अहमदाबादच्या भीषण विमान अपघातानंतर हवाई वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुनश्च ऐरणीवर आला. या अपघाताची रीतसर चौकशी सुरु असून, त्यामागील कारणेही लवकरच स्पष्ट होतील. पण, या दुर्घटनेनंतर विमानतळ अधिकारी व विमान वाहतूक कंपन्यांच्या व्यवस्थापनांनाही आपल्या कार्यशैलीमध्ये सुरक्षा तसेच अन्य ग्राहकसेवांच्या अनुषंगाने आमूलाग्र बदलाची प्रक्रिया आरंभलेली दिसते.
प्रत्येक व्यवसायात सुरक्षा हा विषय वा मुद्दा सर्वोच्च पातळीवर हाताळणे अपेक्षित व तितकेच आवश्यकही असते. कामकाजाच्या पद्धतींपासून ते कायद्यापर्यंत सांगायचे झाल्यास, मशीनपासून ते माणसांपर्यंत सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक वा तत्सम उच्च पदस्थांची असते. सुरक्षेच्या संदर्भात काही त्रुटी वा कमतरता राहून, त्यांची परिणती मोठे अपघात, नुकसान वा जीवितहानी झाल्यास त्यासाठी संबंधित कंपनीच्या उच्च-पदस्थांना जबाबदार धरून त्यांच्यावर रितसर कारवाई होते. त्याचवेळी अशा प्रकारच्या मोठ्या दुर्घटना वा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून भविष्यकाळासाठी कायमस्वरूपी व प्रतिबंधात्मक कारवाई आस्थापनेच्या उच्च व्यवस्थापनाने करणे अपेक्षित व आवश्यक असते. उद्योग-व्यवसायातील अपघात नियंत्रणाच्या संदर्भातील याच मार्गदर्शनपर तत्त्व आणि तत्त्वज्ञानानुसार टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी विशेषतः ‘एअर इंडिया’ या टाटा उद्योग समूहांतर्गत सुरक्षेवर विशेष करारासह प्रयत्न सुरू केले आहेत.
यामागे अर्थातच असणारे महत्त्वपूर्ण व सर्वांची काळजी आणि जिव्हाळ्याचे कारण म्हणजे, गेल्या महिन्यात ‘एअर इंडिया’च्या अहमदाबाद-लंडन विमानाला झालेल्या अपघातात २४१ प्रवाशांचा झालेला दुर्दैवी मृत्यू. विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेताच हा भीषण अपघात घडला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.
यासंदर्भात केंद्र सरकारच्या हवाई वाहतूक मंत्रालयाने केलेल्या प्राथमिक चौकशीनुसार, सकृतदर्शनी अहमदाबादच्या विमान अपघाताच्या निमित्ताने विमानतळांवरील विमानोड्डाण उपकरणांची हाताळणी, विमानांची विशेष देखभाल व तपासण्या या प्रमुख कारणांचा उल्लेख केला असून, त्यासंदर्भात विशेष काळजी घेण्याचे व सुरक्षा निर्देशांबाबत नव्या संदर्भात निर्देश जारी केले आहेत.
याच अनुषंगाने हवाई वाहतूक मंत्रालयाने मुंबई, दिल्लीसह सर्वच आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमान-वाहतूक करणार्या यंत्रणेसह विमान वाहतूक कंपन्यांना विमान व प्रवासी वाहतुकीच्या सुरक्षिततेवर विशेष भर देण्यावर अधिक खबरदारी घेण्यास सांगितले आहे.
हवाई वाहतूक मंत्रालयाने नव्याने घेतलेल्या काही प्रमुख व धोरणात्मक निर्णयांमध्ये अहमदाबादच्या विमान अपघाताची व त्यामुळे झालेल्या जीवितहानीची प्रामुख्याने नोंद घेतली गेली. यासंदर्भात विमानतळ अधिकारी व विमान वाहतूक कंपन्यांच्या व्यवस्थापनाने घेतलेल्या कारवाईच्या जोडीलाच मंत्रालयाद्वारा विशेष पडताळणी, तपासणी करण्याचे आता ठरविले आहे. यामागे विमान वाहतुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा अशा वाहतूक सुरक्षेला दुहेरी पाठबळ देण्याचा उद्देश यानिमित्ताने स्पष्ट करण्यात आला आहे.
हवाई वाहतूक सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम व परिणामकारक करण्याच्या उद्देशाने मंत्रालय स्तरावर व वरिष्ठ अधिकार्यांकडून रात्री उशिरा व पहाटे लवकर उड्डाण घेणार्या विमानांची सुरक्षाविषयक पूर्ततेची विशेष पडताळणी घेणे सुरू केले आहे. यालाच निवडक प्रसंगी वा आकस्मिक स्वरूपात विशेष सुरक्षा तपासणीची जोड देण्यात आली. यामागे उद्देश हवाई वाहतूक क्षेत्राशी संबंधित असणार्या सुरक्षा संदर्भातील जोखीम संपूर्णपणे नष्ट करून संपूर्ण हवाई सुरक्षा हे ध्येय पुरतेपणी साध्य करण्याचा उद्देश स्पष्ट केला आहे. मुख्य म्हणजे, हे काम व सुरक्षाविषयक खातरजमा करण्याची जबाबदारी मंत्रालयातील संयुक्त संचालक वा तत्सम स्तरावरील उच्च पदस्थांवर सोपविण्यात आली आहे, हे विशेष!
हवाई वाहतूकविषयक सुरक्षिततेची संपूर्ण अंमलबजावणी व खातरजमा करण्यासाठी आता मंत्रालयातील उच्च अधिकार्यांकडून यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या अशा विमानतळांवर विमानाच्या उतरण्यापासून त्याची विमानतळावरील हालचाल, तांत्रिक पडताळणी वा सुरक्षात्मक काळजी, विमान थांबल्यानंतर होणारी प्रवासी व त्यांच्या सामानाची वाहतूक, प्रवाशांचे चढणे-उतरणे, बससेवेचा सुरक्षित उपयोग, सामानाची ने-आण, सामानाच्या वजनाच्या मर्यादेचे पालन करणे इत्यादी बाबी विशेष कटाक्षाने पाळल्या जाणार आहेत.
यासंदर्भातील प्राथमिक चौकशीच्या दरम्यान प्रकर्षाने पुढे आलेले मुद्दे म्हणजे, आपल्या हवाई वाहतूक क्षेत्रातील सुरक्षेच्या संदर्भात काही त्रुटी वा कमतरता वारंवार होत आहेत. यासंदर्भात संबंधितांचे लक्ष वेधल्यानंतर त्याकडे व सुरक्षेसारख्या जिव्हाळ्याच्या व महत्त्वाच्या मुद्द्याकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले जात नाही. मुख्य म्हणजे, या दुर्लक्षित सुरक्षेचा आढावा पण घेतला जात नाही.
याच दुर्लक्षापोटी विमान आणि प्रवासी या हवाई वाहतूक क्षेत्राशी निगडित दोन्ही प्रमुख मुद्दे कायम दुर्लक्षित राहतात. यामध्ये विमानाची देखभाल-दुरुस्ती, स्वच्छता यापासून विमानतळाची स्वच्छता, अपुरी प्रकाश व्यवस्था व सामानाची सदोष व निष्काळजीपणे होणारी हाताळणी, सामानाच्या नादुरुस्त ट्रॉलीज असणे या प्राथमिकपणे महत्त्वाच्या बाबी अनेक ठिकाणी नित्याच्या झाल्या आहेत. हाच निष्काळजीपणा दुर्लक्षापासून अपघातांपर्यंत विविध बाबींना कारणीभूत ठरतो.
यापैकी काही मुद्दे व प्रकरणांचा हवाई वाहतूक मंत्रालयातील वरिष्ठ व अनुभवी तंत्रज्ञांकरवी यासंदर्भात स्पष्टपणे नमूद केल्यानुसार विमानांची कालबद्घ स्वरूपातील निगा राखणे व त्यांच्या दुरुस्तीच्या संदर्भात वेळेत व पुरेशी काळजी घेणे या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे एक तर दुर्लक्ष केले जाते वा ही महत्त्वाची कामे निष्काळणीपणासह केली जातात. या आणि अशा निष्काळजीपणाची परिणती अपरिहार्यपणे अपघातांमध्ये होते.
सुरुवातीलाच नमूद केल्याप्रमाणे अहमदाबाद येथील ‘एअर इंडिया’च्या विमान अपघातानंतर हा अपघात व त्यामागची आणि त्याच्याशी संबंधित शक्यता व कारणांची केवळ चौकशी करून त्यावरील उपाययोजनांवरच समाधान न मानता, विमान अपघातांच्या मुळाशी जाऊन त्यावर पुरते नियंत्रण मिळविण्याच्या प्रकरणी आता सरकारने पुढाकार घेतला आहे. तो ‘एअर इंडिया’चे व्यवस्थापन-नियंत्रण करणार्या टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष असणार्या एन. चंद्रशेखरन यांनी. त्यांना याकामी सहकार्य करीत आहेत ते ‘एअर इंडिया’चे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी कँपबेल विलियम. ते विमान वाहतूक सुरक्षा क्षेत्रातील जागतिक स्तरावरील तज्ज्ञ समजले जातात.
टाटा उद्योग समूहाच्या परंपरेनुसार, या प्रकरणी आता टाटा समूह अध्यक्षांचा पुढाकार आणि प्रयत्नांमुळे ‘एअर इंडिया’च्या हवाई वाहतूक सुरक्षाप्रकरणी तांत्रिक, विमान वाहतूक व कुठल्याही स्वरूपाचा निष्काळजीपणा वा दिरंगाई या विविध मुद्द्यांवर सखोल उपाययोजना होणे अपेक्षित आहे आणि हवाई वाहतूक क्षेत्रातील सुरक्षेच्या संदर्भात हीच काळाची गरज म्हणावी लागेल.
दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
९८२२८४७८८६