मुंबई : राज्य सरकारने मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी नवीन नियमावली जारी केली असून यापुढे ‘डिजी प्रवेश पास’शिवाय मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही. सोमवार, ११ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने यासंदर्भातील शासन आदेश जारी केला.
मंत्रालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांना आता केवळ डिजीप्रवेश या ऑनलाईन ॲप आधारीत प्रणालीद्वारे प्रवेशपास घेऊन मंत्रालयात प्रवेश करता येणार आहे. येत्या १५ ऑगस्टपासून ही नवी कार्यप्रणाली लागू केली जाणार आहे. यापुढे क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना डिजी प्रवेश पासद्वारेच मंत्रालयात एन्ट्री मिळणार आहे.
काय आहे नियमावली?मंत्रालयात येणाऱ्या सर्वसाधारण अभ्यागतांना मंत्रालयात दुपारी २ वाजतानंतर प्रवेश देण्यात येईल. या प्रवेशासाठी त्यांना Digi Pravesh या ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात प्रवेश पास घेऊन प्रवेश मिळवता येईल. यासाठी मंत्रालयाबाहेर डिजीप्रवेश ॲप किंवा आरएफआयडी कार्ड याकरिता एक खिडकी उपलब्ध असेल आणि तिथून अभ्यागतांना आरएफआयडी कार्ड वितरित करण्यात येतील. मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी अभ्यागतांना आधार कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड हे शासनमान्य ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे.
जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांगजेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना रांगेत उभे राहण्यामुळे होणारा त्रास लक्षात घेता विचारात घेता त्यांना दुपारी १२ वाजता प्रवेश देण्यात यावा, असे या शासन आदेशात सांगण्यात आले आहे. तसेच दुपारी २ वाजतानंतर जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था राहणार आहे. त्यासाठी जेष्ठ नागरिकांसह दिव्यांग व्यक्तींनी संबंधित वैध प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक असेल. यासोबतच वकील आणि त्यांच्यासोबतचे न्यायालयीन लिपिक यांना विविध विभागातील अपिल तसेच इतर न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने वैध दस्तावेज तपासून सकाळी १० वाजतानंतर प्रवेश देण्यात येणार आहे.
आतापर्यंत मॅन्युअल प्रवेश प्रणाली तसेच अलीकडच्या काळात प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेल्या डिजी प्रवेश ॲप आधारित प्रवेश प्रणाली या दोन्ही प्रणालींद्वारे मंत्रालयात प्रवेश देण्यात येत होता. मात्र, आता डिजी प्रवेश या ऑनलाईन ॲप प्रणालीद्वारे नोंदणी प्रक्रिया ही अधिक सुलभ आणि सुरक्षित असल्याने मंत्रालयात फक्त डिजी प्रवेश ऑनलाईन ॲप प्रणालीद्वारे प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यापूर्वी कार्यान्वित करण्यात आलेली मॅन्युअली प्रवेश पास देण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे.