‘बलसागर’ भारत होवो!

    15-Aug-2025
Total Views |

‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो’ या काव्यपंक्तींचा मतितार्थ मे महिन्यातील ‘ऑपरेशन सिंदूर’च्या धडक कारवाईनंतर प्रकर्षाने अधोरेखित झाला. तेव्हा, आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने भारताच्या सीमेवरील तसेच महत्त्वाच्या औद्योगिक आस्थापनांवरील संरक्षणसज्जतेचा यशस्वी आलेख मांडणारा हा लेख...

भारताचे सैन्य, सशस्त्र दल व अत्याधुनिक शस्त्रसज्जतेमुळे गेल्या दशकात भारताने संरक्षण सिद्धतेच्या संदर्भात जागतिक स्तरावर आघाडी घेतली. नुकत्याच लंडन येथे भारत-इंग्लंडदरम्यान झालेल्या व्यापक संरक्षण कराराने भारताचे संरक्षण क्षेत्रातील व्यापक महत्त्व आणि महात्म्य सर्वमान्य झाले व यातूनच बलशाली भारताचे नवे रूप व स्वरूप अवघ्या जगानेही पाहिले. कधी भारतावर राज्य गाजविलेल्या ब्रिटनला आज भारताशी संरक्षण क्षेत्रासंदर्भात धोरणात्मक करार करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणे, ही बाब जगातील संरक्षण क्षेत्रातील दिग्ग्जांसाठी अचंबित करणारी, भारताची संरक्षण क्षेत्रातील क्षमता व सिद्धता सर्वमान्य करणारी ठरली आहे. भारताची संरक्षण सिद्धता व आपल्या सैनिकी तंत्रज्ञांचे कौशल्य जगासमोर नव्याने व प्रभावीपणे झळकले ते दि. ६ मे २०२५ रोजी. केवळ २५ मिनिटांत भारताने पूर्वनियोजितपणे व अचूक स्वरूपात पाकिस्तानातील सर्वदूर व प्रसंगी आत शिरून, दहशतवाद्यांसह मुख्य संरक्षण केंद्रांना हेरून, हल्ला करून पाकिस्तानी दहशतवाद्यांसह दहशतवादी केंद्रेही नष्ट केली. एवढेच नव्हे, तर एवढ्या वेळेत निर्णायक स्वरूपात युद्ध जिंकण्याचा इतिहाससुद्धा यानिमित्ताने भारताने रचला.

भारत आणि भारतीयांच्या संरक्षण सिद्धतेतील कौशल्य पाकिस्तानच्या मनात धडकी भरविणारे व उभ्या जगाला स्तिमित करणारे ठरले. भारताचे २०१६ सालामधील उटी येथील पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला अचूक उत्तर म्हणून अशीच चढाई केल्याचे यानिमित्ताने स्मरण होणे स्वाभाविक होते. मात्र, यावेळच्या भारताच्या कारवाईचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, यावेळी भारताचे आपल्या धोरणात्मक आक्रमकतेला विकसित तंत्र, तंत्रज्ञान, नियोजन व पाकिस्तानचे कमरतोड नुकसान करतानाच संरक्षणाला संपूर्ण सिद्धतेची साथ दिली. परिणामी, विकृत मेजर जनरल व विख्यात संरक्षणतज्ज्ञ राजन कोचर यांनी नमूद केल्यानुसार ‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने भारत आणि भारताच्या लष्करी सज्जतेला राजकीय स्थिरता, प्रशासकीय परिपक्वता, परराष्ट्र धोरणाची भक्कमता याची साथ मिळाल्यानेच ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत कारवाई केवळ संरक्षकच न राहता, संरक्षणसज्ज सिद्ध झाली.

जाणकारांच्या मते, सध्याच्या आंतरराष्ट्रीय संदर्भात लष्करी कारवाई सुरू करताना अथवा त्याचा प्रतिकार करताना आर्थिक बाजू भरभक्कम असणे गरजेचे व फायदेशीरही ठरते. यावेळी भारताची प्रगत व प्रगतिशील आर्थिक व्यवस्था व सुस्थितीने भारताला मोठेच पाठबळ लाभले. भारताच्या अर्थव्यवस्थेची सध्याच चार ट्रिलियन डॉलर्सकडे वेगवान घोडदौड सुरू असून, याची नोंद जग आणि जागतिक पातळीवर वेळोवेळी घेण्यात येत आहे. या आर्थिक प्रगतीलाच भारताच्या देश आणि जागतिक पातळीवरील उत्पादन वाहतूक व्यवस्थेची अव्वलता आता जगाने मान्य केली आहे. याचे प्रत्यंतर यावेळी नव्या संदर्भात आले. ब्रिटनच्या पुढाकारातून नुकत्याच व नव्याने झालेल्या भारत-ब्रिटन संयुक्त कराराने भारताच्या आर्थिक, औद्योगिक व परराष्ट्र धोरणाची छाप पाश्चिमात्य देशांवर पडलेली दिसून येते. विशेषतः ट्रम्प-आयातशुल्काच्या गदारोळातही हे घडू शकले हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सिद्ध झालेली बाब म्हणजे, जेव्हा भारताच्या सुरक्षा-संरक्षणाचा प्रश्न येतो, त्यावेळी आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था वा पाकिस्तान, अमेरिका, चीन वा रशिया यांना काय वाटते, हे महत्त्वाचे न ठरता, देश आणि देशवासीयांना काय वाटते, ते महत्त्वाचे ठरते व नेमकी हीच बाब पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानसह डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्या-वल्गनांना बळी न पडता, देशहितासाठी व देशाच्या संरक्षणासाठी काय महत्त्वाचे आहे, त्यावरच विचार करून प्रत्यक्षात आणली. यातूनच ‘बलशाली भारत’ नव्याने साकारला.त्याचवेळी भारताने गेल्या सुमारे दहा वर्षांत विविध प्रकारच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, याचा सर्वांगीण विचार करून, त्यानुसार देश आणि देशहितरक्षण यासाठी काय करावे लागू शकते, याचा व्यापक विचार करून आपली संरक्षणसिद्धता दाखवून दिली आहे. या धोरणात्मक तयारीमध्ये देशाची भौगोलिक व सागरी सीमा, महत्त्वाची संशोधन केंद्र व औद्योगिक, समुद्री बंदर, वाहतूक व्यवस्था इत्यादींच्या सुरक्षा राखण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

उदाहरणार्थ, मुंबई-जेएनपीटी, कांडला ही बंदरस्थाने, सर्वांत मोठी अशी जामनगर रिफायनरी, मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्र, राजस्थानमधील पोखरणसह ढोलेरा परिसरातील विशाल सौरऊर्जा प्रकल्प, बाडमेर येथील रिफायनरी, दक्षिण भारतातील पारादीप व विशाखापट्टणम बंदर यांच्या संरक्षणाची विशेष काळजी या प्रकल्पांच्या निर्माण काळापासूनच घेतल्यामुळे, त्यांचा उपयोग यावेळी प्रकर्षात जाणवला व सिद्ध झाला. या प्रमुख प्रकल्पांच्या संरक्षण सिद्धतेत मिसाईल-क्षेपणास्त्रांसह ड्रोनच्या मार्‍यापासून पुरवलेली भरभक्कम सिद्धतेची यशस्वी चाचणी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने जगमान्य ठरली व भारत आणि भारतीयांच्या विशेष कौशल्यांचा व बलशाली क्षमतेचा परिचय सर्वांना झाला. याच्याच जोडीला चीनसारख्या शेजारी देशांचा सर्वच बाबतीतील बेभरवशीपणा लक्षात घेता, तांत्रिक क्षेत्रातील संरक्षणाला भारताने विशेष खबरदारी घेण्यासाठी देशांतर्गत तंत्रज्ञान क्षमता विकसित केली आहे. यामध्ये माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित अशी व्यापक सायबर सुरक्षा, आर्थिक व्यवहार योग्य व सुचारू पद्घतीने होण्यासाठी स्वयंसिद्घ तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा, आवश्यक ठिकाणी कृत्रिम बुद्घिमत्तेचा विकास व प्रयोग आणि त्याशिवाय अंतराळ क्षेत्रातील संशोधनाचा उपयोग आता भारत आणि तटीय सागरी क्षेत्राच्या संरक्षणासाठी केला जात आहे, हे विशेष!

सद्यस्थितीतील भारताची संरक्षण संदर्भातील बलशाली व स्वयंसिद्घ होण्याच्या संदर्भातील सिद्घता सप्रमाण सिद्घ करणारी बाब म्हणजे, ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम.’ या फोरमने संरक्षणात्मकदृष्ट्या सध्या असणार्‍या वा नजीकच्या भविष्यातील जोखमीच्या संदर्भात ‘जागतिक जोखीम अहवाल २०२५’नुकताच प्रकाशित केला आहे. त्यानुसार विशेषतः २०२४-२५ सालच्या दरम्यान आशियाई देशांमध्ये झालेल्या वा सुरू असणार्‍या युद्घ वा युद्घसदृश बंडाळींच्या पार्श्वभूमीवर, संरक्षणसिद्घता प्रमुख औद्योगिक केंद्रांच्या सुरक्षेच्यादृष्टीनेही तितकीच महत्त्वाची ठरेल, असा प्रामुख्याने इशारा दिला आहे. याचाच अर्थ, देशाच्या सीमेसह देशांतर्गत औद्योगिक-व्यवसायाची प्रमुख व संवेदशनशील प्रगती केंद्रांचे संरक्षण तेवढेच महत्त्वाचे ठरेल.या सार्‍या पार्श्वभूमीवर पहलगाम व त्यानंतरच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने ‘आकाश’ क्षेपणास्त्राचा यशस्वी व परिणामकारक उपयोग करून भारताने आपली बलशाली संरक्षण सिद्धता सिद्ध केली आहे. आता आव्हान आहे ‘आकाश’ला गवसणी घालू शकणार्‍या ‘ब्रह्मांडाचा’ संशोधनपर शोध घेण्याचा!

दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
९८२२८४७८८६