मी आर्यपुत्र!

    23-Aug-2025
Total Views |

आर्य या नावावर या देशात अनेकदा राजकारण झाले व आजही होत आहेत. आर्य नेमके कोण हा प्रश्न पडवा इतक्या नवनवीन भ्रामक कथा रचल्या जातात. मात्र, असत्याचा अंधार कितीही गडद असला, तरीही सत्याच्या प्रकाशाला गिळंकृत करण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी नसते. असा सत्याचा एक प्रकाशकिरण म्हणजेच डॉ.भारती सुदामे यांचे मी आर्यपुत्र हे पुस्तक! या पुस्तकाचा त्यातील ज्ञानाचा घेतलेला आढावा...

आर्यपुत्र!’ या अनुवादित पुस्तकाचे वाचन पूर्ण झाले. अत्यंत आवडत्या लेखिका डॉ. भारती सुदामे यांची सगळी पुस्तके बर्यापैकी संग्रही आहेत. त्यांचे नुकतेच अनुवादित पुस्तक ‘मी आर्यपुत्र!’ मूळ लेखक मनोज सिंह लिखित ‘मैं आर्यपुत्र हूं!’ या हिंदी पुस्तकाचा मराठी अनुवाद, डॉ. भारती सुदामे यांनी आपल्या शैलीतून छानच केला आहे. वाचनीय आणि नव्याने इतिहास जाणून घेताना, आपल्या पूर्वजांबद्दल गौरव वाटावा असाच हा ग्रंथ ‘मी आर्यपुत्र!’ आहे.

आर्यांची कथा म्हणजेच प्राचीन भारताचा इतिहास, हवं तर भारताचा प्राचीन इतिहास म्हणूनच आज उपलब्ध आहे. आर्यांच्या गाथांची स्वतंत्र अशी लेखनशैली आहे. हे सगळं सांगण्यामागे एक उद्देश आहे. आर्य कोण होते? केव्हा होते? कुठे होते त्यांचे वास्तव्य? ते काय करत होते? या आणि अशा असंख्य प्रश्नांच्या उत्तराची प्रामाणिक कथा म्हणजेच ‘मी आर्यपुत्र!’

आज पाश्चिमात्य विचारसरणीमुळे जे कुतर्क आणि गैरसमज सुशिक्षितांमध्ये पसरले किंवा पसरवले गेले, जाणूनबुजून काही विशिष्ट गटाचे निहित स्वार्थ साध्य करण्याच्या ज्या उद्देशाने, तत्कालिक बुद्धिजीवी वर्गाचा जो बुद्धिभेद केला गेला, त्याचे दुष्परिणाम म्हणून आजचा विकृत इतिहास आपल्या समोर आला. त्या सर्व उद्देशांचा परामर्ष या पुस्तकात घेतला गेला आहे. एवढेच नाही, तर त्यासंबंधीची तथ्यं सप्रमाण प्रस्तुत केलेली आहेत. हे सर्व पुरावे, कुठल्या ना कुठल्यातरी वैदिक ग्रंथांमध्ये उपलब्ध आहेत आणि त्याचा स्वतंत्र उल्लेख पुस्तकात पानोपानी आहे.

खरंतर पाश्चात्य दृष्टिकोनातून वेद हे संपूर्ण विश्वात, प्राचीनतम लिखित उपलब्ध साहित्यात गणले जातात. या पुस्तकात वर्णित कथेच्या आधारभूत संकल्पनांचा पाया, याच वैदिक ग्रंथांवर आधारलेला आहे. तसे नसेल, तर कोणीही यामध्ये लिहिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही, ठेवायलाही नको. असे असूनही, कितीही पुरातत्त्वीय पुरावे दिले, वैदिक ग्रंथांचे आधार उद्धृत केले, तरीही त्यावर विश्वास न ठेवणारे काही लोक असणारच आहे. विशेषत्वाने ज्या इतिहासकारांनी आर्य हे बाहेरून आलेले, आक्रमणकारी, दुष्ट, क्रूर, पाशवी, संस्कृती विरोधक आणि युद्धपिपासू होते असे गृहीत धरून इतिहासाची कास धरली आहे, अशांच्या विचारात परिवर्तन घडवून आणणे सध्यातरी शय वाटत नाही. आपली मानसिकता न बदलणे हा त्यांचा नाईलाज असेल कदाचित पण, लेखकाने त्यावर विस्तृत विवेचन केले आहे.

तर हा सगळा इतिहास त्यांच्यासाठी लिहिलेलाच नाही, लिहिला आहे तो त्यांच्यासाठी जे आपल्यासारखे सर्वसामान्य लोक आहेत; त्या भारतीयांसाठी जे आपल्या पूर्वजांना विसरले आहेत; त्यांना ओळखत नाहीत आणि जे विद्वज्जन निष्पक्ष आहेत, इतिहासात नेमकं सत्य आणि तथ्य काय आहे हे जाणून घेण्याची ज्यांना कळकळ आहे, त्यांच्यासाठी या पुस्तकाचे प्रयोजन मूळ लेखक मनोज सिंग यांनी केले आणि त्याचा रसाळ आणि ओघवत्या भाषेतील अनुवाद डॉ. भारती सुदामे यांनी केला आहे.

आर्यांचीच कथा का? कारण संपूर्ण विश्वात इतिहासाने दिलेली सर्वाधिक खोटी माहिती कोणती असेल तर ती म्हणजे, आर्य हिंदुस्थानात बाहेरून आले आणि ते आक्रमणकारी होते. भारतातल्या डाव्या इतिहासकारांची ही मानसिक गुलामीच म्हणावी लागेल की, त्यांनी हे काल्पनिक, निराधार मत उचलून धरले आणि ते प्रचलित केले. वास्तविक त्यांच्या या मताच्या समर्थनार्थ, एकही भक्कम पुरावा ते सादर करू शकलेले नाहीत.

अनेक मुद्द्यांवर जेव्हा-जेव्हा वैदिक आर्यांच्या अतिप्राचीन असण्यामुळे स्वाभाविकपणे संभ्रमाची स्थिती उत्पन्न झाली, त्यावेळी खोटेपणाचे एक फार मोठे कारस्थान-कपटनाट्य, विशिष्ट गटाकडून रचले गेले. तरीही प्रत्येक युगातल्या अभ्यासकांची, आर्य संस्कृती मुळातून समजून घेण्याची इच्छा काही कमी झाली नाही. त्याचाच परिणाम म्हणून, आज भारतवर्षातला एक खूप मोठा वर्ग, आर्यांशी संबंधित खोटेपणा मान्य करायला तयार नाही, ते सत्य जाणतात. या देवभूमीची वैदिक सभ्यता आपल्या सुवर्णयुगात एका विशिष्ट उंचीवर पोहोचलेली होती, हे जाणण्याचे पारंपरिक स्रोत त्यांच्यापाशी आहेत.

भारतात आल्यावर विदेशी शासकांनी केवळ ७००-८०० वर्षांपूर्वी, हेतुपुरस्सर आर्यांचा काळ चुकीच्या आणि भ्रामक पद्धतीने मांडला. त्यांचे कायम हेच प्रयत्न होते की कसेही करून सिद्ध करायचे की, हिंदुस्थानात अनंत काळापासून मागासलेपण, जाड्य आणि असंस्कृत समाजाचेच वास्तव्य होते. म्हणूनच ते सतत आर्य बाहेरून आलेले आणि आक्रमक आहेत, असेच भासवत आले. पण, आता ग्रंथ वाचून जाणवते आहे, त्यांच्या या प्रयत्नांमध्ये ते शेवटपर्यंत यशस्वी होऊ शकले नाहीत.

‘मी आर्यपुत्र!’ या पुस्तकाची १७ भागांत मांडणी केली आहे. पाषाण युग अर्थात पूर्व वैदिक काळापासून सुरू झालेला प्रवास, त्यानंतर आर्यांचा प्रारंभिक काळ सत्ययुग, सरस्वती नदीतील सांस्कृतिक कालखंड, पुढे सिंधू नदीच्या खोर्यात झालेला कालखंड, आर्यांच्या आक्रमणाचा कपोलकल्पित झालेला प्रचार, त्यांचे आंतरिक संघर्ष आणि युद्ध, आर्य संस्कृतीचा प्रभाव आणि विस्तार, आर्यांची कृषिक्रांती, जीवनव्यवस्था, समाज व्यवस्था, शासन व्यवस्था, वेद आणि दर्शन, धर्म, ज्ञान अध्यात्म आणि पुढे कलियुगातील आर्य असा प्रवास जवळपास ३८० पानांमध्ये ससंदर्भ आणि लेखकाच्या विचारांचे मूळ तत्त्व अक्षरशः जपलेले आहे. हा अनुवाद इतका सहज, स्वाभाविक आणि प्रवाही आहे की, वाचताना कुठेही भाषांतर आहे हे जाणवत नाही.

आज अखिल विश्वातील मानवाला, वैदिक सनातन हिंदुत्वाची अधिक आवश्यकता आहे. वैदिक काळापासून चालत आलेली सनातन संस्कृतीला आजकाल ‘हिंदुत्व’ हे नामाभिधान दिले गेले आहे, तीच मानवजातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे. आज विश्व अशा एका संक्रमणाच्या काळातून जाते आहे, ज्या काळात पुन्हा वैदिक तत्त्वज्ञानच त्याला तारू शकेल.

आधुनिक हिंदूला पुढे होऊन वर्तमान युगाचे नेतृत्व करावे लागणार आहे. हे आव्हान तर आहेच, पण एक संधी आहे. आम्ही हे करू शकतो, करून दाखवू. या गोष्टीचा नक्कीच अभिमान असायला हवा की, वैदिक आर्य आपले पूर्वज आहेत, त्यांच्यासारखे आचरण करू शकलो, त्यांच्यासारखा महान समाज निर्माण करू शकलो, त्यांच्यासारखाच धर्म धारण करून आदर्शाची पुन्हा स्थापना करू शकलो, तर एकवार पुन्हा स्वतःला खर्या अर्थाने केवळ आर्यपुत्र नव्हे, तर आर्य म्हणवून घेऊ शकतो. अत्यंत वाचनीय आणि संग्रही असावे असेच पुस्तक म्हणजे ‘मी आर्यपुत्र!’

पुस्तकाचे नाव : मी आर्यपुत्र!
लेखक : मनोज सिंह
अनुवाद : डॉ. भारती सुदामे
पृष्ठसंख्या : ३९०
मूल्य : ७८० रु.
प्रकाशन : लाखे बुक हाऊस, नागपूर
पुस्तकासाठी संपर्क : ९४२३६१६८९१/ ८०८०५३९१८०
८६६८५४११८१



सर्वेश फडणवीस