
‘ज्ञान प्रबोधिनी’ या पुणेस्थित शैक्षणिक, सामाजिक संघटनेचे विस्तार केंद्र, डोंबिवली येथे गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकसनासाठी, विविध उपक्रम-कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करणे हे ‘ज्ञान प्रबोधिनी’च्या शैक्षणिक प्रभागाचे मूळ उद्दिष्ट. सर्वांगीण विकसन कशासाठी, तर स्वतःबरोबरच कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि देशाचा जबाबदार नागरिक ही भूमिका समर्थपणे पार पाडण्यासाठी, हा यामागचा मुख्य विचार आहे.
’विद्याव्रत संस्कार’ हा या उद्दिष्टाशी-विचाराशी सुसंगत असा उपक्रम, उपनयन संस्कार अर्थात मुंजीची कालसुसंगत केलेली मांडणी म्हणजे विद्याव्रत संस्कार. मात्र, सध्या होणार्या मुंजीच्या सोहळ्याशी विद्याव्रत संस्काराचं नातं नसून त्याची नाळ जोडली आहे, ती गुरुकुल शिक्षणपद्धती अस्तित्वात असताना होणार्या उपनयन संस्काराशी. बदलणार्या काळाबरोबर समाजात अनेक स्थित्यंतरे घडून आली. गुरुकुलपद्धती लोप पावून विद्यार्थी स्वतःच्या घरी कुटुंबीयांसमवेत राहूनच शिक्षण घेऊ लागले. उपनयन संस्कारांची मांडणी झाली, तो काळ आणि आताचा काळ यात आमूलाग्र फरक आहे. तरीही या संस्कारांमागचं मूळ उद्दिष्ट न बदलता त्याची कालसुसंगत मांडणी केली, तर आजही हा संस्कार व्यक्तीच्या सर्वांगीण विकसनात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा ‘ज्ञान प्रबोधिनी’चा विश्वास आहे.
विद्यार्थ्यांना स्वतःमधल्या क्षमतेची ओळख करून देणे, त्यानुसार ध्येय ठरवण्यासाठी सहकार्य करणे आणि ध्येय निश्चित झाल्यावर त्याच्या पूर्तीसाठी एकाग्र चित्ताने वाटचाली करण्यासाठी प्रोत्साहन देणे, मार्गदर्शन करणे ही उद्दिष्टे समोर ठेवून ‘विद्याव्रत संस्कार’ या उपक्रमांतर्गत मेळावे, अभ्यास सहली, शिबिरांची आखणी केली जाते.
‘विद्याव्रत संस्कार’ १२ ते १६ वर्षे वयाच्या म्हणजेच किशोरावस्थेतल्या, सर्व जाती-धर्म-पंथांतल्या मुलामुलींवर करता येतो, हे या संस्काराचे वैशिष्ट्य. प्रत्यक्ष संस्कारांआधी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करण्यासाठी म्हणून मेळावे, अभ्यास सहली, शिबिरांचं आयोजन करण्यात येते. यंदाच्या शैक्षणिक वर्षातही डोंबिवलीतल्या मराठी व इंग्रजी माध्यमातील शाळेत शिकणार्या १२ ते १४ वयोगटातील मुला-मुलींसाठी ‘विद्याव्रत संस्कारांचं’ आयोजन टिळकनगर शाळा डोंबिवली पूर्व येथे करण्यात आले आहे.
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी २०२६च्या पहिल्या आठवड्यात विद्याव्रत संस्कार होतील. त्यासाठी दि. १५ ऑगस्टपर्यंत नावनोंदणी करायची आहे. हा लेख वाचल्यानंतर डोंबिवलीतील ज्या पालकांना तसेच मुलांना यात सहभागी व्हावेसे वाटेल, त्यांनी लेखाच्या शेवटी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.
या उपक्रमाअंतर्गत योजण्यात येणारे मेळावे, अभ्यास सहलींच्या माध्यमातून अनेक नामवंत व्यक्तींशी मुलांची प्रत्यक्ष भेट होईल. विविध संस्थांना देण्यात येणार्या भेटीतून कामाची माहिती करून घेण्याची संधी मिळेल. शरीराच्या तंदुरुस्तीचं महत्त्व मनावर बिंबवणारे व्यायाम प्रकार तसेच मैदानी खेळ, मानसिक आणि बौद्धिक विकसनासाठी विविध खेळ, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणार्या व्यक्तींशी परिचय, सामूहिकतेची भावना मनात रुजविणारी गटकार्ये ही आणि अशी अनेक सत्रे घेतली जाणार आहेत. गटात बसून गप्पा, गटचर्चा तसेच पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनसारख्या आधुनिक तंत्राच्या मदतीने विकसनाचे महत्त्व, मुलांना समजेल-रुचेल अशा भाषेत सांगितले जाणार आहे. सर्वांगीण विकसनाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ते साध्य करण्यासाठी, रोज कोणते नियम पाळावे लागतात, याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.
वयाच्या २५व्या वर्षापर्यंत विद्यार्थ्याने हे विद्येचे व्रत आचरावे, यासाठी प्रेरणा देण्याचे काम या संस्कारातून होते.
शेवटी एक दिवस ठरवून अतिशय मंगलमय वातावरणात पवित्र अग्नीच्या साक्षीने, पालक-अन्य वडीलधारी-शिक्षक यांच्या उपस्थितीत विद्यार्थी स्वतः ठरवलेले संकल्प जाहीर करतात. मात्र, यानंतर ‘विद्या संस्कार’ पूर्ण झाले, असे होत नाही, तर त्यानंतरही तीन-तीन महिन्यांच्या अंतराने या विद्यार्थ्यांसाठी छोटे मेळावे आयोजित केले जातात. प्रबोधिनीच्या अन्य उपक्रमांमध्येही त्यांना जोडून घेतले जाते. या विद्यार्थ्यांशी सतत संपर्क ठेवण्याचा प्रयत्न प्रबोधिनीकडून केला जातो.
थोडक्यात, असे हे आयुष्याला दिशा देण्यात, प्रेरक ‘विद्याव्रत संस्कार’. वयोगट १२ पूर्ण ते १४ वयोमर्यादेतील मराठी किंवा इंग्रजी माध्यमात शिकणार्या कोणत्याही जात-धर्म-पंथातल्या डोंबिवलीकर मुलामुलींचे मनःपूर्वक स्वागत आहे. प्रवेश मर्यादित असल्याने, इच्छुकांनी लेख वाचल्यानंतर दि. १५ ऑगस्टपर्यंत नावनोंदणी करावी.
संपर्क - अपर्णा बोन्द्रे ८४५४०७९२९२
हर्षा दीक्षित
९९२०१४८७५५