मी कोण आहे?

    23-Aug-2025
Total Views |

माणूस जन्माला आला की, स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न करतो. अर्थात ही ओळख फक्त शरीरापुरती मर्यादित असते असे नाही. तर त्यापलीकडे जाऊन माणसाला मी कोण आहे? या प्रश्नामधूनच जन्माचा उद्देश समजून घ्यायचा असतो. असाच प्रश्न कलाकृतीही मानवाला विचारायला शिकवतात. त्यामुळे कलाकाराची शोधयात्रा सुरूच राहते. कधी उत्तर मिळाल्याने समाधान मिळते, तरी कधी उत्तर नाही मिळाले, तरी नवसृजनाचा आनंद कलाकाराला तृप्त करतो. नाटक असो वा बालनाट्य कलाकाराला स्वतःचा शोध घेण्यास कसे बाध्य करते, याचा घेतलेला आढावा...

स्वतःची ओळख - ‘मी कोण आहे?’ हा प्रश्न आणि अंतर्मुख होण्याचा नाट्यमय प्रवास.

‘मी कोण आहे?’ हा प्रश्न माणसाने स्वतःच्या मनाला विचारलेला, मनाच्या डोहात तळाशी विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हा प्रश्न पडला की, तो याच्या पुढे पडणार्या सगळ्या प्रश्नांची जननी ठरतो. या प्रश्नामागूनच अनेक प्रश्नांची प्रश्नावली उभी राहते. त्यात काय, का, कधी, कुठे, कोण, कसं? असे सर्वच प्रश्न येतात. पण, या सर्वांपूर्वी एक प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटतो, तो म्हणजे ‘मी कोण आहे?’

माझ्या वैयक्तिक प्रवासात या प्रश्नापर्यंत नेणारा मार्ग म्हणजे नाटक! रंगभूमीने केवळ बाह्यतः गुंतवले नाही, तर अंतर्मुख करून स्वतःकडे पाहण्यास उद्युक्त केले. रंगभूमीवरच्या या प्रवासाने मला विचार करायला, प्रश्न विचारायला आणि आश्चर्य वाटायला शिकवले. एकदा का हे पाऊल उचलले की, पुढचा प्रवास जादुई, गूढ, सामर्थ्यशाली, बदल घडवणाराच होतो. जितया लवकर आपण हा प्रवास सुरू करतो, तितके जीवन अधिक अर्थपूर्ण, स्पष्ट आणि अधिक एकाग्र होते. आत्मसाक्षात्काराचा हा मार्गच अध्यात्माच्या दिशेनेही घेऊन जातो.

बालनाट्य : आत्मभानाच्या प्रवासाची सुरुवात -

बालनाट्य ही एक अशी दुर्मीळ आणि सुंदर संधी आहे, जिथे लहान मुलं ही ‘मी कोण आहे?’ असा जीवन बदलणारा प्रश्न विचारू लागतात. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारताना, कल्पना करताना आणि त्यांच्या अनुभवाशी जोड घेताना मुलं जगाला, दुसर्यांना आणि स्वतःला ओळखण्याचा प्रवास सुरू करतात. हे सगळं अगदी सहजपणे, नाट्य खेळातून घडतं. जिथे अनेक प्रौढ मंडळी ‘मी कोण आहे?’ असा प्रश्न जीवनातील मोठ्या टप्प्यावर जाऊन विचारतात, तिथे बालनाट्य लहान वयातच या विचाराचे बीज पेरते. म्हणूनच कसा? हा प्रश्न डोयात आला कसा, हे फार महत्त्वाचं ठरतं. कारण, जेव्हा नाटक तुम्हाला ‘मी कोण आहे?’ विचारायला लावतं, तेव्हा पुढचा प्रवास केवळ रंगमंचावरचा नसतो, तर तो तुमचं संपूर्ण माणूसपण उलगडणारा आणि प्रकाशित करणारा ठरतो.

नाट्यशिक्षक, नाटककार, दिग्दर्शक आणि आता संशोधक या भूमिकांमधून मी एक गोष्ट मनापासून इच्छिते, ती म्हणजे प्रत्येक मुलाने स्वतःला विचारावं, ‘मी कोण आहे?’ जोपर्यंत आपण स्वतःला ओळखत नाही, तोपर्यंत इतरांना किंवा जगाला कसे समजून घेऊ शकणार?

हा प्रवास सहज नाही - जेव्हा आपण रंगभूमीवर व्यक्तिरेखा साकारतो, तेव्हा ती प्रक्रियाच पाया ठरते. कोणतीही व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारण्यासाठी मुलाने स्वतःच्या भावनांकडे, गुणदोषांकडे, मनोवृत्तींकडे बघितले पाहिजे. मगच त्यातून त्याचं वर्तन, वृत्ती आणि व्यक्तिमत्त्व घडायला सुरुवात होते.

काम सुरू करण्यापूर्वी - मुलाला समजून घेणं महत्त्वाचं.

‘मी कोण आहे?’ असा प्रश्न मुलाला विचारण्यापूर्वी मला समजून घ्यावं लागतं की, तो विद्यार्थी कुठून येतो आहे. म्हणजे त्याचा स्वभाव कसा आहे, हे समजून घेण्यासाठी मला त्या मुलाच्या मानसिक आणि सामाजिक पार्श्वभूमीचा विचार करावा लागतो. याच पार्श्वभूमीचा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर खोल परिणाम झालेला असतो.

मुलांवर परिणाम करणार्या सामाजिक घटकांचे ठसे

अर्थात कुटुंब : कौटुंबिक मूल्यं, भावनिक सुरक्षितता, आर्थिक स्थैर्य आणि घरातील नात्यांची गुणवत्ता, यांचा मुलाच्या आत्मसन्मानावर आणि मोकळेपणावर थेट परिणाम होतो.

मित्र : मैत्री बालवयात एक अत्यंत महत्त्वाचा घटक असते. मैत्रीतील वेळ, संवाद, समर्थन आणि अनुभव हे मुलाच्या सामाजिक आणि भावनिक विकासात मदत करतात.

शाळा :
शाळा म्हणजे मुलाचं दुसरं घर! शाळेचं वातावरण, शिकवण्याच्या पद्धती, मूल्यं यामुळेच मुलाचं व्यक्त होणं आणि शिकणं घडत असतं.

समाज आणि संस्कृती :
योग्य-अयोग्य ठरवणारे नियम, परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक मूल्यं मुलाच्या वागण्यावर खोल परिणाम करतात.

संस्कृती : केवळ परंपराच नव्हे, तर विचारांचा प्रवाह, माणसांचा सामूहिक विकास यांचा समावेशही या संकल्पनेत होतो.

पर्यावरण : वातावरणात स्वच्छता, सुरक्षितता आणि स्थैर्य असेल, तर मुलं मुक्तपणे वावरतात.

समाजमाध्यमांचा परिणाम: मोबाईल, ओटीटी आणि इंटरनेटचा वापर लहान वयातच सुरू झाल्यामुळे, त्याचा भावनिक, बौद्धिक आणि सामाजिक परिणाम दैनंदिन जीवनात स्पष्ट दिसतो.

मानसशास्त्रीय वैशिष्ट्ये समजून घेणं आणि घडवणं आवश्यक: प्रश्न विचारण्याची क्षमता म्हणजे शिकण्याचं साधन. नाटकात हे कल्पनाशक्ती आणि निरीक्षण शक्तीला चालना देतं.

अंतर्मुख किंवा बहिर्मुख: मूल व्यक्त होतं की नाही, पुढाकार घेतं की थांबतं, यावरूनच ते नाटकात किती व्यक्त होतं आणि किती सहजतेने वावरतं हे ठरत असतं.

सक्रियता : मूल किती उत्साही आहे, किती जलद आहे, यावरूनच त्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची कल्पना करता येते.

अहं : मूल स्वतःला आणि इतरांना कसं पाहतं, नैतिक दृष्टिकोन आणि इच्छा यामुळे नाटकातली ओळख ठरते.

भीती आणि टाळण्याची वृत्ती: काही मुलं नाटकात भाग घेण्यास घाबरतात. यामागे जुना अनुभव, लाज किंवा अनोळखीपणा असू शकतो.

राग, द्वेष, रडारड : या भावभावना बहुतेक वेळा दुर्लक्ष, असमान वागणूक किंवा अपेक्षांमुळे येतात. नाटक यातून वाट काढायला शिकवतं.

प्रेम : प्रेम मुलांच्या गाभ्यात असतं. पण, ते कितपत व्यक्त होतं, हे त्यांना मिळणार्या सुरक्षित वातावरणावर अवलंबून असतं.

संस्कार : चांगलं काय, वाईट काय, माणूस म्हणून कसं वागावं? हे लहानपणीच ठरतं. नाटक कृतीतून हे शिकवतं.

संघभावना : नाटकात मुलं सहकार्य, समायोजन आणि समूहभावना शिकतात आणि त्यांचा भावनिक विकास साधला जातो.

वय आणि प्रगल्भता : केवळ वयावर नाही, तर भावनिक परिपक्वतेवरही सादरीकरण अवलंबून असतं. त्याचे टप्पे :

पाच ते सात वर्षे: अनुकरण, खेळकरपणा, शोध

आठ ते दहा वर्षे: भावनांची जाणीव, बारीक निरीक्षण

११ ते १४ वर्षे: अंतर्मुख चिंतन, अर्थ लावणं, स्वायत्तता

बाल कलाकाराला समजावून घेतलं की, त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देता येतो. मातीतून मडकं घडवता येतं, झाडाला खत-पाणी घातलं की, त्यालाही फुलं, फळं लागतात, कॅनव्हासमध्ये कसे रंग भरता येतात, तसंच काहीसं. नाट्यकला ही एक रसायन शाळा आहे. यातून रस उत्पत्ती तर होतेच; पण त्याचबरोबर जीवनात श्रावण सरींचाही वर्षाव होतो. ‘मी कोण आहे?’, ‘कोण आहे मी?’, ‘आहे मी कोण?’ असा आलटून पालटून विचारलेला प्रश्न जेव्हा एकच उत्तर देतो, तेव्हा मज्जा असते. प्रत्येकवेळी जर उत्तर वेगळं मिळालं तरी चांगलंच. कारण, त्यामुळे शोध सुरूच राहतो. हाच शोध कलाकाराला हाती दिलेल्या भूमिकेपर्यंत नेऊन सोडतो. बाल कलाकाराच्या भूमिका सादर करण्याच्या प्रवासाबद्दल पुढच्या लेखात लिहीनच. तोपर्यंत तुम्हीसुद्धा स्वतःला एकदा विचाराच, ‘मी कोण आहे?’ कारण, जीवनाच्या रंगभूमीवरसुद्धा हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

रानी राधिका देशपांडे