
जगात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात सातत्याने बदल प्रवाही असतात. आज जगात सर्वत्र अस्थितरता असतानाही होणारे बदल या क्षेत्रात प्रामुख्याने जाणवत आहेत. त्यातील काही बदल चांगले असले, तरी काही बदलांमुळे कर्मचारी कपातीची नामुष्कीही ओढावत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील या बदलांचा घेतलेला आढावा...संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस’ म्हणजेच नावाजलेल्या अशा ‘टीसीएस’या आघाडीच्या कंपनीने कर्मचारी कपातीची शक्यता वर्तवली आहे. जागतिक स्तरावर वाढलेली व्यावसायिक अस्थिरता व नजीकच्या काळातील अनिश्चित परिस्थिती लक्षात घेऊन ’टीसीएस’ मध्यम व उच्चस्तरीय स्तरांवरील सुमारे १२ हजार कर्मचार्यांना सेवामुक्त करण्याची शक्यता आहे. आजतागयत व्यावसायिकता, व्यवस्थापन आणि कर्मचार्यांप्रति सहानुभूतीपूर्वक भूमिका बाळगणार्या ‘टीसीएस’च्या कर्मचारीकपातीच्या निर्णयाचे संभाव्य परिणाम देशातील माहिती तंत्रज्ञान व संगणकीय सेवा क्षेत्रात सर्व स्तरावर उमटणे स्वाभाविक होते.
यासंदर्भात प्रामुख्याने व सर्वप्रथम उमटलेली ‘टीसीएस’ व्यवस्थापनाची प्रतिक्रिया वर नमूद केली असून, कर्मचार्यांच्या कपातीसंदर्भात आलेली त्यांची प्रतिक्रिया म्हणजेच प्रस्तावित भूमिका होय! ही भूमिका म्हणजे सद्यस्थितीत भारतातील संगणक क्षेत्र आणि संबंधित क्षेत्रातील अस्थिरतेचे द्योतकच समजायला हवी.
या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, सध्या आपले माहिती तंत्रज्ञान व संबंधित क्षेत्र हे मोेठ्या स्थित्यांतरातून जात आहे. यामुळे भारतातील संगणकीय सेवा उद्योगात तंत्रज्ञानापासून माहितीची देवाण-घेवाण, आर्थिक व्यवहार या सार्यांवरच मोठे परिणाम होत आहेत. याचे परिणाम भारतासह जागतिक स्तरावरही होत आहेत. यामध्ये विविध संसाधनांच्या नेमक्या व मोजक्या वापरासह आर्थिक निर्बंधांवर भर देण्यात येत असून, त्याचा अपरिहार्य परिणाम कर्मचारी आणि त्यांच्या संस्थेवर होत आहे.
दरम्यान, संगणक क्षेत्र आणि व्यवसायाला त्यांच्या फायदेशीर अस्तित्वासाठी कार्यालय, कर्मचारी, तंत्रज्ञान व आर्थिक दृष्टिकोन या सर्व बाबींचा साकल्याने विचार करूनच, त्यानुसार ध्येयधोरणाची नव्याने आखणी वा प्रसंगी फेरआखणी करावी लागते. वाढती स्पर्धा हा मुद्दासुद्धा सर्वांसाठी महत्त्वाचाच ठरतो. त्यातच भर पडते ती संगणक सेवा क्षेत्रातील वाढत्या अपेक्षांची! त्यांची पूर्तता करण्यासाठी यापूर्वी न वापरलेल्या उपाययोजनांचा विचार आणि वापर करणे अपरिहार्यच ठरते. यामध्ये कार्यालयीन जागा व कामकाजापासून, कर्मचार्यांच्या कार्यक्षमतेपर्यंत सर्वच मुद्द्यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात येतो.
याचदरम्यान संगणक सेवा क्षेत्रातील अजून एक नामांकित कंपनी असलेल्या ‘इन्फोसिस’ने, त्यांच्याकडे कोणतीही कर्मचारी कपात होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘इन्फोसिस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सलिल प्रकाश यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता व कर्मचार्यांच्या नव्या स्वरुपातील कौशल्यविकासाद्वारे, कंपनीच्या कर्मचारी कपातीसंदर्भातील चर्चेला पूर्णविराम दिला आहे. एवढेच नव्हे, तर एकीकडे कर्मचारी कपातीची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावतानाच, ‘इन्फोसिस’ आगामी वर्षभरात सुमारे २० हजार नव्याने उत्तीर्ण झालेल्या संगणक पदवीधरांना प्रशिक्षार्थी म्हणूनही घेणार असल्याची केलेली घोषणा हा सध्या मुख्य चर्चेचा विषय झाला आहे.
कंपनीच्या व्यवसाय आणि व्यवस्थापनाची दिशा स्पष्ट करताना सलिल प्रकाश यांनी स्पष्ट केलेली बाब म्हणजे, नव्या व्यावसायिक गरजा व व्यवस्थापन पद्धती यांचा व्यवसायानुकूल भर देण्यावर त्यांचा भर राहणार असून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिकाधिक परिणामकारक वापर करून व्यवसाय वाढवणे हे कंपनीचे उदिष्ट आहे. त्याचवेळी कृत्रिम बुद्धिमत्ता हे क्षेत्र सर्वार्थाने नवे असल्याने, त्यातील कौशल्यपूर्ण कर्मचार्यांची सर्वत्र वानवा आहेच. कौशल्यांच्या संदर्भातील नेमकी हीच गरज व त्याच्याशी निगडित आव्हाने लक्षात घेऊन, कंपनीने नव्याने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी उमेदवारांना प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून, नव्या कर्मचार्यांची निवड करण्याच्या पहिल्या टप्प्यात सुमारे १६ हजार प्रशिक्षार्थी कर्मचार्यांची नेमणूक केली जाणार आहे, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
सुरुवातीलाच नमूद केल्यानुसार, सध्या जगाच्या पाठीवर माहिती तंत्रज्ञान उद्योग क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणावर व्यवसाय, कार्यपद्धती, धोरण, विस्तार, कर्मचार्यांचे प्रश्न यावर मोठ्या प्रमाणावर विमर्श सुरु आहे. त्यानुसार संबंधित कंपनींच्या धोरणात आणि कामकाजाच्या शैलीमध्ये आवश्यक बदल करणे अपरिहार्य ठरत आहे.
संगणक क्षेत्रातील या महत्त्वाच्या बदलांमध्ये प्रामुख्याने पुढील मुद्द्यांचा समावेश करता येईल.
व्यावसायिक फायद्यासाठीची तीव्र स्पर्धा : इतर व्यवसायांप्रमाणेच संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान व्यवसायामध्ये स्पर्धा असणे अपरिहार्य असले, तरी सध्या या स्पर्धेची व्याप्ती आणि तीव्रता प्रकर्षाने वाढली आहे. सध्या अधिकाधिक नफा मिळविण्यावरच भर दिला जात असून, त्यासाठी प्रसंगी अतिरेकी व्यावसायिक नीतीपद्धतींचा वापर केला जात आहे.
व्यावसायिक फेररचना : बदलत्या व्यावसायिक गरजा, वाढती स्पर्धा व विविध स्वरूपांची आव्हाने या सार्यांना एकाचवेळी तोंड देण्यासाठी व्यवसाय-व्यवस्थापन आणि कंपनी-कर्मचारी या क्षेत्रांची पुनर्रचना करणे सध्या अपरिहार्य झाले आहे. यासाठी उपाययोजना म्हणून, कृत्रिम बुद्धिमता क्षेत्र अग्रक्रमाने पुढे येत आहे. त्याचा वापरही आवश्यकच नव्हे, तर अपरिहार्यपण ठरला आहे.
कर्मचार्यांचे सोडून जाणे : कंपन्यांसाठी परिणामकारक स्वरूपाचे काम करणार्या कर्मचार्यांचे राजीनामे हे मोठे आव्हान असते. सद्यस्थितीत व वाढत्या व्यावसायिक स्पर्धेला तोंड देताना, विशेषतः एरव्हीसुद्धा कामाच्या व कौशल्यप्राप्त कर्मचार्यांना टिकवून ठेवणे हे संगणकशास्त्र उद्योगासाठी आवश्यक आहे. तरी सध्या हीच बाब बदलत्या परिस्थितीत या व्यवसाय क्षेत्रासाठी अत्यावश्यक ठरली आहे.
याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाकडे शस्त्र आणि शास्त्र उभय दृष्टिकोन आणि भूमिकांसह पाहाणे गरजेचे आहे. कंपनी, तिचे कामकाज, कर्मचारी या सार्यांसाठीच नव्या बदलांचा अपरिहार्य हिस्सा म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेतले पाहिजे. त्यातूनच कर्मचार्यांची व पर्यायाने कंपन्यांची उपयुक्तता निश्चितपणे व्यवसायपूरक ठरणार आहे.
दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत)
९८२२८४७८८६