तोरणा किल्ल्यावरुन पंदच्या नव्या प्रजातीचा शोध; किल्ल्याचे जैविक महत्त्व अधोरेखित

    05-Aug-2025
Total Views |
new species of pinda


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
पुण्यातील तोरणा किल्ल्यावरुन कोथिंबिरीच्या (Apiaceae) कुटुंबातील नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. पिंडा मूखेर्जीयाना असे नामकरण केलेली ही वनस्पती पंद कुळामधील आहे (new species of pinda). या शोधामुळे ऐतिहासिक महत्व लाभलेल्या तोरणा किल्ल्याचे जैविक महत्त्व देखील अधोरेखित झाले आहे. (new species of pinda)
 
 
‘एपियसी’ हे कोथिंबिरीचे कुटुंब आहे. जगात या कुटुंबामध्ये ३ हजार, ८२० पेक्षा जास्त प्रजातींचा समावेश होतो. यांपैकी भारतात जवळपास २५५ प्रजाती सापडतात. याच कुटुंबामध्ये पंद म्हणजेच 'पिंडा' कुळाचा समावेश होतो. जगभरात या कुळात आतापर्यंत एकूण २ प्रजाती सर्वश्रुत होत्या, त्या म्हणजे पिंडा श्रीरंगी आणि पिंडा कोकणएन्सिस. मात्र, यामध्ये अजून एका नव्या प्रजातीची भर पडली आहे. त्यामुळे पिंडा कुळातील प्रजातींची संख्या तीन झाली आहे. विशेष म्हणजे या तीनही प्रजाती जगभरात केवळ पश्चिम घाटातच आढळतात. त्यातील दोन प्रजाती म्हणजे पिंडा श्रीरंगी आणि नव्याने शोधलेली पिंडा मूखेर्जीयाना या महाराष्ट्रासाठी प्रदेशनिष्ठ आहेत. या वनस्पतीचा शोध केरळ मधील देवगिरी महाविद्यालयाचे कांबियेलुमल माधवन मनुदेव आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारी विद्यार्थिनी रेखा छाप्पन,प्रशांत कान्हीरामपदम, ‘होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी’चे अजय गांगुर्डे या संशोधकांनी लावला आहे. या शोधाचे वृत्त नुकतेच ‘नॉर्डिक जर्नल ऑफ बॉटनी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले आहे.
 
 
पावसाळ्यात उमलणाऱ्या या नवीन वनस्पतीचे नामकरण भारतीय वनस्पती संशोधक स्व. प्रा. प्रसांता कुमार मूखेर्जी यांच्या नावावरून "पिंडा मूखेर्जीयाना" (Pinda mukherjeeana) असे करण्यात आले आहे. ही वनस्पती महाराष्ट्रात सापडणाऱ्या पिंडा कोकणएन्सिस (Pinda concanensis) या वनस्पती सोबत साध्यर्म साधते. ती ५०- १०० सेमी उंच वाढते आणि जून ते ऑगस्टपर्यंत तिला शुभ्र पांढरी फुले येतात. ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत फळ धरतात. तोरणा किल्यावर जाताना अगदी रस्त्याच्या कडेलाच ही वनस्पती संशोधकांना आढळून आली. हीचे वैशिट्येपूर्ण फळ, फुलांची रचना, खोड आणि त्याच्यावर असणारे केस, जास्त फांद्या आणि पानावर असणारे केस या नवीन प्रजातीची इतर दोन प्रजातीपेक्षा वेगळे करतात. ही वनस्पती पावसाळ्यानंतर आपल्याला दिसत नाही. पण या वनस्पतीचे जमिनीखाली असणारे मूळखोड हे पावसाळ्यात या वनस्पतीला पुनर्जीवित करताता. त्याच बरोबर आदल्या हंगामात तयार झालेल्या बियांपासून सुध्या नवीन झाडे रुजून येतात.


new species of pinda
 
तोरणाचे जैविक महत्त्व
छत्रपचती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. हा तोरणा किल्ला जसा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध आहे तसाच तो जैवविविधतेने सुद्धा समृद्ध आहे. २०१८ साली झालेल्या एका संशोधनात तोरणा किल्यावर आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त वनस्पती नमूद केलेल्या आहेत. त्यातील २८ टक्के वनस्पती या प्रदेशनिष्ट आहेत. त्याचबरोबर १६ प्रजाती या मोनोटाईपिक Monotypic म्हणजेच त्यांच्या कुळात एकच प्रजाती सापडते अशा आहेत.

फळाच्या आणि मूळखोडाच्या अभ्यासाची गरज
पंद (Pinda concanensis) आणि पंदाडा (Pinda shrirangii) यांच्या बिया या स्थानिक वनवासी लोकांकडून मसाल्यांमध्ये वापरल्या जातात. त्याचबरोबर या वनस्पतीचे मूळ हे बऱ्याच भागात खाले जाते. त्याच बरोबर या कुळामध्ये असणाऱ्या प्रजातींच्या वनस्पतीमध्ये आढळणाऱ्या विशिष्ट्य तेलाचा वापर त्वचारोग व अन्य आजारांवर होऊ शकतो का याचा सखोल अभ्यास झाला पाहिजे. मुळांचा अभ्यास पोषण विश्लेषनाच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे. - रेखा छाप्पन, वनस्पती संशोधक