राहुल गांधी आणि डाव्यांचा ‘फेक नॅरेटिव्ह’ न्यायालयाने उधळला – केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा टोला

    04-Aug-2025   
Total Views |

नवी दिल्ली :  काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने झापल्यानंतर भाजपनेही त्यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे.

केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राहुल गांधी यांनी याआधीही अनेकदा चीनने भारतीय भूमीवर कब्जा केल्याचा निराधार दावा केला आहे. हा केवळ लष्कराचे मनोबल खच्ची करणारा नाही, तर देशासाठीही अत्यंत घातक आहे. सुप्रीम कोर्टाने या वक्तव्यावर त्यांना थेट फटकारले आहे, ही गोष्ट समाधानकारक आहे.

रिजिजू यांनी पुढे सांगितले की, आम्ही अनेकदा राहुल गांधी यांना विनंती केली की, अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करू नका. मात्र ते कधीच ऐकत नाहीत. आता तरी सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट टिप्पणीमुळे त्यांना योग्य तो बोध व्हावा. रिजिजू यांनी काँग्रेस व डाव्या विचारसरणीच्या लोकांवर फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा आरोप करत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते संसदेत दिलेल्या भाषणात स्पष्ट सांगताना दिसतात की, "१९६२ नंतर चीनने भारताची एक इंचही जमीन बळकावलेली नाही. अरुणाचल प्रदेशातही चीनने तशी कोणतीही घुसखोरी केलेली नाही.

भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी राहुल गांधींवर हल्ला चढवत म्हटले, ज्यांनी भारतीय संविधान हाती घेऊन यात्रा काढल्या, त्याच राहुल गांधींनी संविधानाची पायमल्ली सुरू केली आहे. भारतीय लष्कराचं मनोबल खच्ची करण्याचे काम काँग्रेस आणि राहुल गांधी करत आहेत.