गॅझेटचा गोंधळ अन् शिक्षणाचे नुकसान...

    27-Jul-2025
Total Views |

कोणत्याही तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षण क्षेत्रात करण्याची उत्सुकता सगळ्यांना असते. माहिती-तंत्रज्ञानाच्या या जगात मोबाईल हे तंत्रज्ञान आता सर्वत्र आढळते. संगणक, टॅबलेट, लॅपटॉप, मोबाईल अशा सर्व रुपांमध्ये तंत्रज्ञान आता शालेय जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. मात्र त्याच्या अविवेकी वापराचे तोटेही आहेत. या गंभीर परिणामांचा घेतलेला आढावा...

देशात माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांची उपलब्धता वाढते आहे. शाळेतील आधुनिकता वाढीसाठी ही साधने मदत करतीलच मात्र, त्यांचा उपयोग करत गुणवत्तेच्या दृष्टीने खरंच पावले टाकली जाणार की, जगभरातील संशोधकांनी दिलेल्या इशार्यानुसार शिकण्याची क्षमता कमी होत जाणार हाच एक प्रश्न आहे. मुळात जगभरात माहिती तंत्रज्ञानाची क्रांती झाल्यानंतर, शिक्षणातही त्याचे उपयोजन केले गेले. मात्र, नवसंशोधनाचे उपयोजन करताना विवेकाची वाट गमवता कामा नये. मानवी जीवनात माहिती तंत्रज्ञानाने कितीही हस्तक्षेप केला, तरी कोणत्या साधनांचा किती उपयोग करायचा याचा विचार करण्याची गरज आहे. आज आपल्या हातातील तंत्रज्ञानामुळे, अवघे जगच आपल्या हातात आले आहे. याचा परिणाम अधिक चांगला होण्याची गरज आहे. जगभरात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग वाढल्याने, विद्यार्थ्याचे शिकणे आणि शिकवणे यावरील परिणाम समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे शिक्षणात वाढत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यापेक्षा, प्रशासकीय कामकाजात त्याचा प्रभावी वापर होण्याची गरज आहे. गेली काही वर्षे विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या आहारी जात आहेत. शिक्षणही जणू तंत्रज्ञानाशिवाय पुढे जाऊच शकत नाही, अशी भावना दृढ होत आहे. त्यामुळे सृजनशीलतेची वाटच थांबण्याची शयता आहे. सारेच गुगलवर शोधू लागलो, तर आपल्या मेंदूला काही काम उरणार की नाही, हा प्रश्न आहे. वाढत्या माहिती तंत्रज्ञानाच्या उपयोजनांमुळे आकलन, स्मरणशक्ती, एकाग्रतेची क्षमतेवर विपरित परिणामाचा इशारा संशोधकांनी दिला आहे. त्याकडे आपण अधिक गंभीरपणे पाहण्याची गरज आहे.

देशात असलेल्या एकूण १४ लाख, ७१ हजार, ८९१ शाळांपैकी केवळ चार लाख, ७६ हजार, ६६९ शाळांमध्ये, संगणक सुविधा उपलब्ध आहेत. अर्थात हे शेकडा प्रमाण अवघे ३२.४ टक्केच आहे. महाराष्ट्राचा विचार केला, तर एक लाख, आठ हजार, २३७ शाळांपैकी ७० हजार, ०७५ शाळांमध्ये, संगणक सुविधा उपलब्ध आहेत. याचे शेकडा प्रमाण ६४.७ टक्के इतके असून, चालू स्थितीत लॅपटॉप उपलब्ध असणार्या देशातील शाळांची संख्या दोन लाख, ५६ हजार, ३९२ इतकी आहे. हे शेकडा प्रमाण १७.४ टक्के आहे. महाराष्ट्रात २४ हजार, २४५ शाळांमध्ये लॅपटॉप सुविधा असून, हे शेकडा प्रमाण २२.९ टक्के आहे. टॅबलेट उपलब्ध असणार्या देशातील शाळांची संख्या दोन लाख, ७५ हजार, ८५७ इतकी आहे. हे शेकडा प्रमाण १८.७ टक्के आहे. महाराष्ट्रातील टॅबलेट सुविधा उपलब्ध असणार्या शाळांची संख्या ११ हजार, २४८ इतकी असून, हे शेकडा प्रमाण १०.४ टक्के इतके आहे.

देशातील प्रशासकीय व शैक्षणिक कामासाठी संगणकाचा उपयोग होणार्या शाळांची संख्या एक लाख, १९ हजार, ७६५ आहे. हे शेकडा प्रमाण ८.१ टक्के इतके आहे. राज्यात संगणकाचा उपयोग करणार्या शाळांची संख्या १७ हजार, ६४१ इतकी आहे. हे शेकडा प्रमाण १६.३ टक्के इतके आहे. प्रोजेट सुविधांची उपलब्धता असलेल्या शाळांची संख्या देशात दोन लाख, ९८ हजार, ६६७ असून, हे शेकडा प्रमाण २०.३ टक्के आहे. महाराष्ट्रातील शाळांची संख्या ५२ हजार, ३७३ इतकी असून, याचे शेकडा प्रमाण ४८.४ टक्के आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या काळात, शालेय प्रशासकीय कामकाजासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या सुविधांची नितांत गरज आहे. शाळांमध्ये स्मार्ट वर्ग फलक, डिजिटल बोर्ड, व्हर्च्युअल लासरूम, स्मार्ट दूरदर्शन संच उपलब्धता असलेल्या शाळांची संख्या तीन लाख, ५९ हजार, ४५७ इतकी आहे. हे शेकडा प्रमाण २४.४ टक्के आहे. अशा शाळांची राज्यातील संख्या ६५ हजार नऊ आहे. हे शेकडा प्रमाण ६०.१ टक्के इतके आहे. अध्यापनासाठी मोबाईलचा उपयोग करणार्या शाळांची संख्या देशात तीन लाख, ५६ हजार, ८१९ इतकी असून, ते शेकडा प्रमाण २४.२ टक्के आहे. राज्यात मोबाईल सुविधेद्वारे अध्यापन करण्यासाठी असलेल्या शाळांची संख्या ५४ हजार, ९३६ आहे. या सुविधेचे शेकडा प्रमाण ५०.८ टक्के इतके आहे. राज्यात माहिती तंत्रज्ञान साधनांची उपलब्धता आणि उपयोग वाढतो आहे. या दोहोंचा विचार करता, देशातील पहिल्या पाच राज्यांमध्ये आपल्या राज्याचा समावेश आहे. मात्र, त्याचा देशातील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी खरंच उपयोग होतो का? याचा शोध घेण्याची गरज आहे. आपल्याकडे एखादी गोष्ट नव्याने आली की, त्या पाठोपाठ जाण्यासाठी गर्दी उसळते असा अनुभव आहे. मात्र, त्याच्या परिणामांचा अभ्यास करणे, संशोधनाची वाट चालणे फारसे होत नाही. यावरील संशोधने जगाच्या पाठीवर आली की, आपण त्या दिशेचा विचार करू लागतो पण, तोपर्यंत आपण बरेच गमावलेले असते. शैक्षणिक संशोधनासाठीचे वातावरण देशभरात निर्माण करण्यात आपल्याला पुरेसे यश मिळू शकले नाही, हे वास्तव लक्षात घ्यायला हवे. संशोधनाशिवाय आपण वाट चालणार असू, तर त्याच्या परिणामांना निश्चितच सामोरे जावे लागणार.

मध्यंतरी ‘युनेस्को’ने ‘ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट’ जाहीर केला. त्यातून त्यांनी जगातील अत्यंत महत्त्वाच्या आणि भविष्यातील प्रश्नांकडे लक्ष वेधले होते. त्यानिमित्ताने शिक्षण क्षेत्राला दिलेला इशारा लक्षात घ्यायला हवा. वर्तमानात डिजिटल क्रांतीची भाषा होते आहे. नवतंत्रज्ञान उदयाला आले की, त्याचा शिक्षणात उपयोग अपरिहार्य आहेच. जगात जे काही नवसंशोधन येते, त्याचा उपयोगही शिक्षणाच्या प्रक्रियेत होणे आवश्यक आसेच. नव्याने रेडिओ जेव्हा अस्तित्वात आले, तेव्हा शाळांना रेडिओ पुरविण्यात आले. अलीकडे आंतरजालाधारित मोबाईल आले आणि संपूर्ण जगच जणू मुठीत आल्याचा आनंद झाला. त्यामुळे याचा शिक्षणात उपयोग करण्यासाठी स्पर्धा निर्माण होणे, साहजिक होते. त्याप्रमाणे मोबाईल क्रांती झाली आणि शिक्षणात त्याचा उपयोग करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले. जगातील प्रगत देशांनी यासाठी मोठी गुंतवणूक करत, शिक्षणाचे ‘डिजिटलायझेशन’ केले. काही देशांनी तर त्यासाठी आरंभी ‘लॉटरी बजेट’ही जाहीर केले. काही प्रमाणात विकसनशील राष्ट्रांनीदेखील तीच वाट चालणे पसंत केले. अर्थात या साधनांमुळे सर्वांना शिक्षण मिळेल आणि शिक्षणावरील खर्च कमी होईल असे वाटत असल्याने, त्यावर भर देण्याचा प्रयत्न झाला. अर्थात ही साधने शिक्षणासाठी उपयोगात आणल्याने पैशाची बचत होईल हे खरे असले, तरी त्यातून शिक्षण होईलच असे सांगता येत नाही, तसेच शिक्षण झाल्याचे असे चित्रही समोर नाही.

मोबाईलमुळे शिक्षणात विविध अडथळे येऊ लागल्याचे अहवालात नमूद केले आहे. विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल आल्यामुळे, जगातील सर्व ज्ञानाचा खजिना खुला झाला. मात्र, केवळ ऐकणे आणि पाहणे याने शिक्षणाचे ध्येय साध्य होत नाही, शिक्षणाची प्रक्रिया त्या पलीकडची आहे. विद्यार्थ्यांनी शिकताना काही करून पाहणे आवश्यक असते. अगदी शाळा स्तरावर विचार केला, तरी तेथे श्रवण, भाषण, वाचन, लेखन, संभाषण या भाषिक कौशल्यांचा विचार केला, तरी ते साध्य होणे कठीण आहे. या साधनांद्वारे श्रवण होऊ शकेल. काही प्रमाणात वाचनासाठी त्याचा उपयोग होईल; पण लेखन, भाषण, संभाषण कौशल्यांचे काय? मोबाईल हाती आल्यानंतर मुले त्यात गुंतून पडतात. तासनतास त्यांचा वेळ खर्ची होतो. मुलांचा स्क्रिनटाईम वाढल्याने, मुलांच्या मेंदूवरही विपरीत परिणाम होत असल्याचे अनेक अभ्यासकांनी म्हटले आहे. निकोलास कार या ‘हॉवर्ड विद्यापीठा’च्या माजी विद्यार्थी आणि जगभर स्तंभलेखन करत असलेल्या लेखकाने म्हटले आहे की, दहा वर्षे मी सातत्याने आंतरजालचा उपयोग करत आलो आहे. त्याचा परिणाम म्हणून जेव्हा काही वाचत असे, तेव्हा वाचलेल्या मजकुरातील कठीण, जटील, किचकट मजकूराचे आकलन काहीसे जड झाले होते. आंतरजालच्या साततच्या उपयोगामुळे एकाग्रतेवर विपरीत परिणाम झाला होता तसेच, स्मरणशक्तीवरदेखील परिणाम झाला. आज आपल्याकडे तरुणाई आणि अगदी महानगरातील शालेय पिढीदेखील मोबाईलवर अनेक तास खर्च करते. अशावेळी त्यांच्या मेंदूवरही विपरीत परिणाम होण्याची शयता अधिक आहे. शिक्षणासाठी लागणारी एकाग्रता कमी झाली, तर वर्गातील अध्ययन अनुभव विद्यार्थी कसे समजून घेणार,? विद्यार्थ्यांवर जसा परिणाम होतो, त्याप्रमाणे शिक्षकांनीदेखील मोबाईलवर अधिक वेळ खर्च केला, तर अध्यापनावर त्याचा परिणाम होतो. अध्यापन निरस होण्याचा धोकाही त्यामुळे वाढतोे. शिक्षकांचा मोबाईल, तंत्रज्ञानावर अधिक वेळ खर्च झाला, तर भावनिक प्रक्रियेवर परिणाम होऊन त्यांची चिडचिड होण्याची शयता अधिक आहे. संताप उंचावल्याने सृजनशीलता, आनंददायी शिक्षण, प्रयोगशीलता हे शब्द केवळ पुस्तकात उरण्याचा धोका आहे. शिक्षकाला प्रभावीपणे अध्यापन करायचे असेल, तर डिजिटल साधनांचा विवेकी उपयोग करण्याची सक्षमता त्यांच्यात निर्माण करण्याची गरज आहे. आज चांगल्या शिक्षकांना पर्याय म्हणून, शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. पण ते निर्जीव साधन शिक्षकाला पर्याय ठरू शकत नाही. त्यांचा उपयोग उंचावल्यास, विचार करून चिंतनाची वाट चालत अध्ययन, अध्यापनाच्या प्रभावी वाटेपासून चांगले शिक्षकही दुरावण्याचा धोका आहे. हा प्रो. यशपाल यांचा इशारा लक्षात घ्यायला हवा.

शाळा, महाविद्यालय स्तरावर प्रत्येक माहितीसाठी तंत्रज्ञानाची गरज वाटू लागली आहे. जेव्हा तंत्रज्ञान नव्हते, तेव्हाही कामकाज चालत होते. मात्र, आज माहितीचे प्रसारण, संकलन करणे, विविध अॅपचा उपयोग करणे, संकेतस्थळावर माहिती भरणे, यातच शिक्षकांचा अधिक वेळ जातो आहे. त्यामुळे स्क्रिनटाईम वाढतो आहे. त्यातून चांगल्या शिक्षकांची सृजनशीलता आणि कौशल्याला हानी पोहोचण्याचा धोका आहे. मानसिक परिणामांचीही दखल घेण्याची गरज आहे. शिक्षक शांत, संयमी व सृजनशील ठेवायचा असेल, तर अधिक विचार करण्याची संधी आणि हाती पुस्तक देण्याची गरज आहे. मोबाईलमधील पुस्तके फार परिणाम साधतील असे नाही. राज्याने यापूर्वी शाळेच्या आवारात मोबाईल वापरण्यास प्रतिबंध केला होता. त्यासाठी दंडात्मक कारवाईदेखील जाहीर केली होती. मात्र, दुर्दैवाने शाळांना माहितीसाठी मोबाईलवर अवलंबून राहावे लागते. हाती मोबाईल आल्यावर सहजपणे माणसं समाजमाध्यमांच्या प्लॅटफॉर्मवर जाणारच. त्यात किती वेळ जातो, हे लक्षातही येत नाही. त्यातून आभासी संवाद वाढत जातो. त्याचबरोबर संवादी साधने आली असली, तरी प्रत्यक्ष संवाद हरवत चालला आहे. माणसं एकमेकांपासून दुरावत चालली आहेत. माणसं एकत्र आली, तरी एकमेकांशी संवाद करण्याऐवजी,आभासी संवाद करणे पसंत करतात. ही जडलेली सवय माणसाला मानसिक आजारपणाकडे घेऊन जाण्याची शयता आहे.