रघुजी राजे यांची तलवार ही केवळ ऐतिहासिक वस्तू नाही, तर ‘स्व’चा इतिहास सांगणारे एक जाज्वल्य प्रतीक आहे. पूर्वीच्या सरकारांनी अशी प्रतीके दडवून ठेवण्यात धन्यता मानली आणि ब्रिगेडी इतिहासकारांनी अशा प्रतिकांच्या सत्यतेबाबत शंका व्यक्त करण्याची रितच सुरु केली. माध्यमांमध्ये अशा प्रकारचा दबाव तयार केला की मूळ उद्देशच धुसर करता येतो. विद्यमान सांस्कृतिक मंत्र्यांनी असला दबाव झुगारून रघुजी राजे यांची तलवार महाराष्ट्रात परत आणली, यासाठी त्यांचे करावे तितके कौतुक अपुरे आहे.
नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक रघुजी राजे भोसले यांची तलवार महाराष्ट्रात येऊन पोहोचली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी जवळ येत असताना, संघाने ज्या पंचपरिवर्तनाचा आग्रह धरला आहे, त्यात ‘स्व’चा बोध हाही एक आग्रहाचा विषय आहे. पराक्रमी इतिहासाची अशी ही प्रतीके मायदेशी परततात, हा एक उत्तम योगायोग मानावा लागेल. यासाठी प्रयत्न करणार्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांचे विशेष कौतुक केले पाहिजे.
रघुजी भोसले यांच्या तलवारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण, ही तलवार केवळ रघुजींच्या शौर्याचेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या जाज्वल्य कर्तृत्वाचेही प्रतीक ठरावी. शिवरायांच्या हिंदवी साम्राज्याचा भगवा जसा उत्तरेला अटकेपार फडकला, तसा दक्षिणेलाही तंजावरपर्यंतचा प्रदेश मराठ्यांनी पादाक्रांत केला. पण, मराठा साम्राज्याचा हा बलाढ्य विस्तार केवळ उत्तर-दक्षिण नाही, तर अगदी गंगा नदीच्या खोर्यापर्यंतही नेणार्या वीरांपैकी एक म्हणजे रघुजी राजे भोसले. १७४५ साली बंगालच्या नबाबाविरुद्धच्या मोहिमांमध्ये नेतृत्व करून रघुजींनी मराठा साम्राज्याच्या सीमा थेट बंगाल, ओडिशापर्यंत अर्थात पूर्वेला बंगालच्या उपसागरापर्यंत भिडवल्या. अलीवर्दीखानाशी केलेल्या तहान्वये रघुजींनी कटक आणि सुवर्णरेखा नदीपर्यंतचा प्रदेश, तसेच बिहार आणि बंगालमधून महसूल मिळविण्याचा अधिकार मिळवला.
एवढेच नाही, तर बंगालबरोबरच दक्षिणेत अर्काटच्या तिरूचिरापल्ली, मण्णाप्परै येथेही विविध लष्करी मोहिमांचे नेतृत्व रघुजींनी यशस्वीरित्या केले. म्हणूनच छत्रपती शाहू महाराजांनी रघुजींना ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी त्यांच्या शौर्यावर खूश होऊन दिली होती. रघुजींच्या तलावारीच्या पात्याच्या तळाशी ‘श्रीमंत राघोजी भोसले सेनासाहिबसुभा’ असा स्पष्ट उल्लेख आढळतो. तसेच, ही युरोपीय बनावटीचे पाते असलेली तलवार मराठा शैलीच्या ‘फिरंग’चा नमुना असून, त्यावरील सोन्याचे नक्षीकाम हे तलवारीचे वैशिष्ट्य ठरावे. १८१७ साली नागपुरात ‘ईस्ट इंडिया कंपनी’ आणि नागपूरकर भोसले यांच्यात लढाई झाली. लढाईनंतर ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने नागपूरकर भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली. त्यामुळे रघुजी यांची तलवारसुद्धा या खजिन्याच्या लुटीदरम्यान किंवा ब्रिटिशांना दिलेल्या भेटीमध्ये देशाबाहेर गेली असावी, असा कयास आहे. अखेरीस दोन शतकांहून अधिकचा काळ लोटल्यानंतर रघुजींची ही तलवार महाराष्ट्र सरकारने लंडनच्या लिलावात जिंकली व काल त्याचे मुंबईत भव्यदिव्य सोहळ्यात स्वागतही झाले.
विजयनगरच्या साम्राज्यानंतर स्वतःला अभिमानाने ‘हिंदू’ म्हणून राज्य करणारे साम्राज्य म्हणजे मराठा साम्राज्य. अठरापगड जाती, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी व छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू स्वराज्याचे जे स्वप्न पाहिले, ते त्यांच्या पश्चातही त्यांच्या सहकार्यांनी राजमुद्रेत उल्लेखलेल्या प्रतिपदेच्या चंद्रासारखे वाढवत नेले. रायगडावरील छत्रपतींचे सिंहासन पाडण्यापासून ते शनिवारवाड्यातील पेशव्यांचे साम्राज्य उद्ध्वस्त करेपर्यंत, भारताच्या निराळ्या प्रेरक वास्तू व वस्तूंचा मानभंग केला गेला. याचे कारण स्पष्ट होते; छत्रपतींच्या प्रतीकांचा आदर्श मानून मराठी व हिंदूजन वारंवार प्रेरणा घेत होते व स्वधर्म, स्वाभिमान व देशासाठी अत्यंत कडवटपणे लढायला तयार होत होते. जगाच्या इतिहासात राजा नसताना त्याची प्रजा आपल्या स्वराज्यासाठी वर्षानुवर्षे लढते व औरंगजेबासारख्या शत्रूला याच भूमीत मरायला लावते; मात्र शरण जात नाही, ही जगाच्या इतिहासातील एकमेव घटना. हा इतिहास त्यागाचा आहे, पराक्रमाचा आहे आणि हिंदूंच्या हार न जाण्याच्या वृत्तीचादेखील आहे. ब्रिटिश असो, मुघल असो किंवा कोणतेही अन्य विदेशी आक्रमक, त्यांनी हा त्यागाचा इतिहास पुन्हा पुन्हा प्रेरणा देऊ नये, म्हणून सतत उद्ध्वस्त करत ठेवला. मराठा साम्राज्याच्या अशा अनेक खाणाखुणा जगभर पसरल्या आहेत, त्या आपण परत आणल्या पाहिजे. केवळ आणून चालणार नाही, तर त्यांचे दर्शन आम जनतेला वारंवार घडेल, असे पाहिले पाहिजे. या प्रतीकांच्या माध्यमातून ज्या प्रकारचा पराक्रम आपल्या पूर्वसुरींनी केला, त्याचे स्मरण होईल याची काळजी घेतली पाहिजे.
देश स्वतंत्र झाला, मात्र ब्रिटिशांच्या सरंजामी डौलाची सवय लागलेल्या काँग्रेसी मंडळींना या इतिहासापासून प्रेरणा घेणे सोयीचे वाटले नाही. केवळ सोयीचे वाटले नाही, तर वेळप्रसंगी नेहरूंसारख्या मंडळींनी छत्रपतींसारख्या महापुरुषांचा उपमर्दही केला. भवानी तलवार असो, वाघनखे असो किंवा आजची रघुजी राजांची तलवार असो, यांपैकी कोणीही काहीही आणायचा विचार जरी केला, तरी हा इतिहास प्रेरणा देऊ नये, म्हणून काम करणार्या टोळ्या लगेच सक्रिय होतात. महाराष्ट्र शासनाने मागच्या वेळेस वाघनखे लंडनहून आणली. त्यावेळेस त्या नखांच्या अस्सलतेबाबतच प्रश्न निर्माण केला गेला. हा प्रश्न वाघनखांबाबत नव्हताच, तर ‘निवडणुकीच्या आधी या वाघनखांपासून प्रेरणा घेऊन हिंदू तेज जागे झाले, तर आपले काय होईल,’ या भीतीने पुरोगाम्यांनी खेळलेला हा डाव होता. आपला वारसा कोणता? आपली प्रतीके कोणती? आपले पूर्वसुरी कोणते? हे एकदा निश्चित झाले की, त्याच्याबाबत शंका-कुशंका राहत नाही. ‘जेएनयु’छाप पंडितांची या राष्ट्राभिमानी इतिहासाचे विकृतीकरण व्हावे, त्याला जाती-जातीत विभागले जावे, यासाठी कार्यरत असणारी व बुद्धिभेद करणारी एक जमात सक्रिय आहे. यात डावे इतिहासकार आहेत, छत्रपतींना जातीत बांधू पाहणारे ब्रिगेडी आहेत आणि हे गचाळ साहित्य पुढे नेणारे हिंस्र कंपूदेखील आहेत. मात्र, शिवछत्रपतींचा इतिहास इतका जाज्वल्य आहे की, तो उफाळून येतच राहतो व या ब्रिगेडींची दुकाने बंद करून टाकतो. बुद्धिभेद करणार्या मंडळींना या प्रतीकांची भीती वाटते, त्याचे कारण उल्लेखल्याप्रमाणे सुस्पष्ट आहे.
नेत्याची कर्तबगारी संपली की, मते मिळवण्यासाठी तो लांगूलचालनासारख्या सवंग मार्गांचा अनुनय करतो. काँग्रेसने तोच मार्ग अनुसरला. आता या कळपात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरणारी उद्धव ठाकरे सेनादेखील सामील झाली आहे. त्यामुळे अशी प्रतीके परत आणण्यासाठी जर कोणी प्रयत्न करीत असेल किंवा ती भारतात पोहोचली तरी यांना त्याचे सोयरसुतकही नसते. रघुजी राजांची तलवार महाराष्ट्रात आली, तरीसुद्धा अजूनही तिचा इतिहास खोटा कसा आहे, हे सांगणार्या ब्रिगेडी इतिहासकारांची कोल्हेकुई सुरू झालेली नाही, हे नवलच मानावे लागेल. विद्यमान सांस्कृतिकमंत्र्यांनी या ब्रिगेड्यांची नालबंदी कशी केली, हे जरा विचारावे लागेल. महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाची अशी प्रतीके जिथे जिथे असतील, तिथून ती जरूर आणली पाहिजे. त्यासाठी तिजोरीतील पैशांचा कांगावा करणारे किंवा त्या इतिहासावर शंका व्यक्त करणारे महामूर्ख कितीही बरळले, तरी त्याची पर्वा करू नये. अशी प्रतीके इंग्रजांनी लुटून नेली होती. आज ही प्रतीके निरनिराळ्या खासगी व्यक्ती, वस्तुसंग्रहालयांमध्ये युरोपात पडून आहेत. लोकसभेत प्रस्थापित करण्यात आलेल्या सेंगोलला ‘नेहरूंची काठी’ म्हणून सांभाळणार्यांना अशा प्रतीकांचे महत्त्व काय समजणार? आणि समजले, तरी ते दडून ठेवण्यात ही मंडळी धन्यता मानणार! रघुजी राजांची तलवार आणण्यासाठी जे प्रयत्न शासनाने केले, त्यासाठी त्यांचे पुनश्च अभिनंदन! अशाच प्रकारची प्रतीके पुन्हा भारतात आणण्यासाठी भरपूर शुभेच्छा!