‘ओशन’ ठरतोय सागरी प्रदूषणावर मात्रा; सिंधुदुर्गातील मच्छिमार आर्थिक फायद्यात

    13-Aug-2025
Total Views |
Ocean Oil Collection



मुंबई (विशेष प्रतिनिधी) –
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मासेमार बोटींमध्ये वापरलेल्या १,२५० लिटर इंजिन तेलाचे यशस्वी संकलन करण्यात पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटला यश मिळाले आहे (Ocean Oil Collection). महत्त्वाचे म्हणजे या संकलनामधून मच्छिमारांना आर्थिक फायदा झाला आहेच (Ocean Oil Collection). शिवाय सागरी प्रदूषण थांबवण्याच्या दृष्टीने देखील हे महत्त्वाचे पाऊल आहे (Ocean Oil Collection). गोखले इन्स्टिट्यूटमार्फत एस. एल. किर्लोस्कर फाउंडेशनच्या आर्थिक मदतीने ‘ओशन’ या प्रकल्पाअंतर्गत कोकण किनारपट्टीवर वापरलेल्या इंजिन तेलाचे संकलन करण्यात येत आहे. (Ocean Oil Collection)
गोखले इन्सिट्यूटकडून राज्याच्या कोकण किनारपट्टी प्रदेशातील स्थानिक अर्थव्यवस्थेस चालना देण्यासाठी सर्क्युलर इकॉनॉमी मॉडेल विकसित करण्यात आले आहे. यामार्फत मच्छीमारांनी बोटींमध्ये वापरलेले इंजिन तेल म्हणेजच लुब तेल विकत घेऊन त्याचा मोबदला मच्छीमारांना दिला जात आहे. त्यानंतर हे वापरलेले इंजिन तेल पुनर्वापर प्रकियेकरिता पाठवले जात आहे. या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मच्छीमारांकडून सुमारे १,२५० लिटर वापरलेल्या इंजिन तेलाचे (Used Lube Oil - ULO) संकलन करून त्याचे पुनर्वापरासाठी प्रक्रिया भागीदारांकडे सुपूर्त करण्यात आले आहे. हा उपक्रम गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (GIPE), पुणे येथील शाश्वत विकास केंद्र, के. के. ल्युब्रिकेशन्स प्रा. लि., आणि स्थानिक युवक राज तेली (ओशन पार्टनर) यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात आला.


पूर्वी थेट समुद्रात फेकले जाणारे हे तेल आता अधिकृत प्रक्रियेसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) परवानाधारक रीसायकलिंग कंपन्यांकडे पाठवले जात आहे. यामुळे पर्यावरणसंवर्धनाबरोबरच स्थानिक मच्छीमार आणि ओशन पार्टनर यांना ५३ हजार ७५० रुपयांचे उत्पन्न मिळवता आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत कोकणातील देवगडसह चार संकलन केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून संपूर्ण किनारपट्टीवरील वापरलेल्या इंजिन तेलाचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये राबवला जाणारा हा उपक्रम पुढील वर्षभरात नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि अलिबाग येथेही सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती या प्रकल्पाच्या अभ्यासक श्रुती घाग यांनी दिली.
‘ओशन’ उपक्रमाविषयी
पुणे येथील ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅण्ड इकोनॉमिक्स’मधील ‘सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’च्या पूजा साठे आणि श्रुती घाग यांच्या नवीन संशोधनाने याच स्रोतावर प्रकाश टाकला आहे. त्यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 14 प्रमुख मासेमारी केंद्रांवर (फिश लॅण्डिंग सेंटर्स) 160 मच्छिमारांचे सर्वेक्षण केले असता, एक चिंताजनक सत्य समोर आले. हे चिंताजनक सत्य काय, तर अंदाजे 32 टक्के जहाजे हे वंगण तेल थेट समुद्रात सोडत आहेत. मच्छीमार हे बोटीमध्ये लुब किंवा इंजिन ऑईल टाकतात. विहित कालावधीनंतर हे इंजिन ऑईल बदलावे लागते. अशावेळी वापरलेले इंजिन ऑईल म्हणजेच वंगण तेल बहुतांश मच्छीमारांकडून समुद्रात फेकले जाते. ज्यामुळे सागरी प्रदूषण वाढते. ‘ओशन’ या प्रकल्पासाठी 2023 साली केलेल्या सर्वेक्षणामध्ये समोर आले आहे की, एका मोठ्या जहाजामध्ये 15 लीटर इंजिन ऑईल भरले जाते. त्यापैकी दहा लीटर वंगण तेल ज्याला ‘जळके ऑईल’ही म्हणतात, ते वापरानंतर उरते. तर छोट्या बोटींमध्ये 7.5 लीटर इंजिन ऑईल भरल्यानंतर त्यातून 6.7 लीटर वंगण तेल उरते. आता महाराष्ट्रात सुमारे 19 हजार नोंदणीकृत जहाजे आहेत आणि या जहाजामधून वापरण्याजोगे न राहिलेले किमान सहा लाख लीटर वंगण तेल हे समुद्रात टाकले जात आहे.