
रा. स्व. संघाने शताब्दी वर्षानिमित्त ‘पंच परिवर्तना’ची संकल्पना समाजाच्या तळागाळात पोहोचविण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये स्वदेशी, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण यांसह नागरी कर्तव्यांचाही प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने आणि नुकत्याच संपन्न झालेल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, या नागरी कर्तव्याचे समाजातील महत्त्व प्रत्येकाने समजून घेणे, ते इतरांना समजावून सांगणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्यच मानायला हवे.आपण अमृतकाळात प्रवेश केला असून, २०४७ सालापर्यंत आपला देश सर्वार्थाने विकसित झालेला पाहू इच्छितो; तेव्हा या महान देशाचे नागरिक म्हणून, नागरी शिष्टाचार ही आपलीसुद्धा जबाबदारी आहे. आपल्या नागरी व्यवहाराचा आणि उपक्रमांचा जागतिक स्तरावर, सामाजिक आरोग्यावर आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेवर महत्त्वपूर्ण परिणाम होतो. आपण आपली मुळे विसरलो आहोत आणि पाश्चात्य संस्कृती स्वीकारली आहे, परिणामी एक कृत्रिम आणि वरवरचा समाज निर्माण झाला आहे, जो आपल्या पूर्वजांनी पाळलेल्या आणि शिकवलेल्या नागरी जाणीवेला विसरलेला दिसतो. आपण स्वार्थी झालो आहोत आणि नागरी शिष्टाचार सरकार किंवा इतर लोकांची जबाबदारी आहे, असे आपण मानतो. परिणामी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या ‘पंच परिवर्तन योजने’त हा महत्त्वाचा सामाजिक मुद्दा समाविष्ट केला आहे, जो सर्व भारतीयांनी स्वीकारायला हवा, जेणेकरून एक नागरी विचारसरणीचा समुदाय जोपासता येईल आणि वाढेल. भारताला सर्वांत संपन्न असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे आणि भारतीय चांगल्या शिष्टाचारांसह स्वच्छ, निरोगी वातावरणात राहत होते. म्हणून, सर्वप्रथम आपण बहुसंख्य भारतीयांनी या गुणांना का गमावले, याकडेही लक्ष दिले पाहिजे.
आपल्या स्वार्थाला आणि लोभाला जन्म देणारी सदोष शिक्षणव्यवस्थामेकॉलेच्या शिक्षण पद्धतीची समस्या अशी आहे की, आपल्या पालकांकडे, शिक्षकांकडे किंवा संस्थांकडे पुढच्या पिढीला या विषयाबद्दल शिकवण्याचे शिक्षण, कौशल्य किंवा संवेदनशीलता नाही. जरी हे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट असले, तरी शैक्षणिक व्यवस्था आणि शिक्षक मुलांचं वैयक्तिक व राष्ट्रीय चारित्र्य घडवण्यात अपयशी ठरत आहेत, हे मान्य करावे लागेल. परिणामी, आपल्या मुलांना आपल्या संस्कृती आणि नैतिकतेबद्दल शिकवले जात नाही. दुसरे म्हणजे, ज्या मुलांचे पालक मद्यपी, जुगार खेळणारे किंवा फसवणूक करणारे आहेत, त्यांना पाठ्यपुस्तकातील नीतिमत्ता मदत करू शकत नाही, म्हणून आपले शिक्षक, प्रशासन, समाज आणि पालक या सर्वांनी अशा घाणीला साफ करण्यास मदत केली पाहिजे.
आजच्या बहुसंख्य सुशिक्षित तरुणांना असेही वाटत नाही की, त्यांच्या वर्तनासाठी त्यांना जबाबदार धरले पाहिजे आणि ही वस्तुस्थिती काहीशी निराशाजनक आहे. त्यांच्या वर्तनाचा सभोवतालच्या लोकांवर कसा परिणाम होतो, याची त्यांना पर्वा नाही. आम्ही असा दावा करतो की, नियम तोडण्यासाठीच तयार केलेले आहेत आणि आम्ही ते मोडतो. तथापि, नियम बनवणार्यांवर याचा काय परिणाम होतो? जे खरोखर नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर याचा काय परिणाम होतो? आम्हाला माहिती आहे की, आमच्या क्रियाकलापांचा थेट परिणाम होतो, जे आम्ही दररोज पाहतो. तथापि, आम्ही स्वतःला जबाबदार धरत नाही. कारण, मुळी आम्हाला त्याची पर्वाच नाही आणि आम्ही ते गृहीत धरतो.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने काय सामाजिक आणि आर्थिक परिणाम होतात?आपण वाहतूक नियमांचे उल्लंघन करतो आणि एखाद्याला आयुष्यभर दुखापत करतो. आपण नियम मोडतो. आपल्याला माहितीही असते की, हे आपल्याकडूनच घडले आहे. पण, आपण स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘हा भारत आहे,’ असे निमित्त वापरतो. आपण स्वतःचा बचाव करण्यासाठी तसेच ‘अपघात सर्वत्र घडतात,’ हे निमित्तदेखील वापरतो. जर आपण जे घडले ते ठीक आहे; यापेक्षा जे घडले, ते का घडले, याचा गांभीर्याने विचार केला, तर आपण वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे व्यक्तींना दुखापत होण्यापासून किंवा अपघाती मृत्यूपासून रोखू शकतो. मी अशा कित्येक वाईट गुणांची अनेक उदाहरणे देऊ शकतो. परंतु, वरील वानगीदाखल दिलेले उदाहरण हे भारतीयांमध्ये खरोखरच कमी असलेल्या नागरी शिष्टाचाराच्या अनेक उदाहरणांपैकी एक आहे.
भारतीय सामान्यतः हुशार असतात. आपण एकमेकांशी सन्मानानेही वागतो. आपल्याही काही भावना आहेत. आपल्यात देशभक्तीचीही भावना आहे. पण, जर आपल्याला आपल्या वर्तनासाठी जबाबदार धरले नाही, तर यापैकी काहीही अर्थपूर्ण नाही. यावर आपल्याला अजूनही बरेच काम करायचे आहे.
२०२१ सालच्या प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलीस विभागांच्या आकडेवारीनुसार, देशभरात १ लाख, ५३ हजार, ९७२ रस्ते अपघातात मृत्यू झाले आणि १ लाख, ७२ हजार, २७८ लोक गंभीर जखमी झाले. ’ढठखझझ-खखढ दिल्ली’च्या ‘भारतात रस्ते अपघातांचा सामाजिक-आर्थिक खर्च’ या संशोधनपत्रानुसार, वाहतूक अपघातांचा सामाजिक-आर्थिक खर्च देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या अंदाजे ३.१४ टक्के आहे.
२०२२ साली देशभरात झालेल्या ४ लाख, ६१ हजार, ३१२ अपघातांपैकी १ लाख, ०६ हजार, ६८२ (२३.१ टक्के) राज्य महामार्गांवर , १ लाख, ५१ हजार, ९९७ (३२.९ टक्के) राष्ट्रीय महामार्गांवर झाले, ज्यात एसप्रेसवेचा समावेश आहे आणि उर्वरित २ लाख, ०२ हजार, ६३३ (४३.९ टक्के) इतर रस्त्यांवर झाले. ही आकडेवारी निश्चितच गंभीर प्रश्न उपस्थित करते.
पर्यावरण व्यवस्थापन आणि स्वच्छता का महत्त्वाची?
आपल्या सर्वांना कल्पना आहेच की, सध्याच्या सरकारने एक व्यापक स्वच्छता मोहीम राबविली आहे, जी खरं तर त्यांच्या आधीच्या सरकारांनीही राबवायला हवी होती. परंतु, भारतात आपण क्वचितच आपल्या घराबाहेरील स्वच्छतेचा विचार करतो. म्हणूनच बाटल्या, रॅपर, पॅकेट्स आणि सर्व प्रकारचा कचरा रस्त्यांवर आणि महामार्गांवर दिसून येतो. आता आपण कचर्याच्या समस्येच्या शिखरावर पोहोचलो आहोत. आपण विविध मार्गांनी या समस्येवर बदल करण्याचा देखील प्रयत्न करत आहोत. परंतु, आपली सर्व ठिकाणे हिरवीगार आणि स्वच्छ करण्यासाठी किती वेळ लागेल, हे आज सांगता येणार नाही. हे आपल्या राष्ट्राचा अनादर करणारे आहे आणि आपल्या पर्यावरणाला पूर्णपणे हानी पोहोचवणारे आहे. स्वच्छता आणि स्वच्छ वातावरण राखणे, हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे. फक्त कायदा अंमलबजावणी संस्था या प्रकारच्या समस्या सोडवू शकत नाही; त्यामुळे आपले सरकार आणि इतर गैर-सरकारी संस्था विविध उपक्रमांद्वारे जागरूकता निर्माण करण्याचे काम करत आहेत. या समस्यांना तोंड देण्यासाठी आणि देश स्वच्छ ठेवण्यासाठी भारतात कायदे आहेत. उदाहरणार्थ, भारतीय दंड संहितेत कचरा टाकणे आणि सार्वजनिक घाण व कचरा करणे या संबंधित कलमेदेखील आहेत आणि या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वेगवेगळ्या स्थानिक सरकारांची स्वतःची धोरणे आहेत.
रेल्वे, मेट्रो, बस, शॉपिंग सेंटर्स अशा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे निषिद्ध आहे. परंतु, बरेच लोक हेतुपुरस्सर या गैरवर्तनात सहभागी होतात.आपल्या देशात स्वच्छता आणि योग्य कचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकारदेखील सुरू करण्यात आला आहे, जसे की ‘स्वच्छ भारत अभियान.’ अंदाजानुसार, भारतीय रेल्वे दरवर्षी १ हजार, २०० कोटी रुपयांहून अधिक रुपये आणि मोठ्या प्रमाणात पाणी खर्च करते; जेणेकरून मालमत्तेवर विशेषतः तंबाखू आणि पान खाऊन थुंकल्याने पडलेले डाग आणि खुणा काढून टाकता येतील. यानिमित्ताने हे लक्षात घ्यायला हवे की, खराब स्वच्छतेचा सामाजिक आणि आर्थिक विकासावर तसेच मानवी कल्याणावर नकारात्मक प्रभाव पडतो. कारण, त्यामुळे चिंता, लैंगिक अत्याचाराचा धोका आणि रोजगार आणि शिक्षणाच्या संधी गमावण्याची शक्यता वाढते. खराब स्वच्छतेचा संबंध आतड्यांतील जंत संसर्ग, पोलिओ, टायफॉईड, कॉलरा आणि आमांश यांसारख्या अतिसार आजारांच्या प्रसाराशी आहे. खुल्या जागेत शौचामुळे गरिबी आणि आजारांचे एक अंतहीन चक्र कायम राहते. पाच वर्षांखालील बालमृत्यू, गरिबी आणि उपासमारीचे सर्वांत वाईट दर तसेच, सर्वांत मोठी संपत्तीची तफावत अशा देशांमध्ये दिसून येते, जिथे उघड्यावर शौचाचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०१४ साली पदभार स्वीकारल्यापासून सध्याच्या केंद्र सरकारने उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशंसनीय प्रयत्न केले आहेत, जे सुमारे ६० टक्के होते.
हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, अशा क्रियाकलापांना सामोरे जाण्यासाठी केवळ कायदेशीर कारवाई करणे पुरेसे नाही. त्यासाठी नागरी कर्तव्य, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेच्या मूल्याबद्दल जागरूकता वाढवणेदेखील आवश्यक आहे. सामाजिक नियम, सार्वजनिक मोहिमा, शिक्षण आणि समुदाय सहभागाद्वारे स्वच्छ आणि अधिक सभ्य वातावरण निर्माण करता येते.
या अद्भुत राष्ट्राचे नागरिक म्हणून, भारतीय संविधानाने स्थापित केलेले सर्व नियम, कायदे आणि नियमांचे पालन करणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपण करत असलेली प्रत्येक कृती ही कायद्याचे उल्लंघन करणार नाही किंवा पर्यावरण, समाज किंवा राष्ट्रावर कोणताही नकारात्मक परिणाम करणार नाही, याची जाणीव ठेवून केली पाहिजे. ‘सर्व सरकारी मालमत्ता ही माझी मालमत्ता आहे आणि मी तिचे संरक्षण आणि काळजी घेतली पाहिजे,’ असाच प्रत्येक भारतीयाचा केवळ स्वातंत्र्य दिनापुरते नव्हे, तर ३६५ दिवस दृष्टिकोन असावा.