मुंबई (अक्षय मांडवकर) - कोकणातील पुष्पप्रजातींची राणी म्हणून ओळखळी जाणारी 'एकदांडी' म्हणजेच 'दिपकाडी कोंकणेन्स' या प्रजातीचे तिच्या मूळ अधिवासापासून साधारण ९० किमी हवाई अंतरावर म्हणजेच दापोली येथे यशस्वी पुनर्वसन करण्यात संशोधकांना यश मिळाले आहे (konkan dipcadi bloom in dapoli). रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही निवडक सड्यांवर सापडणाऱ्या या प्रजातीचे वनस्पतीशास्त्रज्ञांनी दशकभरापूर्वी दापोलीत रोपण केले होते (konkan dipcadi bloom in dapoli) . हे रोपण यशस्वी झाले असून यंदा दापोलीतील एकूण चार सड्यांवर ही प्रजत उमलून आली आहे (konkan dipcadi bloom in dapoli) . यामुळे या 'संकटग्रस्त' प्रजातीच्या संवर्धनाला हातभार लागला आहे. (konkan dipcadi bloom in dapoli)
'दिपकाडी कोंकणेन्स' या शास्त्रीय नावाने ओळखली जाणारी ही प्रजात केवळ पावसाळी हंगामात बहरते. 'एकदांडी', 'गौरीची फुलं' किंवा 'ढोकाची फुलं' अशा स्थानिक नावांनी ही प्रजात ओळखळी जाते. कोकणात अतिशय तुरळक ठिकाणी, मात्र संख्येने भरपूर प्रमाणात वाढणाऱ्या या वनस्पतीचा बहर अंदाजे ३० ठिकाणांवर नोंदवण्यात आला आहे. या प्रजातीच्या मूळ अधिवासाचा विस्तार हा उत्तरेकडे देवरुखपासून दक्षिणेकडे गोव्यातील मोपाच्या सड्यापर्यंत आहे. प्रामुख्याने रत्नागिरी, राजापूर, देवगड ते वेंगुर्ला तालुक्यापर्यंत पसरलेल्या किनाऱी सड्यांवर ही वनस्पती फुलते. त्यामुळे ती महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांपुरता प्रदेशनिष्ठ आहे. या प्रदेशनिष्ठतेमुळेच 'आययूसीएन'च्या लाल यादीत या प्रजातीला 'संकटग्रस्त' प्रजातींच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. अशी ही 'संकटग्रस्त' प्रजात गेल्यावर्षी दापोली तालुक्यात बहरलेली होती.
'आययूसीएन'साठी या वनस्पतीचे मूल्यांकन करणारे वनस्पतिशास्त्रज्ञ डाॅ. अमित मिरगळ यांनी या प्रजातीचे रोपण दापोली तालुक्यात केले होते. डाॅ. मिरगळ हे २०१२ पासून 'एकदांडी'चे सखोल संशोधन करत आहेत. या प्रजातीचे मर्यादित अधिवास क्षेत्राचा अंदाज घेऊन मिरगळ यांनी २०१३ साली 'एकदांडी'च्या काही बिया दापोली तालुक्यातील दहा ते बारा सड्यांवर रोपणासाठी टाकल्या. यातील अडखळ आणि महामाईनगर येथील सड्यांवरील बिया दशकभरानंतर गेल्यावर्षी अंकुरित झाल्या आहेत. यंदा वळणे पठारावर देखील दिपकाडीचा बहर पाहायला मिळत आहे. दापोलीतील हा बहर पाहण्यासाठी डाॅ. अमित मिरगळ यांच्याशी ९१५२११५७३७ या क्रमाकांवर संपर्क साधू शकता.
या प्रजातीला लेटराईट माती, योग्य पाणी निचरा आणि अर्ध-छायांकित वातावरण आवश्यक असल्याने योग्य निवासस्थान निवड, माती तयारी आणि हवामान परिस्थितीचे विश्लेषण करून नवीन ठिकाणी या प्रजातीचे यशस्वी रोपण करण्यात आले आहे. ‘वाइल्ड अॅनिमल रेस्क्यू आणि रिसर्च संस्था’ दापोली आणि ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’ देवरुख यांच्या मदतीने पुढील ५ वर्षांत या प्रजातीचे आणखी १० नवीन ठिकाणी पुनर्वसन करण्याची योजना आखली आहे. बीज बँक स्थापना, अनुवंशिक संसाधन संरक्षण आणि इको-टूरिझम विकास यासंदर्भातील काम सुरू आहे. तसेच ‘लोकसहभागातून दिपकाडी संवर्धन’ या भावनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. दापोली आणि परिसरातील मालकी हक्काचे कातळ उपलब्ध असणाऱ्या शेतकरी, अभ्यासक, संस्था यांनी पुढाकार घेऊन या प्रकल्पास हातभार लावण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. - डाॅ. अमित मिरगळ, वनस्पतीशास्त्रज्ञ