सोनिया गांधी तेव्हा गप्प का होत्या?

    30-Jul-2025
Total Views |

अनेक दशके खासदार असूनही सोनिया गांधी यांनी कधी संसदेत राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवरील सक्रिय चर्चेत भाग घेतल्याचे दिसत नाही. राहुल गांधी लोकसभेत कधी उपस्थित असलेच, तर ते तोंड उघडतात ते सरकारवर आणि हिंदू समाजावर बदनामीकारक टीका करण्यासाठीच! आताही एका लेखाच्या माध्यमातून सोनिया गांधी यांनी गाझाविषयक मानवाधिकारांवरुन मोदी सरकारवर बिनबुडाची टीका केली. पण, याच सोनिया गांधींना भारतात आणि शेजारी देशांत हिंदूंवर होणारे अत्याचार कधीच दिसले नाहीत, पण दूरदेशी मुस्लिमांचे बळी पडताना दिसतात. ही भारतातील अल्पसंख्याक मतांसाठीची लाचारी नाही तर आणखीन काय?

तरुण मुलाचा आवाज वयात येताना, म्हणजे तो सुमारे १२-१४ वर्षांचा असताना बदलतो. त्याला ‘कंठ फुटणे’ असे म्हणतात. एरवी अबोल असलेली व्यक्ती एकाएकी काही विषयावर बोलू लागली की, तिला कंठ फुटला आहे, असे म्हणण्याची पद्धत. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आता एकाएकी असाच कंठ फुटला आहे. त्यांनी एका वृत्तपत्रात लेख लिहून गाझा पट्टीमधील हत्येबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या या शाही कुटुंबातील लोकांना अचानक वृत्तपत्रांमध्ये लेख लिहिण्याची लहरच आलेली दिसते. मध्यंतरी राहुल गांधी यांनीही एका वृत्तपत्रात असाच तथ्यहीन लेख लिहिला होता आणि आता त्यांच्या मातोश्री सोनिया गांधींनीही तोच कित्ता गिरवलेला दिसतो.

या लेखात सोनिया गांधी यांनी गाझा पट्टीत इस्रायल-‘हमास’ संघर्षाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. आजवरच्या राजकीय कारकिर्दीत प्रथमच लिहिलेल्या लेखातही सोनिया गांधी यांना देशातील समस्येवर बोलण्याऐवजी परदेशातील कोणत्या तरी संघर्षावर भाष्य करणे महत्त्वाचे वाटले, हे इथे मुद्दाम लक्षात घेण्यासारखे आहे. किंबहुना, गाझातील पॅलेस्टिनींच्या (म्हणजे मुस्लिमांच्या) या परिस्थितीस जणू पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचा सूर त्यांनी आळवला आहे. गाझा पट्टीतील संघर्ष का सुरू आहे, ते सार्‍या जगाला ठाऊक आहे. त्याचा भारताशी दुरान्वयानेही संबंध नाही. तरीही जगातील प्रमुख संघर्षांवर प्रत्येक देशाची विशिष्ट भूमिका असतेच. भारतानेही जगातील कोणत्याही सशस्त्र संघर्षाला विरोधच केला आहे. रशिया-युक्रेन युद्धाला तोंड फुटल्यावर पंतप्रधान मोदी यांनी ‘हा युद्धाचा काळ नाही,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तिचे जगभरातील सर्व देशांनी स्वागत केले होते. तसेच, इस्रायल-‘हमास’ यांनीही शस्त्रसंधी करण्याचे आवाहन मोदी यांनी यापूर्वी केले होते. मात्र, सोनिया गांधी यांचा रोख या संघर्षावर नसून, त्यात गाझा पट्टीतील जे मुस्लीम लोक बळी पडत आहेत, त्यावर आहे. इस्रायलने या पट्टीत आजही दडून बसलेल्या ‘हमास’ या दहशतवादी संघटनेच्या नेत्यांचा उच्छेद करण्याचा चंग बांधला आहे. हे दहशतवादी सामान्य लोकांच्या निवासी वस्त्यांमध्ये आणि रुग्णालयासारख्या वास्तूंमध्ये आश्रय घेऊन इस्रायलविरोधात संघर्ष छेडतात. पण, इस्रायल हा देश अस्थायी आणि अनाठायी मानवतावाद दाखवीत नाही. त्यामुळे त्या देशाकडून रुग्णालयांवरही क्षेपणास्त्रांनी हल्ले केले जातात आणि या दहशतवाद्यांना ठार मारले जाते. स्वाभाविकच यात काही निरपराध सामान्य लोकांचाही बळी जातो. पण, फक्त तेवढीच गोष्ट पकडून इस्रायल हा कसा पॅलेस्टिनी नागरिकांचा संहार करीत आहे, असे म्हणणे हा तद्दन संधीसाधूपणा आणि ढोंगीपणाच म्हणावा लागेल. कारण, सुमारे दोन वर्षे गाझात युद्ध सुरू असतानाही ‘हमास’ने इस्रायलच्या काही ओलिसांना अजूनही मुक्त केलेले नाही. मात्र, त्याबद्दल सोनियांनी या लेखात एक शब्दही लिहिलेला नाही.

सोनिया गांधी यांना हजारो किमी दूर असलेल्या गाझा पट्टीतील मुस्लिमांचा बळी जाताना दिसतो. पण, आपल्याला लागून असलेल्या बांगलादेशात तेथील अल्पसंख्य हिंदूंच्या हत्या होताना आणि त्यांच्यावर होत असलेले अत्याचार मात्र दिसत नाहीत. त्यांना लेख लिहायचाच होता, तर त्यांनी भारताच्या शेजारी देशांतील अल्पसंख्य हिंदूंवरील अत्याचारांवर भाष्य करण्याची गरज होती. बांगलादेशात पूर्वीपासूनच हिंदूंवर अत्याचार होत आहेत. पण, गतवर्षी तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथून पाडल्यावर तेथे हिंदूंची सर्रास कत्तल सुरू झाली. बांगलादेशातील कट्टरपंथीयांनी तेथील सत्तेवर ताबा मिळविल्यापासून आतापर्यंत शेकडो हिंदूंना ठार मारले. शेकडो मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. असंख्य हिंदू महिलांवर अत्याचाराच्या मालिका आजही सुरु आहेत. शेकडो बंगाली हिंदू भारताच्या आश्रयाला येण्याची धडपड करीत आहेत. या नृशंस हत्याकांडाची दखल संयुक्त राष्ट्रांनीही घेतली. इतकेच काय, गतवर्षी अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनीही हिंदूंच्या या नरसंहाराबाबत तीव्र चिंता व्यक्त केली होती. परदेशातील नेत्यांनीही या संहारावर खेद वर्तविला, पण सोनिया किंवा राहुल गांधी यांनी मात्र आजपर्यंत त्यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.

पण, केवळ तेच नव्हे. देशातही जेव्हा जेव्हा हिंदूंचे हत्याकांड झाले, त्यावरही हे माय-लेक मूग गिळून गप्प आहेत. गोध्रा येथे ५७ कारसेवकांना रेल्वेच्या डब्यात कोंडून जिवंत जाळण्यात आले, त्याबद्दल गांधी परिवाराने कधी दु:ख प्रकट केलेले नाही. अगदी परवाच्या पहलगाम हत्याकांडाला जबाबदार असलेले दहशतवादी हे पाकिस्तानीच कशावरून, हा प्रश्न विचारण्यास मात्र काँग्रेस नेते विसरले नाहीत. इतकेच नव्हे, तर दिल्लीतील ‘बाटला हाऊस’ येथे पोलीस एन्काऊन्टरमध्ये इस्लामी दहशतवादी मारले गेल्यामुळे सोनिया गांधी यांना इतके दु:ख झाले की, त्यामुळे त्यांना रात्रभर झोप आली नाही आणि त्या ओक्साबोक्शी रडत होत्या. ही गोष्ट गांधी परिवाराचे निष्ठावंत सलमान खुर्शीद या नेत्यानेच सांगितली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या विरोधात असूनही त्या राज्यात हिंदू महिलांवर होत असलेल्या अत्याचारांविरोधातही सोनिया आणि राहुल गांधी यांनी कधी आवाज उठविलेला नाही. काश्मीरमधून हिंदू पंडितांना हाकलून लावण्यात आले, ती घटना काँग्रेसच्या लेखी जणू कधी घडलीच नव्हती. त्यामुळे त्या स्थलांतराबद्दल गांधी परिवार आणि काँग्रेस पक्ष आजही मौनच धारण करून आहे.

गाझामधील मुस्लिमांच्या हत्यांबद्दल मोदी गप्प का, असा प्रश्न सोनिया गांधी उपस्थित करणार असतील, तर भारतातील आणि शेजारच्या देशांमध्ये होणार्‍या हिंदूंच्या हत्या आणि अन्यायावर त्यादेखील गप्प का, याचेही उत्तर त्यांनी दिलेच पाहिजे. मोदी यांनी जगातील यच्चयावत घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करण्याची गरज नाही. त्यातही भारतातील विरोधी नेत्यांना वाटते म्हणून त्यांनी त्यावर भाष्य करण्याची तर मुळीच आवश्यकता नाही. कारण, गाझातील बळींबद्दल सोनियांना आलेला उमाळा हा देशातील केवळ आणि केवळ मुस्लीम मतांसाठी आहे. मतपेढीच्या राजकारणापायी सोनिया आणि काँग्रेस यांची ही लाचारी अक्षरश: कीव आणणारी आणि तितकीच संतापजनक!