१५ ऑगस्ट १९७५, ‘शोले’ आणि ‘३२, धानमंडी’

    16-Aug-2025
Total Views |

ढाक्यातील ‘३२, धानमंडी’ या पत्त्यावर दि. १५ ऑगस्ट १९७५ रोजी बांगलादेशचे राष्ट्रनिर्माते शेख मुजीबुर रहमान, त्यांचा परिवार आणि अन्य पाठीराखे अशा एकूण ४८ लोकांना त्यांच्याच घरात ठार मारण्यात आले. त्याच दिवशी भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या भाषणात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या निर्णयाचे समर्थन केले आणि त्याच दिवशी ‘शोले’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. तेव्हा, भारतात एकीकडे पडद्यावरील हिंसाचार आणि दुसरीकडे बांगलादेशात वाहिलेले रक्ताचे पाट, असा हा १५ ऑगस्ट १९७५चा रक्तरंजित इतिहास...

धानमंडी म्हणजे धान्यबाजार. ब्रिटिश इंडियामधल्या एकत्रित बंगाल प्रांतात ढाका (डाक्का हा भ्रष्ट इंग्लिश उच्चार) हे एक संस्थान होते. स्वातंत्र्योत्तर काळात बंगालचे दोन तुकडे झाले. पश्चिम बंगाल भारताकडे राहिला, तर पूर्व बंगाल हा पूर्व पाकिस्तान बनला आणि शहर ढाका ही त्याची राजधानी बनली.

ढाका शहरातल्या धानमंडी मोहल्ल्यात ३२ क्रमांकाच्या घरात फरीदपूरचे जमीनदार शेख लुत्फुर रहमान राहत असत. त्यांचा मुलगा म्हणजे शेख मुजीबुर रहमान. ‘शेख मुजीब’ या नावाने ते जास्त प्रसिद्ध झाले. पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर पश्चिम पाकिस्तानमधले पंजाबी भाषिक आणि उर्दू भाषिक मुसलमान, पूर्व पाकिस्तानमधल्या बंगाली भाषिक मुसलमानांना चेपायला लागले. याविरुद्ध बंगाली मुसलमानांचा असंतोष संघटित करण्याचे काम ‘अवामी लीग’ या शेख मुजीब यांच्या संघटनेने केले. संघटना पुढे जाऊन राजकीय पक्ष बनली. या पक्षाने निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. यातून १९७१ साली भारत-पाक युद्ध झाले आणि पूर्व पाकिस्तान हा ‘बांगलादेश’ या नावाचे एक स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र बनता. शेख मुजीब हे त्याचे पहिले राष्ट्राध्यक्ष!

राष्ट्राध्यक्ष बनले तरी वेगळ्या सरकारी बंगल्यात निवास करण्याऐवजी शेख मुजीब हे धानमंडीतल्या आपल्या वडिलोपार्जित घरामध्येच राहत. त्यामुळे ‘३२, धानमंडी, ढाका’ हा पत्ता एकदम आंतरराष्ट्रीय ख्यातीचा बनला. पण, त्यांची ही ख्याती १९७२ ते १९७५ अशी तीनच वर्षे टिकली. दि. १५ ऑगस्ट १९७५ या दिवशी ‘३२, धानमंडी’ या घरातून रक्ताचे पाट वाहिले. बंडखोरांनी शेख मुजीब आणि त्यांचे सर्व कुटुंब गोळ्या घालून ठार केले. दि. १५ ऑगस्ट १९७५ या दिवशी सकाळी बांगलादेशात, ढाका राजधानीत ही रक्तरंजित क्रांती होत असताना, शेजारी भारतात काय घडत होते? फक्त पावणेदोन महिने अगोदर म्हणजे, दि. २५ जून १९७५ या दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांच्या सहीच्या अध्यादेशाने संपूर्ण देशात आणीबाणी घोषित केली होती. सर्व प्रकारचे नागरी अधिकार रद्दबादल करण्यात येऊन, ‘मिसा’ आणि ‘कॉफेपोसा’ नामक दोन नव्या कायद्यांखाली अनेक विरोधी राजकीय नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते.

दि. १५ ऑगस्ट १९७५ या दिवशी शुक्रवार होता. नेहमीच्या प्रथेनुसार लाल किल्ल्याच्या सौधावरून इंदिरा गांधींनी ध्वजारोहण आणि भाषण केले. या भाषणात त्यांनी आणीबाणीच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. राजकीय क्षेत्रात अशा जोरदार हालचाली सुरू असताना, सर्वसामान्य लोक एका वेगळ्याच विषयात गुंतून पडले होते. सर्वसामान्य भारतीय लोकांच्या भावविश्वात हिंदी चित्रपट या गोष्टीला एक महत्त्वाचे स्थान आहे. नवा हिंदी चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. त्यानुसार दि. १५ ऑगस्ट १९७५ रोजीच्या शुक्रवारी ‘शोले’ हा भव्य चित्रपट प्रदर्शित व्हायचा होता. ७० एमएमचा भव्य पडदा, स्टीरीओफोनिक साऊंड सिस्टम आणि संजीव कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन अशा लोकप्रिय नटांची गर्दी असलेल्या या चित्रपटाच्या जोरदार जाहिरातींनी प्रेक्षकांची उत्सुकता अगदी कळसाला नेऊन पोचवली होती.

त्यानुसार या दिवशी चित्रपट अगदी वाजत-गाजत प्रदर्शित झाला आणि त्याने हिंदी चित्रपटातल्या हिंसेचे नवे उच्चांक स्थापित केले. म्हणजे ‘शोले’च्या आधी हिंदी चित्रपटाने इतया मोठ्या प्रमाणावर हिंसा प्रदर्शित केलेली नव्हती. ही ५० वर्षांपूर्वीची गोष्ट झाली. आता हिंदी पडद्यावर इतकी अमानुष हिंसा बोकाळली आहे की, ‘शोले’मधली हिंसा अगदीच भेंड्याची भाजी वाटावी. ‘शोले’मधला खलनायक गब्बरसिंग, ठाकूर बलदेवसिंगच्या संपूर्ण कुटुंबाची कत्तल करतो.

१९६८ साली हॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक सर्जिओ लिओनी याने ‘वन्स अपॉन अ टाईम इन द बेस्ट’ या नावाचा एक चित्रपट काढला होता. खलनायकाने एका कुटुंबाची सामुदायिक कत्तल उडवण्याचे ‘शोले’मधले दृष्य मुळात या ‘वन्स अपॉन....’मधून उचललेले आहे. ‘शोले’ पाहणारे प्रेक्षक थक्क होऊन ते पाहत असताना, याच दिवशी सकाळी ढाका शहरात, बांगलादेशच्या सैन्यातील काही अधिकार्‍यांनी शेख मुजीबसहित एकूण ४८ लोकांना असेच गोळ्या घालून ठार मारले होते. भारतीय प्रेक्षक चित्रपटातली खोटी-खोटी कत्तल स्तिमित होऊन पाहत असताना, बांगलादेशच्या लष्करी अधिकार्‍यांनी खरीखुरी कत्तल सहजपणे केली.

द्विराष्ट्रवाद सिद्धांत

बॅरिस्टर महंमद अली जिना यांनी, "हिंदू आणि मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्र असून, इंग्रजांनी भारत सोडल्यावर मुसलमानांना हिंदूंसोबत राहायचे नाही. त्यांना त्यांचा वेगळा देश हवा,” असा सिद्धांत मांडला. यालाच ‘द्विराष्ट्रवाद सिद्धांत’ म्हणतात. काँग्रेसी हिंदू नेत्यांवर दबाव आणण्यासाठी जिनांनी दि. १६ ऑगस्ट १९४६ हा दिवस ‘डायरेक्ट अ‍ॅशन डे’ म्हणून जाहीर केला. त्यानुसार कोलकाता शहरात मुसलमानांनी ‘डायरेट अ‍ॅशन’ घेऊन दहा हजार हिंदूंना ठार मारले. हे सहजपणे घडले. कारण, बंगाल प्रांताचा मुख्यमंत्री बॅरिस्टर हुसेन शाहिद सुर्‍हावर्दी हा जिनांचा उजवा हात होता आणि तेव्हा २६ वर्षांचा असलेला शेख मुजीबूर रहमान हा तरुण कार्यकर्ता सुर्‍हावर्दीचा उजवा हात होता.

असो! पुढे पाकिस्तान निर्माण झाला. लगेचच पहिली ठिणगी पडली. नवजात पाकिस्तानची राष्ट्रभाषा म्हणून उर्दूची घोषणा करण्यात आली. पश्चिमेकडच्या पंजाबी आणि सिंधी मुसलमानांना उर्दू येत होती. त्यामुळे त्यांचे काही अडले नाही. पण, या पूर्वेकडच्या मुसलमानांना उर्दूचा गंध नव्हता. शेवटी जिनांना उर्दू, बंगाली आणि इंग्रजी या तिन्ही भाषा अधिकृत असल्याचे जाहीर करावे लागले. परंतु, लवकरच या बंगाली मुसलमानांना कळून चुकले की, पाकिस्तानच्या एकंदर राज्यकारभारात आपणा बंगाली भाषिकांना काहीही स्थान नाही. इंग्रजांनी भारत सोडण्यापूर्वी काही बंगाली मुसलमानांच्या असे मनात होते की, इंग्रजांनी मुघलांचा सुभेदार असलेल्या बंगालच्या नबाबाकडून, सिराजउद्दौला याच्याकडून बंगाल जिंकला होता; मग आता त्यांनी तो काँग्रेसला न देता आम्हाला द्यावा आणि आम्ही बंगाल हे एक स्वतंत्र राष्ट्र घोषित करावे. पण, त्यांना ते जमले नाही.

आता पुन्हा त्यांना वेगळे व्हावेसे वाटू लागले. तेवढ्यात राजकारणात घालमेली झाल्या आणि १९५६ साली शाहिद सुर्‍हावर्दी एकदम पाकिस्तानचे पंतप्रधान बनले. झाले. वेगळ्या बंगालची भाषा काही काळ बंद पडली. १९५८ साली जनरल अयुबखान यांनी लोकशाही, घटना वगैरे सगळे गुंडाळून बाजूला ठेवले. पाकिस्तानात हुकुमशाही सुरू झाली. अयुब राजवटीत अर्थातच पंजाबी मुसलमानांची दादागिरी वाढली. कारण, सैन्यात मोठ्या प्रमाणावर तेच होते. त्यामुळे १९६० सालापासून शेख मुजीब यांचा अवामी लीग पक्ष हळूहळू बंगाली मुसलमान हे एक वेगळे राष्ट्र आहेत, असे म्हणू लागला. पश्चिम पाकिस्तान भागातून निर्माण होणार्‍या महसुलापेक्षा पूर्व पाकिस्तान भागातून निर्माण होणारा महसूल किमान २० टक्के अधिक होता. पण, सरकारी खर्चाचा अधिकांश भाग मात्र पश्चिम पाकिस्तानवर खर्च होत होता. त्यामुळे बंगाली मुसलमान अर्थतज्ज्ञ रहमान सोभान यांनी असे उद्गार काढले की, "पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांची आर्थिक रचनाच एकमेकांहून पूर्णपणे भिन्न आहे. देश एक, पण आर्थिक व्यवस्था दोन असा हा द्विराष्ट्रवाद आहे.” रहमान सोभान महाशय आजमितीला ९० वर्षांचे आहेत. थोडक्यात, आम्हाला हिंदूंबरोबर राहायचे नाही, म्हणून जबरदस्तीने वेगळे झाले. पण, धर्म समान असूनही भाषा वेगळ्या आहेत, यावरून दोन मुसलमान प्रांतांचे एकमेकांशी जमेना.तेढ वाढत गेली. त्यात विविध आंदोलने केल्यामुळे शेख मुजीबूर रहमान यांचा अवामी लीग पक्ष आणि त्यांची स्वतःची प्रतिमा मोठीमोठी होत गेली. १९७० साली पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान यांची पहिली सार्वजनिक निवडणूक झाली. तिच्यात अवामी लीग पक्ष बहुमताने निवडून आला. म्हणजे आता तो पक्ष सरकार बनवणार. शेख मुजीब पंतप्रधान होणार. हे सगळे नामधारीच होते. कारण, खरी सत्ता सेनापती जनरल याह्याखान यांच्याच हातात राहणार होती. पण, नामधारी सत्तादेखील बंगाली मुसलमानांकडे सोपवणे पंजाबी याह्याखान आणि परराष्ट्रमंत्री असलेले सिंधी झुल्फिकार अली भुट्टो यांना सहन होईना. त्यांनी शेख मुजीबना कैद केले आणि बंगाली मुसलमानांवर भीषण अत्याचार सुरू केले. त्यामुळे एप्रिल १९७१ सालापासून रोज लक्षावधी पूर्व पाकिस्तानी नागरिक भारताकडे येऊ लागले.

अगदी अपरिहार्यपणे भारताला युद्घ करावे लागले. डिसेंबर १९७१ साली भारताने पाकिस्तानी सैन्याचा निर्णायक पराभव केला. पूर्व पाकिस्तान हा ‘बांगलादेश’ या नावाने बंगाली भाषिक मुसलमानांचा वेगळा, स्वतंत्र देश बनला. शेख मुजीब त्याचे राष्ट्राध्यक्ष बनले. ‘३२ धानमंडी, ढाका’ हे त्यांचे वडिलोपार्जित घर आता राष्ट्राध्यक्ष निवास बनले.
पण, विरोधी पक्ष नेता म्हणून आंदोलने चालवणे वेगळे आणि राज्यकर्ता म्हणून प्रशासन चालवणे वेगळे. शेख मुजीब यांच्या सरकारबद्दल लगेचच नाराजीचे सूर उमटू लागले. भ्रष्टाचार वाढू लागला. अमक्याचा भाचा, तमक्याचा पुतण्या अशा लोकांना महत्त्वाच्या जागा, पदे मिळू लागली. याला ‘नेपॉटिझम’ असे म्हटले जाते. त्यातच १९७४ साली बांगलादेशात मोठा दुष्काळ पडला. या संकटाशी दटून सामना करण्याऐवजी शेख मुजीब यांनी, हिटलरच्या ‘गेस्टापो’ या गुप्त पोलीस संघटनेच्या धर्तीवर एक संघटना काढून प्रशासनाची पकड पक्की करण्याचा प्रयत्न केला. या संघटनेतले लोक फारच माजोरीपणा करू लागले. मुझम्मल हक नावाच्या कार्यकर्त्याने भर वरातीतून वधू-वरांची गाडीच पळवली. वर आणि वाहनचालकाला ठार मारले आणि तीन दिवस सतत आपल्या गुंड कार्यकर्त्यांसह वधूवर अत्याचार करून अखेर तिचा मृतदेह एका गटारात फेकून दिला. शेख मुजीबनी मुझम्मल हकवर पांघरूण घातले.

अशा अनेक घटना एकत्र होत-होत अखेर बांगलादेशच्या सैन्यातील अधिकार्‍यांनी ठरवले असावे की, लोकशाहीची थेरे पुष्कळ झाली. सनदशीर मार्गाने वगैरे राजवट बदलायला आपण थोडेच हिंदू आहोत? आपली परंपरा तर औरंगजेबाची! तेव्हा त्यांनी मस्तपैकी दि. १५ ऑगस्ट रोजीचा मुहूर्त गाठला. स्वतः शेख मुजीब, त्यांचा परिवार आणि अन्य पाठीराखे अशा एकूण ४८ लोकांना त्यांच्या घरातच ठार मारले आणि यशस्वी राज्यक्रांती केली. दि. १५ ऑगस्ट १९७५ ते दि. १५ ऑगस्ट २०२५! जिनांचा ‘द्विराष्ट्रवाद सिद्घांत’ खोटा आहे, हे सिद्ध करणार्‍या घटनेला ५० वर्षे झाली.

मल्हार कृष्ण गोखले