‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ या म्हणीप्रमाणे, चीनच्या जीवावर पाकिस्तान उदार आहेच आणि त्यांच्याच उधारीवरही दिवस ढकलतोय. पण, आता ज्या पाकिस्तानात साध्या पिठापासून ते अगदी रॉकेलपर्यंतचेही वांधे आहेत, त्या देशाने चीनच्या मदतीने ‘रॉकेट फोर्स’ उभारण्याच्या वल्गना करणे, हा भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने निर्माण केलेल्या भीतीचाच परिणाम!
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानचे कंबरडे मोडले, तरी त्या देशाची भारतासमवेत संघर्ष करण्याची खुमखुमी थांबत नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर फिल्ड मार्शल झालेल्या लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्याकडून तर भारतास नित्यनेमाने धमया दिल्या जात आहेतच. असल्या धमयांना भारत भीक घालत नाही, हे भारताने पाकिस्तानला स्पष्ट केले असले, तरी जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, अशा प्रकारचे पाकिस्तानचे वर्तन. अमेरिकेच्या भूमीवरून भारतास धमया देण्याचे उद्योगही मुनीर यांनी केले आहेत. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अत्याधुनिक तंत्राचा वापर करून ‘पाकिस्तान आर्मी रॉकेट फोर्स’ची निर्मिती करणार असल्याची घोषणा केली आहे. या फोर्सची उभारणी करण्यासाठी चीनची मदत घेतली जाणार आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेद्वारे भारताने पाकिस्तानला चांगली अद्दल घडविल्यानंतर या ‘रॉकेट फोर्स’चा विचार पाकिस्तानच्या डोयात आला आहे. पाकिस्तानचा मित्र असलेल्या चीनकडे ‘रॉकेट फोर्स’ आहे. त्या धर्तीवर आपणही असे दल उभारू, असा विचार पाकिस्तानी पंतप्रधान शरीफ यांनी केला आणि तसे दल उभारण्याची घोषणा केली.
पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी गेल्या दि. १३ ऑगस्ट रोजी पाकिस्तान असे दल उभारणार असल्याची घोषणा केली. शत्रूच्या विविध आस्थापनांना लक्ष्य करून त्यांना नेस्तनाभूत करण्यासाठी दल उभारण्यामागील हेतू आहे. भारतासमवेत जे चार दिवसांचे युद्ध झाले, त्यामध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झाला होता. ते लक्षात घेऊन युद्धबंदीचा प्रस्ताव त्या देशाने पुढे केला होता. इतका जबरदस्त फटका बसूनही भारताविरुद्ध शस्त्रसज्ज होण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानने तुर्कस्तान आणि चीनकडून घेतलेली शस्त्रे चार दिवसांच्या युद्धात कुचकामी ठरली. त्यामुळे भारताचे कसलेही नुकसान झाले नाही. हा सर्व अनुभव पदरी असताना पाकिस्तान भारताविरुद्ध संघर्ष करण्याची तयारी करीत आहे. पण, पाकिस्तानने अशी कितीही दले उभारली, तरी भरभक्कम मनोबल असणार्या भारतीय लष्करापुढे त्या देशाचा मुळीच टिकाव लागणार नाही, हे स्पष्ट आहे.
चीन, तुर्कस्तान या देशांनी या संदर्भात पाकिस्तानचे कान टोचायला हवेत. पण, त्या देशांनाही भारत बलशाली, वरचढ व्हावा असे वाटत नाही; मग काय करणार. आगळीक केल्यास पाकिस्तानला पुन्हा एकदा आपले पेकाट मोडून घ्यावे लागणार.
२९ नक्षलग्रस्त गावांमध्ये प्रथमच तिरंगा फडकला!
छत्तीसगढ राज्यातील बस्तर विभागातील २९ नक्षलमुक्त गावांमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच १५ ऑगस्ट रोजी तिरंगा ध्वज फडकला. ही २९ गावे याआधी नक्षलग्रस्त होती. ही सर्व गावे आतापर्यंत नक्षलवाद्यांच्या प्रभावाखाली होती. त्यामुळे तेथे नक्षलवादी म्हणतील ती पूर्व दिशा अशी परिस्थिती होती. आता ही गावे नक्षलवाद्यांच्या प्रभावातून मुक्त झाल्याने ७८ वर्षांच्या नंतर प्रथमच या गावांमध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न झाला. यातील काही गावे नारायणपूर जिल्ह्यातील असून काही बिजापूर जिल्ह्यातील आहेत. एकेकाळी नक्षलवादाने प्रभावित असलेल्या या भागांमध्ये शासनाने अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच, विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे साहजिकच या भागातील नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी होण्यास मदत झाली. या भागातील गावांमध्ये स्वातंत्र्य दिनी झालेले ध्वजवंदनाचे कार्यक्रम लक्षात घेता, त्या भागात असलेल्या दहशतीवर एक प्रकारे विजय मिळविल्याचे मानण्यात येत आहे. तसेच, तेथील नागरिकांच्या मनात आता आपल्या भागाचा विकास होणार, शांतता कायम राहणार आणि एकात्मतेची भावना पल्लवित होणार अशी आशा निर्माण झाली आहे. या वर्षीच्या मे महिन्यात छत्तीसगढ जिल्ह्यातील १७ दुर्गम खेड्यांमधील ५४० कुटुंबांना प्रथमच वीज उपलब्ध करून देण्यात आली. ‘मुख्यमंत्री माजरातोला विद्युतीकरण योजने’अंतर्गत तीन कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात आले. दुर्गम भूप्रदेश आणि नक्षलवाद्यांचा धोका लक्षात घेता, त्या भागात वीजपुरवठा उपलब्ध करून देणे अत्यंत जोखमीचे होते. याआधी तेथील लोकांना सौरऊर्जेवर अवलंबून राहावे लागत होते. पण, सौर पॅनेलच्या चोर्या आणि उपकरणांची योग्य निगा न राखली गेल्याने केरोसिनचे दिवे हाच एकमात्र पर्याय होता. त्याच दिव्यांच्या प्रकाशात विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागत होता. आता प्रथमच त्या खेड्यांना वीज उपलब्ध झाली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच एकेकाळी नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या अबुझमाड भागात बससेवेचे दर्शन झाले. नारायणपूर आणि कुटूल दरम्यान ही बससेवा सुरू झाली. या दुर्गम भागातील खेड्यांमध्ये आतापर्यंत बससेवाच उपलब्ध नव्हती. या भागातील लोक चालत किंवा सायकलींचा वापर करीत असत. आता रुग्णालये, शाळा आणि सामान खरेदीसाठी तेथील जनतेला बससेवा उपलब्ध झाली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी २०२६ सालापर्यंत देश नक्षलवाद्यांच्या जोखडातून मुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्या दिशेने शासनाची दमदार पावले पडत असल्याचे अशा उदाहरणावरून दिसून येते.
तेलंगणमध्ये ‘लव्ह जिहाद’!
हैदराबादमध्ये राहणार्या फाहद अकिल गोंदल नावाच्या एका मुस्लीम व्यक्तीने त्याच शहरात राहणार्या कीर्ती जगदीश नावाच्या हिंदू घटस्फोटित महिलेस फूस लावून आपल्या जाळ्यात ओढले. सदर महिला ही तामिळ असून मागास जातीची आहे. या महिलेशी फाहद याने २०१६ साली विवाह केला. "हिंदू चालीरितीप्रमाणे तुला वागता येईल,” असे आश्वासन फाहद याने विवाह करतेवेळी कीर्ती हिला दिले होते. तसेच, कीर्ती हिच्या दहा वर्षे वयाच्या मुलीचा सांभाळ करण्याचे आश्वासनही त्याने दिले होते. पण, विवाह झाल्यानंतर त्या फाहदने कीर्ती आणि तिच्या मुलीचे सक्तीने धर्मांतर केले. कीर्तीचे नाव ‘जोह फातिमा’ असे ठेवण्यात आले. विवाहानंतर फाहद याने कीर्तीला त्रास देण्यास प्रारंभ केला. तसेच, त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचेही कीर्तीच्या लक्षात आले. एवढेच नाही, तर फाहद हा पाकिस्तानी नागरिक असून तो बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करीत असल्याचे लक्षात आले. बनावट कागदपत्रे आणि खोटी ओळखपत्रे तयार करून फाहद हा त्याच्या संपूर्ण कुटुंबासह भारतात राहत असल्याचे लक्षात आले. हे सर्व लक्षात आल्यावर कीर्ती हिने पोलिसांकडे तक्रार केली.
कीर्ती हिने केलेल्या तक्रारीनंतर गेल्या दि. १५ ऑगस्ट रोजी पोलिसांनी फाहदला आपल्या ताब्यात घेतले. फाहद यास अटक करण्यात आल्यानंतर कीर्ती हिने पोलिसांत सविस्तर तक्रार केली. आपल्याला कसे फसविण्यात आले, कसे सक्तीने धर्मांतर करण्यात आले, आपली आर्थिक छळवणूक कशी करण्यात आली, आदी सर्व माहिती कीर्ती हिने आपल्या तक्रारीमधून पोलिसांना दिली. कीर्ती ही ३८ वर्षांची असून पदवीधर आहे. आपल्या पहिल्या पतीपासून तिने घटस्फोट घेतला होता. एका खासगी कंपनीत काम करीत असताना कीर्तीची फाहदशी ओळख झाली. फाहदने तिला सुखात ठेवण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी विवाह केला. तिच्या अगतिकतेचा फायदा घेऊन त्याने कीर्तीला आपल्या जाळ्यात ओढले. कीर्तीच्या आईवर हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यासही त्या नराधमाने अनुमती दिली नाही. पाकिस्तानमधून बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करायचे आणि भारतातील एका हिंदू महिलेस फूस लावून तिच्याशी विवाह करायचा, तिचे धर्मांतर करायचे हे म्हणजे अतीच झाले! ‘लव्ह जिहाद’ची अशी प्रकरणे आजूबाजूला घडत असताना बहुतांश हिंदू समाज अजून निद्रिस्त कसा, याचेच आश्चर्य वाटते!
दत्ता पंचवाघ
९८६९०२०७३२