मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही माध्यमांशी बोलू नये आणि सोशल मीडियावर काहीही पोस्ट करू नये."
हा आदेश पक्षातील शिस्त टिकवण्यासाठी आणि चुकीची माहिती बाहेर जाऊ नये म्हणून दिला आहे, असे सांगितले जात आहे. राज ठाकरे यांचा हा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पक्षामध्ये कोणतीही गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये, आणि सर्वांनी एकाच सूरात बोलावे, यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरे यांचे हे आदेश आता पक्षाच्या सर्व स्तरांवर पाळले जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.