मुंबई- महिन्याभरात ३६४ परदेशी वन्यजीवांच्या तस्करीचा पर्दाफाश; गंभीर प्रकरणांमध्ये वाढ

    08-Jul-2025
Total Views | 60
exotic wildlife trafficking



मुंबई (अक्षय मांडवकर) -
गेल्या महिन्याभरात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी वन्यजीव तस्करीची सहा प्रकरणे उघडकीस आली आहेत (exotic wildlife trafficking). या प्रकरणांमधून ३६४ परदेशी प्राण्यांची तस्करी उघडकीस आली असून यामध्ये बॅंकाॅकवरुन आलेल्या प्राण्यांची संख्या अधिक आहे (exotic wildlife trafficking). महिन्याभरात एवढ्या मोठ्या संख्येने उघडकीस आलेली तस्करीची प्रकरणे लक्षात घेता, परदेशी प्राण्यांच्या मागणीत वाढ झाल्याची शंका तज्ज्ञांंनी व्यक्त केली आहे (exotic wildlife trafficking).

'कनव्हेन्शन आॅन इंटरनॅशनल ट्रेड इन एनडेन्जर्ड स्पिसीज आॅफ वाईल्ड फौना अॅण्ड फ्लोरा' म्हणजेच 'सायटीस' या वन्यजीव संरक्षणासाठी असलेल्या आंतरराष्ट्रीय नियमनाअंतर्गत तस्करी होणाऱ्या परदेशी वन्यजीवांना संरक्षण देण्यात आले आहे. या नियमानाअंतर्गत समाविष्ट असणाऱ्या प्राण्यांना भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत चौथ्या श्रेणीत संरक्षण देण्यात आले आहे. म्हणजेच त्यांची वाहतूक करणे वा खरेदी-विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. अशा परिस्थितीत सीमाशुल्क विभागाने (कस्टम) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन गेल्या महिन्याभरात परदेशी वन्यजीव तस्करीची सहा प्रकरणांवर कारवाई केली आहे. या प्रकरणांमधून ताब्यात घेतलेल्या ३६४ परदेशी वन्यजीवांपैकी काही वन्यजीव मृत पावले असून काही वन्यजीवांना आलेल्या देशात पुन्हा धाडण्यात आले आहे. तर काही वन्यजीवांना जामनगरच्या 'वनतारा'मध्ये पाठविण्यात आले आहे.


विमानतळावर आलेले परदेशी वन्यजीव हे सीमाशुल्क विभागाकडून ताब्यात घेतले जातात. त्यानंतर 'केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागा'कडून (डब्लूसीसीबी) त्यांची तपासणी केली जाते. तसेच या प्राण्यांच्या तात्पुरत्या देखभालीचे काम 'राॅ' या संस्थेकडून केले जाते. या तपासणीमध्ये हे वन्यजीव भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या चौथ्या श्रेणीत (सायटीस) संरक्षित आहेत का याची तपासणी केली जाते. तसेच डीजीसीए (नागरी विमान वाहतूक महासंचालक) कडून परवानगी असलेल्या सूचीबद्ध प्राण्यांच्या यादीत हे वन्यजीव आहेत का, याची तपासणी केली जाते. हे वन्यजीव सूचीबद्ध नसल्यास वा 'सायटीस'अंतर्गत संरक्षित असल्यास त्यांना पुन्हा आलेल्या देशात पाठवले जाते.


- दि. ५ जुलै रोजी थाललॅण्डवरुन थाय एअरवे कंपनीच्या विमानातून मुंबईत आलेल्या परदेशी व्यक्तीच्या सामानात ४५ परदेशी वन्यजीव सापडले. त्यामध्ये रॅकून, हायरॅक्स, ब्लॅक फॉक्स स्क्विरल, इगुआना असे विदेशी प्राणी होते. त्यामधील एक रॅकून आणि २२ इगुआना वगळता इतर सगळे वन्यजीव मृत पावले होते. यामधील जिवंत प्राण्यांना पुन्हा थायलॅण्डला पाठविण्यात आले.

 
- दि. २८ जून रोजी बॅंकाॅकवरुन इंडिगो कंपनीच्या विमानाने मुंबईत आलेल्या व्यक्तीच्या सामानात १६ जीवंत साप आढळले. यामध्ये केनियन सॅण्ड बोवा, रायनोसाॅरस रॅट स्नेक, अल्बिनो होंडुरन मिल्क स्नेक, होंडुरन मिल्क स्नेक, कोस्टल बॅंडेड कॅलिफोर्नियन किंग स्नेक या प्रजातीचे साप होते. इंडिगो कंपनीकडे वन्यजीव पुन्हा आलेल्या देशात पाठवण्याची परवानगी नसल्याने त्यांना 'डब्लूसीसीबी'कडे सोपविण्यात आले. त्यानंतर त्यांना 'वनतारा'मध्ये हलविण्यात आले.


 - दि. २५ जून रोजी बॅंकाॅकवरुन एअर इंडियाच्या विमानाने मुंबई विमानतळावर उतरलेल्या मुंबईचे रहिवासी असलेल्या दोन प्रवशांकडे १२० परदेशी वन्यजीव आढळले. यामध्ये तपकिरी बॅसिलिस्क सरडा, इगुआना, सुमात्रान पट्टेदार ससा आणि कुस्कस या वन्यजीवांचा समावेश होता. कस्टम आणि डब्लूसीसीबी मार्फत त्यांना पुन्हा परतीच्या विमानाने पुन्हा बॅंकाॅकला पाठविण्यात आले.


- दि. ९ जून रोजी बॅंकाॅकवरुन मुंबई विमानतळावर उतरलेल्या व्यक्तीच्या ९५ परदेशी वन्यजीव सापडले. व्यक्तींवर गुन्हा दाखल करुन या सगळ्या वन्यजीवांना पुन्हा बॅंकाॅकमध्ये पाठविण्यात आले.


- दि. ३१ मे रोजी बॅंकाॅकमधून आलेल्या व्यक्तीच्या सामानात तीन स्पायडर-टेल्ड हाॅर्न व्हायपर, पाच एशियन लीफ टर्टल आणि ४४ इंडोनेशियन पीट व्हायपर असे एकूण ५२ वन्यजीव सापडले. या वन्यजीवांना पुन्हा बॅंकाॅकला पाठविण्यात आले.


- दि. ८ मे रोजी बॅंकाॅकमधून आलेल्या व्यक्तीकडे ३६ वन्यजीव सापडले. त्यामधील २८ जीवंत, तर आठ वन्यजीव मृत होते.


वाढती मागणी ? 
गेल्या महिन्याभरातील मुंबईत विमानतळावरील परदेशी वन्यजीवांच्या तस्करीच्या घटना पाहता देशाअंतर्गत परदेशी प्राण्यांची वाढती मागणी लक्षात येत आहे. केवळ परदेशी नाही तर भारतीय नागरिकही परदेशात जाऊन हे प्राणी भारतात घेऊन येत आहेत. ही एक साखळी असून वाढती मागणी यासाठी कारणीभूत आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत चौथ्या श्रेणीत (सायटीस) परदेशी वन्यजीवांना संरक्षण दिल्याने ही प्रकरणे प्रकर्षाने उघडकीस येत आहेत. - पवन शर्मा, प्रमुख- 'राॅ' संस्था
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121