिळाले आहे, त्याची ब्रिटिश वसाहतींच्या साम्राज्यात लपलेली मुळे विसरता येणार नाहीत. इंग्रजी सत्तेची ध्वजा जशी जगभर पसरत गेली, तशी त्याबरोबर इंग्रजी भाषा प्रथम शासनव्यवहाराची भाषा आणि त्यापाठोपाठ शिक्षणाची भाषा म्हणून सर्वदूर पसरत गेली. स्वाभाविकपणे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतासह जगातील अनेक राष्ट्रांनी आपसातील व्यवहार इंग्रजी भाषेतच सुरू ठेवले. अनेक देशांसाठी इंग्रजी भाषेचा पगडा समाजव्यवहारांवर इतका घट्ट बसला होता की, मातृभाषेत कोणतेही व्यवहार करणे अशय होऊन बसले होते. आजही भारतासह अनेक देशांत हीच परिस्थिती आहे. राजकीय वसाहती जरी ७५ वर्षांपूर्वी संपल्या असल्या, तरी या भाषिक वसाहतवादामुळे जागतिक व्यवहारांत पूर्वीच्या वसाहतींमधील अन्यभाषक समाजांना समान संधी मिळू शकत नाहीत. युरोपातील अन्य भाषा या इंग्रजीशी कमी-अधिक मिळत्याजुळत्या असल्याने त्यांच्यासाठी ही अडचण विशेष येत नाही. त्याहीपुढे जाऊन अनेक युरोपीय आस्थापनांमध्ये त्यांची कागदपत्रे त्या त्या भाषांमध्ये उपलब्ध असतात. साधे ‘विंडोज’ या ‘मायक्रोसॉफ्ट’च्या जगभरात वापरल्या जाणार्या प्रणालीचे उदाहरण घेतल्यास जगभरात इंग्रजीत वापरली जाणारी ही प्रणाली कित्येक दशके अनेक युरोपीय भाषांमध्येही उपलब्ध आहे. आर्थिक क्षेत्रात सहज लक्षात न येणारा हा ‘भाषिक वसाहतवाद’ समतल स्पर्धेच्या किती संधी पूर्वीच्या परतंत्र राष्ट्रांना नाकारतो, हे तथाकथित गुणवत्ताधारित संधीचा पुरस्कार करणार्यांना लक्षातही येत नाही.
भारताचा विचार करताना या भाषिक वसाहतवादाला अधिक खोलवर जाऊन पाहावे लागते. जगभरात अन्यत्र या युरोपीय शक्ती नवीन भूप्रदेश शोधायला आणि तिथली नैसर्गिक संसाधने वापरण्यासाठी मजबूत आर्थिक, सामरिक आणि राजकीय पाया निर्माण करायला गेली होती. भारतात मात्र येण्याचा त्यांचा उद्देश हा एका समृद्ध राष्ट्राशी उत्तम संबंध राखून व्यापार चालू ठेवणे, असा होता. ग्रीक व रोमन साम्राज्यांच्या काळापासून युरोपचा संबंध भारताशी आला होता. त्यामुळे भारतीय भाषा आणि संस्कृतीशी युरोपमधील किमान काही विद्वानांचा परिचय होता. प्राच्यविद्या अधिक महत्त्व देऊन शिकायला हव्यात, असा त्यांचा आग्रह होता. भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करताना त्याचे स्वरूप कसे असावे, या चर्चेत प्राच्यविद्या संशोधकांचे मत भारतीय ज्ञानपरंपरांच्या बाजूने होते. यातील अनेक विद्वानांनी भारतीय भाषा आणि विशेषतः संस्कृत यांचे अनेक युरोपीय भाषांशी कसे साम्य आहे, हे सप्रमाण दाखवले होते. या साम्याचा उगम भारताबाहेर शोधणे वसाहतकर्त्यांचे श्रेष्ठत्व दर्शवण्यासाठी आवश्यक होते. भारताचे सांस्कृतिक श्रेष्ठत्व निखळपणे मान्य न करण्याच्या या अडचणीचे निराकरण ‘प्रोटो इंडो युरोपियन’ भाषेचे मिथक निर्माण करून केले गेले. कॉकेशस पर्वताच्या पायथ्याशी राहणार्या एका मानवी गटाची ही भाषा असून, या मानववंशाचे लोक नंतर जगभर पसरले, असा सिद्धांत या मिथकाच्या आधारे नंतर मांडला गेला, जो भारतीय संदर्भात ‘आर्य आक्रमणाचा सिद्धांत’ म्हणून ओळखला जातो. या सिद्धांताचे वैयर्थ्य आपण पूर्वी पाहिले आहे. मानववंशशास्त्राच्या संदर्भात जरी आता या सिद्धांताला विशेष महत्त्व नसले, तरी भाषिक मिथक अजूनही भाषाशास्त्राच्या अभ्यासात वापरले जाते.
भाषिक मिथकाद्वारे संस्कृत भाषेला जरी तोंडदेखले महत्त्वाचे स्थान दिले गेले, तरी इंग्रजी भाषेच्या पुरस्कर्त्यांसाठी इंग्रजीचे स्थान सर्व भारतीय भाषांच्या वरचे होते. "भारतात निर्माण झालेल्या सर्व ग्रंथांमधील ज्ञान एकत्र केले, तरी एखाद्या युरोपीय ग्रंथालयाचे अर्धे कपाटही भरणार नाही,” हे मेकॉलेचे मत प्रातिनिधिक आहे. त्यामुळे एका प्राचीन संस्कृतीचे ज्ञान म्हणून जरी संस्कृत भाषा आणि त्यातील साहित्याचा अभ्यास युरोपीय विद्वानांनी केला, तरी आजच्या युगात या ज्ञानाचे काही उपयोजन आहे, असा विचार कधी झाला नाही. याच विचाराचा दुसरा परिपाक म्हणजे, नवीन जगात जे विज्ञानाच्या संदर्भात आणि तत्सम अन्य विषयांत जे नवीन ज्ञान निर्माण होत होते, ते भारतीय भाषांमध्ये आणण्याचा कोणताही प्रयत्न कधी झाला नाही. स्वाभाविकपणे भारतीय भाषा ‘ज्ञानभाषा’ म्हणून विचार करता दुर्लक्षित राहिल्या. एक सुसंस्कृत व्यक्ती बनणे म्हणजे जसे युरोपीय शिष्टाचारांमध्ये पारंगत होणे. तसेच, सुविद्य व्यक्ती बनणे म्हणजे इंग्रजी भाषा पूर्णपणे आत्मसात करून त्या भाषेतच उपलब्ध असलेले ज्ञान मिळवण्यास सक्षम होणे. भारतीय भाषांना ‘ज्ञानभाषा’ बनवणे हा विचार स्वातंत्र्यानंतर इतया वर्षांनी आज फक्त सुरू झालेला आज आपण पाहतो आणि वैचारिक गुलामी समाजात इतकी भिनली आहे की, त्यास आपल्याच समाजातून आज विरोध होतो. जागतिक पातळीवर जरी इंग्रजी आवश्यक मानली, तरी भारतीय भाषा तांत्रिक व पारिभाषिकदृष्ट्या समृद्ध न केल्याने देशांतर्गत संवादासाठीसुद्धा आपल्याला इंग्रजीचाच आधार घ्यावा लागतो. भाषा हे इतर सर्व विषय शिकण्याचे माध्यम असल्याने भाषिक कमकुवतपणा अन्य कित्येक विषय मुळातून नीट न समजण्याचे कारण बनतो. इथे पुन्हा युरोपशी तुलना केल्यास आपल्याला असे दिसते की, बर्याच देशांमध्ये अत्यंत प्रगत स्तरावरील तांत्रिक ज्ञान हे त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध असते. गेल्या काही दशकांमध्ये हाच कल जपान, कोरिया, चीन या पौर्वात्य देशांनीही अवलंबलेला दिसतो. एक नेहमीचे उदाहरण म्हणून आपण कोणतेही यंत्र वा उपकरण विकत घेतल्यास त्याबरोबर येणार्या वापर पुस्तिकेचे पाहू. या वापर पुस्तिका इंग्रजीबरोबर अनेक युरोपीय तसेच, पौर्वात्य भाषेत छापलेल्या असतात. त्यात क्वचित हल्ली हिंदीचा समावेश असतो. बरेच भारतीय त्याच्या इंग्रजी भागाचाच वापर करतात. तांत्रिक किंवा पारिभाषिक कामांसाठी आपलीच मातृभाषा कशी वापरावी, हे आपण कधी शिकलेलोच नाही.
राजकीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतरही अनेक दशके भाषिक वसाहतवाद अजूनही मूळ धरून असण्याचे प्रमुख कारण म्हणजे, शिक्षणातील माध्यमसक्ती. ही सक्ती कुठल्या कायद्याची नाही, तर एक प्रकारच्या सामाजिक दडपणाची आहे. प्रशासन, खासगी आस्थापने, तंत्रज्ञानविषयक कार्यालये अशा सर्व महत्त्वाच्या नोकर्यांच्या ठिकाणी संधी आणि नंतर पदोन्नती या दोन्हीसाठी इंग्रजीवर पकड असण्याची आवश्यकता स्पष्टपणे सर्वत्र दिसत असताना आपल्या मुलांना स्थानिक भाषेच्या माध्यमातून न शिकवता इंग्रजी माध्यमातून शिकवणे आवश्यकच बनले आहे. किंबहुना, विशिष्ट ध्येय ठरवून स्थानिक भाषेच्या माध्यमातून शालेय शिक्षण घ्यायचे ठरवले, तरी उच्चशिक्षण मात्र आज केवळ इंग्रजी भाषेतूनच उपलब्ध आहे. दुर्दैवाने माध्यमभाषेचे महत्त्व इतके वाढले आहे की, मूळ विषयाच्या आकलनापेक्षा भाषेचेच आकलन अधिक अवघड आणि महत्त्वाचे होऊन बसले आहे. गाभार्यातल्या पिंडीपेक्षा नंदीचेच महत्त्व अधिक झाल्यासारखी परिस्थिती आज माध्यमभाषेच्या विषयात उद्भवली आहे. या अनावश्यकरित्या मिळालेल्या महत्त्वाच्या स्थानामुळे आज इंग्रजी ही टाळता न येण्याजोगी बनली असून, केवळ आपली मातृभाषा बोलता येणे हे कमीपणाचे लक्षण समजले जाऊ लागले आहे. शिक्षणातील ही माध्यमसक्ती वैचारिक दास्य पुढे चालू ठेवण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावते आहे. स्थानिक भाषांच्या माध्यमासाठी वापरल्या जाणार्या ‘व्हर्नायुलर’ या शब्दाच्या व्युत्पत्तीमधील गुलामीचा संदर्भ इथे उल्लेखनीय आहे.
पूर्वी युरोपीय सत्तांच्या अधीन असलेल्या देशांना जर वैचारिक गुलामगिरीतून मुक्त व्हायचे असेल, तर या भाषिक वसाहतवादापासून मुक्तीचा मार्ग शोधणे सर्वप्रथम आवश्यक आहे. भाषा हे संवादाचे माध्यम असावे. पण, भाषेच्या मर्यादा या संवादांच्या मर्यादा बनू नयेत. निर्वसाहतीकरणाचे लक्ष्य पुन्हा एकदा जागतिक मानवी समूहाला विविध कुंपणांमध्ये बंदिस्त करण्याचे नसून, सर्वांना समतल परिस्थितीत आणून त्या पृष्ठभूमीवरून परस्पर समादरभावाने सौहार्दपूर्ण संवाद साधण्याचे आहे. हे लक्ष्य ध्यानात ठेवून वसाहतकर्त्यांच्या भाषाच नाकारण्याची भूमिका न घेता केवळ आपल्यातील दास्यभावामुळे त्यांच्यातले काल्पनिक आंतरिक श्रेष्ठत्व नाकारण्याची भूमिका निर्वसाहतीकरणाची योग्य दिशा असेल.
(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)
डॉ. हर्षल भडकमकर
९७६९९२३९७३