‘जन्माष्टमी’ म्हणजे गोकुळाष्टमी, कृष्णजन्माचा दिवस. श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. दुष्टांचा संहार करणार्या आणि भक्तांना दिशा दाखविणारा योगेश्वर कृष्ण या रात्री जन्माला आला म्हणून, त्या रात्री आनंदोत्सव साजरा करण्याची, कृष्णजन्माचा सोहळा करण्याची प्रथा आहे. तेव्हा आज गोपाळकाल्यानिमित्त देशभरातील कृष्णजन्मोत्सवाच्या प्रथापरंपरांचा आढावा घेणारा हा लेख...
मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी याठिकाणी जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. श्रीकृष्णाचे चरित्र हे भारतीय समाजमनाला कायमच भुरळ पाडते. त्याच्या आयुष्यातील घटना आपण पाहिल्या, तर कंस आणि पुतनेचा वध हे दुष्टांचे निर्दालन दाखविते. पांडवांना त्याने दिलेली साथ ही सुजनांचे रक्षण सूचविते. गोप परिवारातील सर्वांनाच त्याने खूप आस्थेने सांभाळले. यातून श्रीकृष्णाचे समाजाप्रति प्रेम आणि जिव्हाळा दिसून येतो. अशा आदर्शाचे पूजन आपण यानिमित्ताने करुया.
गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. व्रज, अवध, भोजपूर या प्रांतात हे व्रत विशेष महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी कित्येकांच्या घरी गोकुळ-वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा केला जातो. वैष्णव लोक तर हा दिवस विशेष भक्तीने पाळतात. तसेच, वृंदावन येथे या दिवशी ‘दोलोत्सव’ ही असतो.
व्रताचे स्वरूप
सप्तमीच्या दिवशी एकभुक्त राहून अष्टमीला पांढर्या तिळाचा कल्क अंगाला लावून स्नान करतात. व्रताचा संकल्प करून लता पल्लवानी सुशोभित करतात. त्यास्थानी देवकीचे सूतिकागृह स्थापन करून मंचकावर देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करतात. दुसर्या बाजूला यशोदा आणि तिची कन्या, वसुदेव, नंद यांच्या मूर्ती बसवितात. मध्यरात्री शूचिर्भूत होऊन संकल्प करतात व सहपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करतात. रात्रीच्या वेळी कथा, पुराण, नृत्य, गीत इत्यादी कार्यक्रमांनी जागरण केले जाते. अष्टमीच्या दिवशी उपवास व देवालाही फराळाच्या जिन्नसांचा नैवेद्य दाखवितात. नवमीच्या दिवशी पंचोपचार, उत्तरपूजा करून महानैवेद्य समर्पित केला जातो. कृष्णाची पूजा करून पुरुषसूक्ताने, विष्णुसूक्ताने व इतर स्तोत्रांनी स्तवन करावे. वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, निरनिराळ्या सत्कथा प्राचीन पुराण, इतिहास यांनी ती रात्र घालवावी. गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण केल्यानंतर वैष्णवांनी परस्परांवर दही इत्यादींचे सिंचन करावे. कारण, दही, दूध, तूप, उदक यांनी गोपालांनी परस्परांवर सिंचन व लेपन केले, असे भागवत पुराणात सांगितले आहे.
गोपाळकाला/दहीहंडी
उत्सवासाठी तयार केल्या जाणार्या विशिष्ट प्रसादास ‘गोपाळकाला’ असे म्हणतात. कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दहीकाला होतो. ‘गोविंदा आला रे आला| गोकुळात आनंद झाला|’ या गीताच्या पंक्तीवर लहानाथोरांची पाऊले थिरकतात व त्याच उत्साहात थरांवर थर रचून दहीहंडी फोडली जाते. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडयात दही-दुधाने भरलेला हंडा ठेवून, तेथपर्यंत मानवी मनोरे रचून, तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
‘काला’ हा एक वैशिष्ट्यपूर्ण आहार. श्रीकृष्णाने व्रज मंडळात गायी चारताना स्वत:ची व आपल्या सवंगड्यांच्या शिदोर्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले, अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. ‘गोपाल’ म्हणजे गायींचे पालन करणारा. या उत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो. ‘काला’ म्हणजे एकत्र मिळविणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, तांदूळ, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी टाकून केलेला एक खाद्यपदार्थ. हा कृष्णास फार प्रिय होता. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व सर्व वाटून खात असत, असे मानले जाते. कृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा प्रसाद दिला जातो.
भारताच्या विविध प्रांतातील गोकुळाष्टमी
भारताच्या विविध प्रांतांत हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. गुजरातमध्ये ‘सातम’ म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून किंवा तसेच दिवसभर पत्ते खेळतात. रात्री १२ वाजता पत्ते बंद करून, कृष्णजन्माचा उत्सव सुरू करतात. बंगाल प्रांतात श्री चैतन्य महाप्रभू या कृष्णभक्ताचे महत्त्व विशेष आहे. गौडीय वैष्णव परंपरेचे अनुयायी असणार्या भक्त मंडळीत या पूजेचे विशेष महत्त्व आहे. गोवा आणि परिसरात याच काल्याला ‘गवळण काला’ म्हणतात. हा काला तिथल्या कलावंतिणी करतात. त्यात एका मुलीला कृष्णाचे सोंग देऊन कृष्णलीलेची गाणी म्हणली जातात आणि शेवटी कृष्णाकडून दहीहंडी फोडून घेतली जाते. हा गवळण काला दशावतारी खेळानंतर किंवा देवस्थानाचा रथोत्सव झाल्यानंतर होतो.
छत्तीसगढ येथे कृष्णजन्माष्टमीनिमित्त महिला भिंतीवर एक सुरेख चित्र काढतात. या चित्राला ‘आठे कन्हैया’ असे म्हटले जाते. यामध्ये कृष्णजन्माचे चित्र रेखाटलेले असते. येथील महिला कृष्णाचे मातीचे आठ पुतळे तयार करून त्यांची पूजा करतात.
असा हा समूहभावना वाढीस लावणारा, भक्तिरसाचा परिपोष करणारा उत्सव आनंददायी असून, गेली काही शतके तो आस्थेने साजरा केला जातो. कृष्णाच्या लीला सर्वांनाच भुरळ पाडतात. दक्षिण भारतातील आळवार संतही याला अपवाद नाहीतच. कारण, ते विष्णुच्या उपासनेत लीन झालेले होते. या परंपरेतील एका महत्त्वाच्या ग्रंथातील कृष्णजन्माचे वर्णन जन्माष्टमीच्या औचित्याने समजावून घेण्यातही वेगळा आनंद आहे.
संत पेरियालवार यांच्या रचनेतील श्रीकृष्णजन्म
वैष्णव संप्रदायात ‘दिव्यदेश’ ही संकल्पना महत्त्वाची मानली गेली आहे. नारायणाच्या विविध रूपांची, अवतारांची पूजा येथे होते. येथील विग्रहांची म्हणजेच मूर्तीची पूजा-अर्चा करताना दक्षिण भारतातील आळवार संतांची वाणीही परमेश्वर भक्तीत तल्लीन होते. अशा संतरचनांचा संग्रह ‘नालयिर दिव्य प्रबंधम्’ नावाने ओळखला जातो. तामिळ भाषेतील ‘द्रविड वेद’ म्हणून सन्मान पावलेल्या या ग्रंथात चार हजार रचना आहेत. पेरियालवार, आंदाळ, कुलशेखर आळवार, मधुरकवि आळवार अशा १२ संतांच्या रचना ‘दिव्य प्रबंधम्’ या संग्रहात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. या ग्रंथाचे महत्त्व ओळखून रामानुजाचार्य यांनी या ग्रंथाला वैष्णव परंपरेत आदराचे स्थान मिळवून दिले.
भक्ताला मोक्षाचा मार्ग दाखविणार्या या रचना किंवा भक्तिगीते
वैष्णव मंदिरांमध्ये तसेच घराघरातही या रचना अगदी भक्तिभावाने गायल्या जातात. वैष्णव संप्रदायाच्या आध्यात्मिक आणि दार्शनिक तत्त्वांना समजून घ्यायचे असेल, तर त्यासाठी हा एक आधारभूत ग्रंथ आहे. या ग्रंथातील एक छोटी रचना (श्लोक १३-२२) कृष्णजन्माचे पुढीलप्रमाणे वर्णन करतो-
"गोकुळाष्टमीच्या पावन औचित्याने आळवार संतांनी वर्णन केलेल्या कृष्णलीला समजून घेऊया. बाळकृष्ण सार्यांनाच मोहित करणारा. सामान्यजनांपासून संतांपर्यंत सर्वांना आपला वाटणारा कृष्ण आणि त्याच्या बाललीला! तिरुकोट्टीयूर येथील महालात केशवाचा जन्म झाला, त्याक्षणी सारेजण आनंदविभोर झाले. सर्वांनी परस्परांना तेल आणि हळद लावून, हळद उडवून आनंद साजरा केला आणि त्या सार्यामुळे महाल हळदीने माखून गेला.
गोपराज नंदाच्या महालात एकच धामधूम सुरू झाली. "कुठे आहेत आपले प्रभु?” असे एकमेकांना विचारत, त्यांच्या दर्शनासाठी लोक दाटी करू लागले. इतके गर्दी उसळली की, लोक एकमेकांवर आदळू लागले, खाली पडू लागले, पुन्हा उठून कृष्णाला पाहायला धावू लागले. वादक, नर्तक, गायक सारे कृष्णासाठी एकत्र आले.
सर्वजण म्हणू लागले की, याचा जन्म ‘तिरुवोणम’ म्हणजे श्रवण नक्षत्रावर झालेला आहे. हे बालक अद्भुत आहे. गोप-गोपी यांना झालेला आनंद काय वर्णन करावा? त्यांनी तर दह्या-दुधाने भरलेल्या घागरी एकमेकांवर ओतून अक्षरश: रित्या केल्या. आनंदाने बेभान झालेल्या गोपी तर स्वतःच्या मोकळ्या सुटलेल्या वेण्यांचे भान हरपून नृत्य करु लागल्या!
केवळ गवळीवाड्यातच नाही, तर जंगलातील वनबांधव-भगिनी यांच्याही आनंदाला पारावार राहिला नाही. हे वनबांधव कसे? मुळ्याच्या फुलासारखे यांचे दात शुभ्र. पानांच्या साली त्यांनी शरीराभोवती गुंडाळलेल्या. स्वतःच्या अंगाला तूप माखून तेही नृत्य करू लागले आणि कृष्णाच्या दर्शनाला आले, नवजात बालकाला आंघोळ घातली गेली. त्याच्या जिभेला हळद लावून जीभ स्वच्छ करते तो काय; सर्व उपस्थित महिलांना बाळकृष्णाचे मुख उघडल्यावर आतमध्ये सात लोकांचे दर्शन घडले. हा सामान्य मनुष्य नसून दैवी लक्षणांनी युक्त असा हा साक्षात नारायण आहे, असे सार्याजणी म्हणू लागल्या.
बाराव्या दिवशी गोपजनांनी पाळणा सजविला. त्याला पाळण्यात ठेवण्याचा प्रयत्न करीत असताना बाळकृष्ण कधी पायाने लाथ मारे, तर कधी पालथा होई. त्याला सांभाळणे गोप पुरुषांना शय होईना; तेव्हा ते स्त्रियांना म्हणाले, "या हत्तीचे बळ असलेल्या बाळाला सांभाळणे आम्हाला कठीणच!”
तिरुकोट्टीयूर गाव धान्याने भरलेल्या शेताने हिरवेगार दिसते आहे; अशा या रमणीय गावातील हा कृष्णजन्म. देवकीने यशोदेला दिलेले हे बालक आपल्या पायाचा अंगठा चोखत कसे निवांत पहुडले आहे, त्याची आभा दिव्य आहे. सारेजण त्याचाच विचार करीत आहेत. गोपस्त्रिया सतत त्याच्या अवतीभवतीच आहेत.”
शोभायात्रेत भगवंताचे अलौकिक रूप पाहून श्री विष्णुचित्त स्वामी अर्थात पेरियालवार स्वतःलाही विसरले आणि त्यांनी ही रचना लिहिली. या रचनेतील एक लहानसा भाग म्हणजे कृष्णजन्म वर्णन. या रचनेचा पाठ जे कोणी करतील, ते पापरहित होतील.
असा हा तुमचा, माझा, आपल्या सर्वांचा लाडका कान्हा. त्याचे चरित्र आठवत, त्याच्या गुणांना उजाळा देत ही जन्माष्टमी साजरी करूया!
डॉ. आर्या जोशी
(लेखिका धर्मशास्त्र विषयातील अभ्यासक/संशोधक असून मराठी विकिपीडियावर संपादिका आहेत.)
९४२२०५९७९५