विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

    31-Jul-2025
Total Views |

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग रुढ करण्यापर्यंत गेली. पण, तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर काल या खटल्याचा लागलेला निकाल म्हणजे, ‘भगवा दहशतवादा’चे कुभांड रचणार्‍यांना लगावलेली जोरदार चपराकच! त्यामुळे हिंदू धर्माविषयी कितीही असत्य पेरले, पसरवले, तरी शेवटी विजय सत्याचा, न्यायाचा आणि हिंदुत्वाचाच होतो!

एका साध्वीच्या, काही संन्याशांच्या, एका लष्करी अधिकार्‍याच्या व काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या समर्पित जीवनाला लागलेला बट्टा आज दूर झाला. खरंतर हा बट्टा नव्हता, तर हे होते एक सुनियोजित षड्यंत्र! हिंदूंनाही दहशतवादी जमातींच्या रांगेत नेऊन बसवण्याचे आणि त्यामागे दडली होती मतांची भयावह लाचारी! १७ वर्षांपूर्वी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित, समीर कुलकर्णी, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी, रामजी कालसंग्रा, शामजी साहू, संदीप डांगे, प्रविण तकलकी, राकेश धावडे ही १२ नावे एखाद्या खलनायकाप्रमाणे पेश केली गेली.

दि. २९ सप्टेंबर २००८... रमजानचा महिना सुरू असताना मालेगावातल्या भिकू चौक परिसरातील मशिदीजवळ एका दुचाकीचा स्फोट झाला. लोक नमाज अदा करण्यासाठी जात असतानाच हा स्फोट झाला. या स्फोटात सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला, तर १०० पेक्षा अधिकजण गंभीर जखमी झाले. ज्या दुचाकीचा स्फोट झाला, ती साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नावावर असल्याचा दावा तेव्हा करण्यात आला. त्यामुळे या एका संशयाखाली साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मुख्य आरोपी ठरवून, संपूर्ण प्रकरणात ११ जणांना अटक करण्यात आली. सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी या घटनेचा तपास केला, त्यानंतर दहशतवादाविरोधी पथकाने तपास हाती घेतला आणि इथून सुरू झाली ती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या बदमानीची कहाणी!

यात भलेभले मातब्बरही उतरले. माध्यमे, संसदेचे सभागृह, विधानसभेचे सभागृह या सगळ्यांचा गैरवापर करून ‘भगवा दहशतवाद’ हा शब्द घोकून घोकून रुजवण्यात आला. १०० वेळा एखादे असत्य बोलल्यानंतर ते सत्य वाटू लागते, असा गोबेल्सचा नियम. या गोबेल्सच्या तंत्राचा पुरेपूर वापर संपुआ सरकार व काँग्रेसी नेत्यांनी केला. आरोपांचे गांभीर्य गडद करण्यासाठी काही निवृत्त सनदी अधिकारीदेखील या उरुसात उर बडवून नाचू लागले. काही उर्दू पत्रकारांनी यावर पुस्तके लिहिली. एस. एम. मुश्रीफ यांचे ‘हू किल्ड करकरे?’ हे त्यापैकीच एक. ज्यामध्ये "२००८ साली मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात ११ ब्राह्मणवादी दहशतवाद्यांना अटक झाल्यानंतर देशात होणारे बॉम्बस्फोट जवळपास पूर्णपणे बंद झाले. बहुजन हिंदूंचे मत मुस्लिमांबद्दल कलुषित करून त्यांचे लक्ष ब्राह्मण्यवाद्यांच्या कुटिल कारस्थानांपासून विचलित करण्यासाठी ब्राह्मण्यवादी संघटनाच ‘आयबी’तील ब्राह्मण्यवाद्यांच्या छुप्या सहकार्याने बॉम्बस्फोट घडवून आणले होते व त्यांचे खापर ज्ञात-अज्ञात मुस्लीम दहशतवाद्यांवर फोडले होते,” असा कपोलकल्पित उल्लेख केल्याचे आढळेल. परंतु, बहुसंख्य माध्यमांनी दहशतवादी हल्ल्यांच्या बाबतीत सरकारी माहिती ग्राह्य धरून वृत्तांकन केले. त्यामुळे ‘भगवा दहशतवादा’मागील खरे सत्य, तथ्ये कधीही जनतेसमोर आली नाहीत. पण, गृहखात्यातील अंतर्गत सुरक्षा विभागाचे माजी अवर सचिव आरव्हीएस मणी यांनी ‘द मिथ ऑफ हिंदू टेरर’ या पुस्तकातून ‘हिंदू दहशतवाद’ या काँग्रेसरचित षड्यंत्राचा पर्दाफाश केला. दुर्दैवाने, त्यांच्या या इंग्रजी पुस्तकाला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. पण, त्यामुळे सत्य मात्र लपून राहिले नाही. त्या पुस्तकातील मणी यांनी त्यांच्या गृहखात्यातील सेवेदरम्यान मांडलेले अनुभव वाचले की अंगावर काटा उभा राहतो. तेव्हा, इंग्रजी पुस्तकातील ही अनाकलनीय माहिती मराठी वाचकांपर्यंतही पोहोचावी म्हणून या पुस्तकाचा अरुण करमरकर यांनी स्वैर अनुवाद करून ‘हिंदू दहशतवाद नावाचे थोतांड’ हे पुस्तकही प्रकाशित केले. ‘भगवा दहशतवाद’ या कुभांडाचे म्होरके होते ते काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम व काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह. त्यांनी आपल्या भाषणातून ‘भगवा दहशतवाद’ ही थिअरी अगदी पद्धतशीरपणे रेटण्यास सुरुवात केली. २००८-२०११ दरम्यान दिग्विजय सिंह यांनी कित्येक पत्रकार परिषदांमधून, मुलाखतींतून ‘भगवा दहशतवादा’चा उल्लेख करत हिंदूंची वारंवार बदनामी केली. चिदंबरम यांच्या कार्यकाळात तर त्यांनी गृहमंत्रिपद सोडेपर्यंत, अफजल गुरूला फाशी दिली नव्हती. मग ते नेमके कोणाला वाचवायला बघत होते? हादेखील प्रश्नच आहे.

‘भगवा दहशतवाद’ या शब्दाचीच मुळी ज्या प्रकरणापासून सुरुवात झाली, त्या नांदेडच्या समीर कुलकर्णी याच्या फॅटरीतील स्फोटांचा दहशतवादाशी संबंध जोडला गेला. का, तर त्याचा दोष हाच की, समीर कुलकर्णी हा ‘बजरंग दला’चा कार्यकर्ता होता. हे असे पहिले प्रकरण होते, जिथे ‘हिंदू दहशतवाद’ शब्दाचा प्रयोग केला गेला. हळूहळू अगदी नियोजनबद्ध, पण छुप्या पद्धतीने विशिष्ट मंत्री आणि अधिकार्‍यांच्या संगनमताने तपास यंत्रणांच्या तपासाची दिशा मुद्दाम कपोलकल्पित ‘भगवा दहशतवादा’कडे वळविण्यात आली. त्यानंतर दि. ८ सप्टेंबर २००६ रोजी झालेल्या मालेगाव स्फोटानंतरही अशीच ‘भगवा दहशतवादा’च्या थिअरीची परस्पर मुद्दाम पेरणी करण्यात आली.

तत्कालीन महाराष्ट्र सरकारकडून प्राप्त झालेल्या अहवालात या हल्ल्यात एका मुस्लीम दहशतवादी गटाचा संबंध होता. पण, त्यामध्येही लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना तपास यंत्रणांकरवी गोवण्यात आले. विशेष बाब म्हणजे, दि. ११ जुलै २००६ रोजी झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील संशयितांना ताब्यात घ्यायला ‘एटीएस’ला पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागला. पण, मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणाची दिशा अवघ्या महिन्याभरात बदलून ‘भगवा दहशतवादा’च्या नावाखाली लेफ्टनंट कर्नल पुरोहितांना ताब्यात घेतले गेले. यावरून सरकारची, सरकारच्या हाताखाली बाहुले म्हणून वावरणार्‍या काही अधिकार्‍यांची नियत लक्षात येते.

मध्यंतरी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा एक व्हिडिओ समोर आला. ज्यामध्ये कशाप्रकारे तत्कालीन काँग्रेसी गिधाडांकडून अत्याचार झाले, या सर्वांची धक्कादायक आपबिती त्यांनी मांडली आहे. पहिल्या दिवसापासून चांबड्याच्या पट्ट्याने अगदी रक्त येईस्तोवर त्यांना मारहाण व्हायची. अनेक नार्को, पॉलीग्राफ आणि ब्रेन-मॅपिंग चाचण्यांमुळे कर्कगोराचे निदान झाल्याचाही आरोप साध्वींनी यादरम्यान केला. लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांनीसुद्धा मधल्या काळात सांगितले की, त्यांना अशी वागणूक देण्यात आली, जी प्राण्यांनाही दिली जात नाही. काही अधिकारी त्यांना संघ, ‘विहिंप’ आणि उत्तर प्रदेशचे तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ यांचे या प्रकरणी नाव घेण्यास जबरदस्ती करीत होते. त्याचबरोबर हा पूर्वनियोजित कट असून तत्कालीन संपुआ सरकार आणि राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या इशार्‍यावरून त्यांचे प्यादे नाचत होते, हेदेखील पुरोहितांच्या आरोपातून समोर आले.

त्यामुळे न्यायालयाने गुरुवारी जो निकाल दिला, त्याने काँग्रेसचा हिंदूद्वेषाचा बुरखा टराटरा फाटला. तसेच ‘भगवा दहशतवादा’च्या या थोतांडावरुन केवळ काँग्रेसच नाही, तर त्यांचीच री ओढणारी डाव्यांचीही पिल्लावळ यामुळे तोंडघशी पडली आहे. तब्बल १७ वर्षांनी लागलेला हा खटल्याचा निकाल म्हणजे सत्याचा, न्यायाचा आणि हिंदुत्वाचाच विजय आहे. काँग्रेसकडे जरातरी माणुसकी शिल्लक असेल, तर त्यांनी आता निष्पाप हिंदूंची माफी मागावी, एवढीच अपेक्षा!