सध्या देशात भाषेवरून वादंग सुरु आहेत. या वादंगातील समान धागा म्हणजे समान प्रदेशातील भाषेला विरोध करताना, परकीय भाषेला आपलेसे करण्याची वृत्ती! मात्र, भाषा येताना सोबत तिची संस्कृतीही घेऊन येते असे म्हणतात, याचाच विसर आज पडलेला दिसतो. त्यामुळेच भाषांतर हा मुद्दा कायमच वादग्रस्त ठरला आहे. त्यानिमित्ताने भाषांतर आणि भावांतर यातील फरकाचा घेतलेला आढावा... केनयन निर्वसाहतीकरणाचे एक प्रमुख शिलेदार ङ्गुघी वा थ्योङ्गो म्हणतात की, जेव्हा त्यांनी केनयन भावविश्वाशी जवळीक साधणारी कादंबरी लिहिण्याचा विचार केला तेव्हा त्यांना पहिला प्रश्न पडला की, ही कादंबरी कोणत्या भाषेत लिहावी. त्यांच्या स्थानिक संस्कृती, समाज आणि एकंदरीत भावावकाशाचे वर्णन करण्यास समर्पक शब्दच इंग्रजी भाषेत नव्हते, असे त्यांना जाणवले. या प्रकारचा अनुभव हा जगभरात इंग्रजी प्रभावातून मुक्त होणार्या बर्याच देशांमधील साहित्यिकांनी नोंदवलेला आहे. या अनुभवामागचे कारण आपण सैद्धांतिक पातळीवर भाषा आणि संस्कृती यांच्या परस्परावलंबी विकसनाच्या प्रक्रियेत पाहू शकतो. विशिष्ट समाजाने निर्माण केलेल्या भाषेचा जन्मच त्या समाजाच्या सामूहिक अनुभवांच्या कथनासाठी असतो. त्यामुळे कुठल्याही भाषेतील स्वाभाविक अभिव्यक्ती ही त्या समाजाच्या संस्कृतीचे संदर्भ घेऊनच येत असते. विशेषतः दास्यभावाने स्वीकारलेली परभाषा, एखाद्या समाजाची अभिव्यक्तीच कुंठित करत असते. भारतीय संस्कृती ही सनातन आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने युरोपीय संस्कृतीपेक्षा वेगळी असल्याने आणि भारतावर एक शतकाहून अधिक काळच्या इंग्रजी राजवटीमुळे, या प्रकारच्या कुंठित किंवा विकृत अभिव्यक्तीची उदाहरणे आपल्याला अनेक क्षेत्रांमध्ये दिसतात. अशा उदाहरणांच्या साहाय्याने संदर्भहीन भाषांतराने होणार्या भावांतराची चर्चा आज आपण करू.
भावांतराची मुख्य समस्या आपल्याला धर्म आणि अध्यात्म या क्षेत्रांत दिसते. आपण हे अनेकदा विविध संदर्भात पाहिले आहे की, कोणत्याही जीवाचे सत्यस्वरूप, त्यानुसार असणारे त्याचे जीवनकार्य, ईश्वराचे सत्यस्वरूप, विश्वाच्या संचालनाचे ईश्वरीय कार्य या सर्व विषयांत हिंदू दर्शने आणि अब्राहमिक पंथांवर आधारलेली युरोपीय विचारसरणी यांच्या मतात प्रचंड अंतर आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळात जेव्हा बरेचसे वैचारिक लेखन इंग्रजी भाषेत होत असे, तेव्हा या अंतराचा विशेष विचार न करता, अनेक भारतीय संकल्पनांसाठी इंग्रजी शब्द रूढ झाले. या शब्दांना असलेल्या अब्राहमिक छटा हिंदू संकल्पनांना कसा संकुचितपणा आणतात, त्याचा विचार या इंग्रजी शब्दांचे उपयोजन करण्यापूर्वी विशेष झालेला दिसत नाही. सर्वांत उघड उदाहरण म्हणून आपण धर्म याच शब्दाकडे पाहू. धर्म हा शब्द आपण अनेक अर्थांनी वापरतो. त्यात वर्णाश्रमव्यवस्थेने निर्देशिलेली कार्ये, कर्मकांडे, उपासना, कर्तव्ये, नीती, न्याय, सामान्य व्यवहारांचे नियम असे अनेक अर्थ संदर्भानुसार अभिप्रेत असतात. यात ‘अहिंसा परमो धर्मः’ यापासून ‘लाल सिग्नल लागला की थांबणे हा वाहनचालकाचा धर्मच आहे’ इथपर्यंत सर्व अर्थ येऊ शकतात. गुणधर्म किंवा स्वभावधर्म असे शब्द आपण सहजपणे वापरतो. त्यातील केवळ उपासना इतकाच भाव घेऊन त्यास ‘रिलिजन’ असे संबोधणे म्हणजे, धर्म या शब्दाच्या अनेकविध अर्थांचे पराकोटीचे संकुचन आहे. त्याहीपेक्षा पुढचे म्हणजे, ईश्वरी उपासना इतकाच जरी अर्थ धर्म या शब्दाचा घेतला, तरी मनुष्य आणि ईश्वराचा जो संबंध मनात ठेवून भारतीय लोक उपासना करतात, तोच भाव अब्राहमिक ‘रिलिजन’मध्ये नाही. त्यामुळे रिलिजन शब्दामुळे धर्म शब्दाच्या अर्थाचे केवळ संकुचन होत नाही, तर त्या मर्यादित अर्थाचेसुद्धा अर्थांतरण होते. जी गोष्ट धर्म शब्दाची तीच ईश्वर शब्दाचीही. अब्राहमिक रिलिजनमध्ये विश्वाचा परमशास्ता म्हणून ’गॉड’ याचा उल्लेख येतो. या ’गॉड’चा ’जी’ नेहमी मोठ्या लिपीतला असतो. या गॉडचे विश्वाशी आणि त्यातल्या मानवाशी काही विशिष्ट नाते आहे. मानवाला त्याने आपल्या स्वतःच्या रूपात बनवलेले आहे. आपल्याकडे मुळात एक ईश्वर संकल्पना नाही, तर प्रत्येकाला त्याच्या साधनेच्या पातळीनुसार विविधप्रकारे ईश्वरतत्त्वाचे आकलन होत असते. त्यामुळे आपल्याकडे मूर्तीरूपातील सगुण साकार देव असतात. त्यांना त्यांच्या अवतारकार्यानुसार अधिकचे अवयव असतात. देवांचे देव अशा ईश्वराची कल्पना असते आणि निर्गुण निराकार अशा परब्रह्माचीही कल्पना हिंदू विचारात येते. यापैकी कुठलीही कल्पना एकमेकांशी समरूप तर नाहीच; पण अब्राहमिक ‘गॉड’शीही नाही. त्यातून यातली कुठलीही एकच संकल्पना बरोबर आहे, असेही आपण मानत नाही, तर अव्यक्त अशा ईश्वराला आपल्या मर्यादित बुद्धीने समजण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो, तेव्हा ध्यानात आलेल्या या प्रतिमा आहेत असे मानले जाते. त्यामुळे ईश्वराच्या असंख्य शब्दांना ‘गॉड’ असेच जर म्हणायचे असेल, त्या इंग्रजी भाषांतराला सततचे ‘नेति नेति’ म्हणण्याची पाळी येते.
भाषांतराचा प्रश्न केवळ आध्यात्मिक पातळीवरच जाणवतो असे नाही. अत्यंत व्यावहारिक पातळीवरही काही संकल्पना या संस्कृतीसापेक्ष असू शकतात, त्यामुळे त्यांच्या भाषांतरातही अशाच प्रकारचे भावांतर घडण्याचा धोका संभवतो. धर्म आणि मोक्ष या परलोकाकडे दृष्टी ठेवणार्या पुरुषार्थांच्या बरोबरीने, अर्थ आणि काम हे इहलोकाकडे दृष्टी ठेवणारे पुरुषार्थही आपल्या संस्कृतीत सांगितलेले आहेत. परंतु, या शब्दांचे जे मर्यादित अर्थ आपण ध्यानात घेतो, त्यातून त्याचा मूळ अर्थ बरेचदा लोप पावतो. किंबहुना त्यातील अर्थ-पुरुषार्थाचे महत्त्व, इतर पुरुषार्थांनाही ’अर्थ’ संबोधून दर्शवलेले आहे. केवळ इहलोकात श्रेष्ठ अशा कर्तृत्वाचे प्रदर्शन करून, एका उच्च आर्थिक परिस्थितीत पोहोचणे इतकाच त्याचा अर्थ अभिप्रेत नाही आणि अर्थकारणात यशस्वी झाल्यावर आपल्या मनाच्या कामनेप्रमाणे त्याचा कामभोग घेत राहणे, हा काम पुरुषार्थाचाही अर्थ नाही. या दोन्हींचा अर्थ समजण्यासाठी पुन्हा हिंदू विचारानुसार जीवाचे सत्यस्वरूप काय आणि त्याचे जीवितकार्य काय याचे आकलन आवश्यक आहे. दुसर्या बाजूने अब्राहमिक संस्कृतीमधील ’सीन’ आणि ’व्हर्च्यु’ या संकल्पना, भारतीय समाजाला त्यांच्या संदर्भाशिवाय आकलन होणे कठीण आहे. आपण ’सीन’चे भाषांतर ‘पाप’ असे करतो आणि ’पुण्य’ शब्दाला काय म्हणावे ते शब्दकोशात शोधत बसतो. मानवाचा जन्मच पापाचरणातून झालेला आहे, अशा मान्यतेत ‘पुण्य’ संकल्पना उद्भवतच नाही. त्यामुळे ’सीन’ आणि ’व्हर्च्यु’ या न-करणीय आणि करणीय अशा भविष्यात घडू शकणार्या कृत्यांची यादी आहे. याउलट पाप-पुण्य हे आधी हातून घडते आणि मग त्याचे शब्दांतून वर्णन येते, हा भेद आपल्या लक्षात येत नाही.
भौतिकशास्त्रांमध्येही आपण ‘ग्रह-नक्षत्रे’ आणि ‘प्लॅनेट’ हे शब्द पर्यायवाची म्हणून कित्येकदा वापरतो. मग सूर्य ग्रह आहे का तारा आणि राहू-केतू हे नेमके काय समजावेत? असा प्रश्न हा संकल्पनात्मक भेदाच्या अज्ञानातून विचारला जातो. भारतीय खगोलशास्त्र हे विश्वाविषयीच्या निरुद्देश कुतूहलातून निर्माण झालेले नसून, अधिकाधिक अचूक कालमापन करत विश्वाच्या आवर्ती नियमाला समजून घेण्यासाठी विकसित झाले आहे. त्यामुळे त्यात स्थिर नक्षत्रे आणि त्यांची स्थाने चक्रीय गतीने ग्रहण करणारे ‘ग्रह’ अशी संकल्पना आहे. त्या खगोलीय वस्तूंच्या मूळ स्वरूपाविषयी त्या शब्दांनी काही ध्वनित होत नाही. त्यामुळे भारतीय चिंतनातील ग्रह आणि तारे या परस्परांहून भिन्नच असल्या पाहिजेत, अशा संकल्पना नाहीत. म्हणून सूर्य एकाच वेळी ग्रह आणि तारा आहे आणि राहू हा कोणतेही भौतिक अस्तित्व नसलेला केवळ एक भूमितीय बिंदू असला, तरी तोही ग्रह आहे.
भाषांतराच्या या मर्यादा लक्षात घेतल्यास असा प्रश्न पडतो की, मग भिन्नभाषक समाजांचा परस्परसंवाद घडणार कसा? या प्रश्नाचा विचार करण्यापूर्वी आपल्याला भाषांतर हे भावांतर का व कधी ठरते? ते लक्षात घ्यायला हवे. पहिले म्हणजे भिन्न भाषा याचा अर्थ नेहमीच भिन्न संस्कृती होतो असे नाही. याचे उत्तम आणि आपल्याला सुपरिचित उदाहरण भारत आहेच; पण आग्नेय आशियातील सर्व देश हे भारतासारखेच बहुभाषक पण एक संस्कृती असलेले आहेत किंवा असेही म्हणता येईल की, संस्कृतीची स्थानिक अभिव्यक्ती जरी भिन्नभिन्न असली, तरी अंतर्यामीची तत्त्वे एक आहेत. त्यामुळे विविध भाषांमध्ये कित्येकदा शब्द सामायिक असतात किंवा त्याच अर्थाचे शब्द सहज उपलब्ध असतात. म्हणूनच आपण भिन्न भारतीय भाषांमधून मराठीत किंवा उलटप्रकारे केलेली भाषांतरे सहज समजावून घेऊ शकतो. इंग्रजीसारख्या परकीय भाषेत भाषांतरे करताना मात्र हे सतत लक्षात ठेवले पाहिजे की, विविध शब्दांच्या छटांना असलेले भावार्थ पुष्कळ वेगळे असू शकतात. त्यांच्या शब्दांना त्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी असते. त्यामुळे शब्दाला शब्द देऊन चालत नाही. कित्येकदा त्यामुळे धर्म, ईश्वर, सनातन, यासारखे शब्द तसेच्या तसे वापरण्याचा आग्रह धरला जातो.
परंतु, भाषांतर करताना भावांतराचा सर्वाधिक धोका उद्भवतो, जेव्हा दोन भिन्नभाषक संस्कृती समप्रतलावरून संवाद साधू शकत नाहीत. ब्रिटिश राजवटीत जेव्हा इंग्रजी भाषा महत्त्वाची धरून सर्व ज्ञानपरंपरा इंग्रजीत आणली, तेव्हा इंग्रजी संस्कृतीत अनुभवले न गेलेले असे काही ज्ञान असू शकेल आणि ते त्यांच्या स्थानिक भाषेतूनच पुढे आणावे लागेल, याचा विचार होऊ शकला नाही. स्वाभाविकपणे गेल्या शतकात भारतीयांच्या अनेक विद्यांचे असे सीमित अनुवाद निर्माण झाले आहेत. आज आपण त्याच अनुवादांना प्रमाण मानून पुढे चाललो आहोत. विविध कारणांनी मूळ स्रोतांकडून संस्कृत अथवा अन्य प्राचीन भाषांमधून या विद्या शिकण्याची क्षमता, हळूहळू आपल्या समाजातून नष्ट होत चालली आहे. या भावांतरातून निर्माण होणार्या सपाटीकरणामुळे, अनेक विषयांचे गुह्य अर्थ लोप पावत असतील आणि कित्येकांचे झाले आहेत. भावांतरातून भावलोपाची ही अनिष्ट दिशा बदलायची असेल, तर भाषांतराच्या मर्यादा लक्षात घेऊन आणि जेत्यांची भाषा आणि जितांची भाषा असा भेद न करता, सर्व भाषांच्या प्रति समादर ठेवून संकल्पनांचे खरे भाषांतर करावे लागेल.
डॉ. हर्षल भडकमकर