
अमेरिकन हार्ट असोसिएशन’ने अलीकडेच अति-प्रक्रिया केलेल्या अन्नाविषयी नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. त्यात त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, ‘अल्ट्रा-प्रोसेस्ड’ अन्न म्हणजे, ज्यात कृत्रिम रंग-चव, जास्त साखर, मीठ आणि चरबीचा अतिरेक असतो, असे अन्न आरोग्यासाठी अतिधोकादायक असेच आहे. हृदयविकार, स्ट्रोक, मधुमेह, स्थूलत्व आणि अकाली मृत्यू यांची शयता या अन्नपदार्थांच्या सेवनामुळे वाढत असल्याचेही असोसिएशनने त्यांच्या अहवालामध्ये म्हटले आहे. त्यामुळेच त्यांनी जगाला शय तितके नैसर्गिक आणि कमी प्रक्रिया केलेले अन्न खाण्याचा; पॅकेट, टिन टाळण्याचा सल्ला दिला आहे.
‘अमेरिकन हार्ट असोसिएशन’चा हा सल्ला योग्य असाच. पण, हाच सल्ला त्यांनी जगाला देण्याबरोबरच स्वतःच्या देशातील सरकारलाही देणे आवश्यक होते. सध्याच्या अमेरिकेच्या सरकारी धोरणांकडे पाहिले, तर चित्र पूर्णपणे वेगळेच दिसते. कारण, हीच अमेरिका आज जगभर जनुक बदल केलेले बियाणे, रासायनिक खतांचा अतिरेक आणि कीटकनाशकांचा बेसुमार मारा केलेल्या पदार्थांचा प्रसार करण्यासाठी आक्रमक मोहिमा राबवते आहे. जागतिक व्यापार करार तसेच, राजनैतिक दबाव वापरून आज अमेरिका विकसनशील देशांच्या अन्नव्यवस्थेत सरसरळ हस्तक्षेप करते आहे. एकीकडे नैसर्गिक अन्नाचे सेवन करण्याचा सल्ला अमेरिकेतील तज्ज्ञ संस्था देतात, तर दुसरीकडे जगावर रासायनिक अन्न लादण्याचा करंटेपणा अमेरिका उघडपणे करते आहे, यापेक्षा दुटप्पीपणाचे दुसरे ते उदाहरण कोणते!
अमेरिकेतील आकडेवारीच या विरोधाभासाची साक्ष देते. प्रौढांच्या आहारातील सुमारे ५७ टक्के कॅलरीज ‘अल्ट्रा-प्रोसेस्ड’ अन्नातून येतात, तर मुलांमध्ये हे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक आहे. ‘अमेरिकन हार्ट असोसिएशन’ने सूचविलेल्या दहा टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा हे पाचपट जास्त आहे. अमेरिकेच्या संस्थेचा हा अहवाल म्हणजे, ट्रम्प प्रशासनाच्या डोळ्यात घातलेले झणझणीत अंजन ठरावे! इतिहास पाहिला, तर गेल्या काही दशकांत अमेरिकेत फास्ट फूड आणि पॅकेज्ड अन्न उद्योगाची झपाट्याने वाढ झाली. कॉर्न सिरप, हायड्रोजनेटेड तेल, कृत्रिम रंग आणि चवद्रव्यांच्या वापराचे प्रमाणही बरेच वाढले. त्याचबरोबर स्थूलत्व, मधुमेह, हृदयविकार यांच्या तक्रारींमध्येही वाढ झाली. अमेरिकेच्या नागरिकांच्या जीवावर बेतत असतानाही नफेखोर कंपन्यांवर कठोर अंकुश बसवण्याची हिंमत एकाही अमेरिकेच्या नेतृत्वाने दाखवली नाही.
जनुकीय बदल केलेल्या अन्नाच्या आणि बियाणांच्या बाबतीतही जागतिक चित्र काहीसे चिंताजनकच आहे. अनेक देशांनी आरोग्याच्या कारणास्तव अमेरिकेच्या जनुकीय बदल केलेल्या अन्नाच्या व्यापाराला नकार दिला आहे. त्याशिवाय अशा बियाण्यांमुळे शेतकरी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कचाट्यात अडकतात, बीजसाठवणीची पारंपरिक पद्धत नष्ट होते आणि कृषी वैविध्याला धोका निर्माण होतो. अशी पिके बाजारात आली, तर स्थानिक अन्नाचे अस्तित्व धोयात येईल. ‘अमेरिकन हार्ट असोसिएशनन’ म्हणते की, "आरोग्य टिकवायचे असेल, तर नैसर्गिक अन्न खा.” पण, मग त्यांचेच सरकार त्यांच्या सल्ल्याची अवहेलना का करते आहे, यावर आज जगाने विचार करण्याची वेळ आली आहे. याचे उत्तर सोपे आहे, ते म्हणजे अमेरिकेतील अजून एक मोठा उद्योग म्हणजे औषधनिर्मिती होय! प्रत्येक उद्योगाची एक साखळीच तिथे निर्माण झाली आहे. जर अमेरिकेला खरोखरच जगाची काळजी असेल, तर जागतिक पातळीवर जनुकीय बदल केलेल्या पिकांचा प्रसार थांबवून, नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीला प्रोत्साहन देणार्या तंत्रज्ञानाच्या विकासाला मदत द्यायला हवी.
आज अमेरिकेची प्रतिमा वेगाने कलंकित होते आहे. ट्रम्प यांच्या हट्टी स्वभावामुळे आज जग अमेरिकेपासून अंतर राखून राहात आहे. कोणत्याही संस्थेने दिलेला उपदेश तेव्हाच प्रभावी ठरतो, जेव्हा तो स्वतःच्या आचरणातून दिसतो. मात्र, आज ट्रम्प प्रशासन या संस्थांच्या अहवालाकडे लक्ष देण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीच, तर फायद्यासाठी सामान्य माणसाचे आयुष्य पणाला लावणार्या या नफेखोर कंपन्यांकडेही अशा अहवालांना गांभीर्याने घेण्याचा विवेक नाही. हा विवेक अमेरिकेचे सरकार आणि काही कंपन्या जितया लवकर धारण करतील, तितकेच जगाचे आणि त्यांच्या नागरिकांचे आयुष्यही सुरक्षित राहील.
कौस्तुभ वीरकर